computer

आपला रंजक इतिहास: कृष्णदेवरायाच्या जन्म, राजेपद आणि प्रधानाच्या मृत्यूच्या सुरस आणि चमत्कारिक कथा..

आपल्या शाळेच्या पुस्तकांतले धडे किती रटाळ आणि नीरस होते ते सगळ्यांना आठवत असेलच!  इतिहासाच्या अभ्यासात काही मनोरंजक नसावे याची दक्षता घेऊनच ही पुस्तकं लिहिली गेली असावीत.  पण तुम्हाला कल्पना आहेच की कंटाळवाण्या विषयाला मनोरंजक बनवणे हे तर बोभाटाचे काम आहे,  म्हणूनच आज आपण सुरुवात करूया विजयनगर साम्राज्याच्या एका रंजक कथेपासून!
 

विजयनगरचे साम्राज्य म्हटले की त्या राज्याचे संस्थापक हरीहर आणि बुक्कराय यांची नावं आठवतात! चौदाव्या शतकापासून या साम्राज्याच्या उभारणीची सुरुवात झाली. त्यानंतर सोळाव्या शतकातला राजा कृष्ण्देवरायाचा राज्यकाल हा विजयनगरचा सुवर्णकाळ समजला जातो. या कृष्णदेवरायाचे आयुष्य म्हणजे अनेक चित्रविचित्र किंवा आपण ज्याला सुरस आणि चमत्कारिक म्हणतो अशा कथांनी भरलेले आहे. अर्थात यातल्या काही कथा नक्कीच काल्पनिक असल्या तरी काही ऐतिहासिक सत्यघटना आहेत. चला मग तर, या कृष्णदेवरायाची एकेक कथा चमत्कारिक कथा पाहूयात. 

 १५०९ साली  कृष्णदेवरायाचे सिंहासनावर बसला. पण हा ही एक चमत्कारच होता. त्याचे झाले असे की तो सिंहासनावर बसण्याच्या वयात असतानाच त्यावेळेचा सम्राट वीरनरसिंहराय मृत्युशय्येवर होता. सम्राट वीरनरसिंहराय हा  कृष्णदेवरायाचा सावत्र भाऊ!  वीरनरसिंहराय सम्राटाच्या वंशावळीत जन्माला आलेला होता तर कृष्णदेवराय मात्र सम्राटाला एका दासीपासून झालेला होता. दासीपुत्र असल्याने त्याचा सिंहासनावर अधिकार नव्हता. मृत्यूशय्येवर असलेल्या वीरनरसिंहाच्या मनात मात्र धाकधुक होती. त्याचा उत्तराधिकारी मुलगा आठ वर्षाचा होता. आपल्या पश्चात आपल्या मुलाला कृष्णदेवरायचा त्रास होऊ नये म्हणून सम्राटाने कृष्णदेवरायची हत्या करण्याचा आदेश दिला. या आज्ञेचे पालन झाले आहे किंवा नाही, याची खात्री पटवून घेण्यासाठी त्याचे डोळे काढून आणायचा हुकूम दिला.

वीरनरसिंहरायाच्या पंतप्रधानाचे नाव होते सुलावा तिमारुसु. त्याच्या मनात मात्र काही वेगळेच होते. त्याने कृष्णदेवरायाला अज्ञातवासात पाठवले आणि एका बकरीचा खातमा करून तिचे डोळे वीरनरसिंहरायला दाखवले. यानंतर काही दिवसातच सम्राटाचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय अज्ञातवासातून बाहेर आला आणि विजयनगरचा सम्राट झाला. शेळी गेली जीवानिशी आणि सम्राट झाला कृष्णदेवराय!!

(दक्षिणात्य सिनेमातील तिमारुसुचं पात्र)

कृष्णदेवरायाचा जन्म पण एका विचित्र घटनेतून झाला होता. एका संध्याकाळी विजयनगरचा सम्राट महालाच्या खिडकीतून आकाशाकडे बघत होता. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरच एक तारा निखळून खाली पडला. हा नैसर्गिक चमत्कार बघितल्यावर त्याने अनेक ज्योतिषांना ताबडतोब आमंत्रित केले. सगळ्या ज्योतिषांचे असे मत होते की असा तारा निखळून पडल्यावर जर सम्राटाने स्त्रीसंग केला, तर जन्माला येणारे मूल ताऱ्यांसारखेच अलौकिक असेल. नेमकी याचवेळी त्याची महाराणी शय्यागृहात वेळेत पोहोचू शकली नाही. तेवढ्यात त्याचे लक्ष एका समया प्रज्वलित करणाऱ्या दासीकडे म्हणजे नगंबाकडे गेले. त्याने तिच्यासोबत संग केला. या शरीरसंबंधातून जन्माला आलेले मूल म्हणजे कृष्णदेवराय!!

