जेआरडी टाटा यांनी टाटा समूहात मानवी मूल्ये कशी रुजवली?
'टाटा आणि भारत हे नातंच वेगळं आहे. जमशेदजी टाटांपासून सुरु झालेला हा प्रवास त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्वरुपात अजूनही चालू आहे. या प्रवासातली एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे भारतरत्न 'जे. आर डी. टाटा'!! जे. आर डींच्या उद्योजकत्वाबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. पण त्याहीपलिकडे जाऊन ते एक माणूस म्हणूनही पण खूप मोठे होते. मूल्यं जपणाऱ्या टाटा उद्योगातल्या या महान व्यक्तिमत्वाच्या स्वभावाचे काही पैलू आज आम्ही बोभाटाच्या वाचकांसाठी खास घेऊन आलो आहोत.
जे. आर. डी. म्हणून ते सगळीकडे ओळखले जातात. या नावाचं पूर्ण रूप म्हणजे जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा. जुलै २९, १९०४ रोजी फ्रान्समधल्या पॅरिसमध्ये जन्मलेल्या जे.आर. डींनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले आणि उद्योग-देशासाठी सर्वस्व अर्पण केले. जागतिक पातळीवर देशाला पहिल्या रांगेत आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी त्यांनी बजावली. हवाई, रासायनिक प्रकल्प देशात सर्वप्रथम आणण्याचे काम त्यांनीच केले. सामाजिक बांधिलकीतून टाटा मेमोरियल हॉस्पिटल, टीआयएफएस आदी संस्था उभारल्या. त्यांचे कार्य अतुलनीय आहे.
हे सर्व करताना जे. आर डींसाठी त्यांची मूल्यं अत्यंत महत्वाची होती आणि ती त्यांनी स्वतःही पाळली. सर्व भागधारकांसाठी निःपक्षपाती वर्तन, सर्वांना समानतेने आणि सन्मानाने वागवणे, माणुसकी, सतत नवीन गोष्टी शिकून उत्कृष्ट दर्जासाठी काम करणे, सर्व टाटा उद्योगांनी "टाटा मूल्यं(value)" ने काम करणे त्यांना अपेक्षित असे. जे नियम सर्वांना, ते स्वतःसाठीही असावेत याकडे त्यांचा कटाक्ष असे. तसेच ज्यांना संस्था तयार करायच्या आहेत त्यांनी स्वतः संस्थेचे नियम पाळावेत असा त्यांचा आग्रह होता.
जे आरडींच्या काटेकोरपणाचं उदाहरण म्हणून एक प्रसंग सांगितला जातो. १९६५च्या डिसेंबरमध्ये पुण्यातल्या टाटा व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्रात कार्यक्रम होता. त्याचे उद्घाटन करण्यासाठी जेआरडी आले होते. जेवायची वेळ झाली तेव्हा सर्वजण भोजनगृहात निघाले. जेआरडी नेहमीप्रमाणे सफारी कपड्यांमध्ये होते. केंद्राचे प्रशासक कर्नल कामा यांनी त्यांना टाय न घातल्यामुळे भोजनगृहात प्रवेश करण्यापासून रोखले. "टाय असल्याशिवाय भोजनगृहात प्रवेश नाही, तुम्हाला तुमच्या खोलीत दुपारचे जेवण पाठवून देईन" असे कामा म्हणाले. त्यावेळी टी.ए.एस.चे अधिकारी कर्नलच्या लीज-मॅजेस्ट्रीवर चिडले होते. पण जेआरडी न चिडता, एकही शब्द न बोलता खोलीत गेले व तिथे त्यांनी जेवण घेतले. ते काही बोलले नाहीत पण त्यांनी कृतीने स्पष्ट केले की जर संस्थांचे नियम सर्वांना समान प्रमाणात लागू केले पाहिजेत. त्यांनी कुठलाही स्वतःचा मी पणा मध्ये आणला नाही.
जे. आर. डी. टाटांनी वयाच्या २२ व्या वर्षी टाटा उद्योग समूहाची धुरा सांभाळली. त्या वेळी त्यांच्या २२ कंपन्या होत्या. ते निवृत्त झाले त्यावेळी टाटा समूहाच्या ९५ कंपन्या होत्या. प्रत्येक कामात त्यांनी शिस्त आणि दर्जा जपला. उद्योगात यश मिळविताना कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. त्याबरोबर माणुसकीही त्यांनी कधी सोडली नाही. स्त्रियांबद्दलही त्यांना अत्यन्त आदर होता. याबद्दलचा एक किस्सा आणखी बहारदार आहे.
ही गोष्ट घडली साधारण १९७० साली. जे. आर. डी यांना एका तरूणीने पत्र लिहिले होते. तिने म्हटले होते, "मूल्यं जपणाऱ्या टाटा कंपनीत स्त्री-पुरुष असा भेदभाव का केला जातो? मी पात्र असूनही माझी एका कार्यक्रमासाठी निवड झाली नाही". यांनतर जे