आता या घटनेत काही ऐतिहासिक सत्य आहे, तर काही असत्य आहे. ते पण आपण बघू या! कृष्णदेवरायाच्या आईचे नाव नगंबा होते. त्याची आई तुळूवा जातीची होती. सम्राट दक्षिण कर्नाटकातला होता आणि नगंबा उत्तर कर्नाटकातून होती. दक्षिण आणि उत्तर कर्नाटकात काही सांस्कृतिक भेद आहेत. तूळूवा (म्हणजे तुळू बोलणारे ) हा राजवंश समजला जात नव्हता. या सगळ्या ऐतिहासिक घटना बरोबर आहेत. पण तारा निखळल्याचा संदर्भ काल्पनिक असावा. आणखी एक ऐतिहासिक सामाजिक सत्य या प्रसंगातून कळते ते असे की त्या काळातही स्त्री ही उपभोग्य वस्तूच समजले जायचे. पण झाले हे असे आणि कृष्णदेवरायाचा जन्म झाला!!
 

(विजयनगर साम्राज्य)

ज्याकाळी बाबर उत्तरेत मुघल साम्राज्याची निर्मिती करत होता त्याकाळात कृष्णदेवराया आपलं विजयनगरचं अवाढव्य राज्य राखून होता. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू अशा दक्षिणेच्या ३ प्रमुख राज्यांमध्ये कृष्णदेवरायाची सत्ता होती. या तिन्ही राज्यांमध्ये कृष्णदेवरायांला मान होता. तिथल्या जनतेने त्याला बहाल केलेली पदं पहा. कन्नड राज्य राम रमणा (कर्नाटक साम्राज्याचा स्वामी), आंध्रप्रदेश : आंध्र भोज (तेलगु साहित्याचे भोज) आणि मुरु रायरा गंडा (३ राजांचा राजा).

पेस, नुनेझ आणि बार्बोसा या त्याकाळातील महत्वाच्या परदेशी प्रवाशांनी कृष्णदेवराय हयात असताना विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती. त्यांच्या प्रवासवर्णनात नमूद केल्याप्रमाणे कृष्णदेवराय हा परदेशी प्रवाशांना मान देत असे.  पण न्यायनिवाड्यात तो तितकाच क्रूर होता. त्याने रोजच्या व्यायामातून चांगलं शरीर कमावलं होतं. व्यायामाकडे तो विशेष लक्ष द्यायचा. एक चांगला प्रशासक आणि कुशल सेनानी असंच त्याचं वर्णन वाचायला मिळतं. असं म्हणतात की तो युद्धात नेहमी अग्रस्थानी असायचा आणि युद्धात जखमी झालेल्या वीरांना तो स्वतः भेटायला जायचा. विजयनगरच्या साम्राज्याची भरभराट होण्यामागे एवढं एकच कारण नव्हतं. राज्य सुरळीत चालवण्यासाठी जे प्रधानमंडळ लागतं त्याची  पहिल्यांदा स्थापना कृष्णदेवरायाने केली. तिमारुसु हा त्यांच्यातला प्रमुख होता.

तेनालीराम हा कृष्णदेवरायच्या दरबारातला आणखी एक प्रधान होता. तेनालीराम त्याच्या हुशारी आणि चातुर्यामुळे इतिहासत प्रसिद्ध झाला. अकबर बिरबलच्या बरोबरीने तेनालीराम आणि कृष्णदेवरायाच्या कथा आज वाचल्या जातात. या कथा काहीवेळा दंतकथा वाटत असल्या, तरी त्याकाळातल्या राज्यपद्धती आणि न्यायनिवाड्याची बरीचशी झलक आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला राजा असण्यासोबत कृष्णदेवराया हा कवी देखील होता. त्याने संस्कृतमध्ये मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी हे काव्यग्रंथ रचले. या कारणाने त्याला तेलगु भाषेतला भोज राजा म्हटलं जातं.

जरी कृष्णदेवरायाची कारकीर्द साम्राज्याचा सुवर्णकाळ मानली जात असली तरी ती फक्त वीसच वर्षांची होती. या वीस वर्षांच्या अधिपत्यात पंतप्रधान तिमारुसुचा मोठा वाटा होता.पण दोघांच्याही आयुष्याचा अंत मात्र फारच विपरीत झाला. कृष्णदेवरायाने त्याच्या राजपुत्राला गादीचा वारस नेमले. पण राजपुत्र अल्पायुषी ठरला. राजपुत्रावर विषप्रयोग झाल्याने व्यथित कृष्णदेवरायाने पंतप्रधान तिमारुसुवर संशय घेतला. तिमारुसुचे डोळे खुडण्यात आले. काही दिवसांतच असा तपास लागला की पंतप्रधान तिमारुसुचा यात काही दोष नव्हता. राजपुत्राच्या खुनाचा कट ओरिसाच्या राजघराण्याने घडवून आणला होता. तिमारुसुची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली. तिमारुसुने कृष्णदेवरायाकडून काहीही मदत घेण्याचे नाकारले. तो तिरुपतीला निघून गेला. तिथेच त्याच्या आयुष्याचा शेवट झाला. काही दिवसातच कृष्णदेवरायाचे निधन झाले.

दैवाचे वळण असे असते. बकरीचे डोळे दाखवून ज्या तिमारुसुने कृष्णदेवरायाचे प्राण वाचवले त्याच कृष्णदेवरायाने तिमारुसुचे डोळे काढून त्याचे आयुष्य संपवले.

सबस्क्राईब करा

* indicates required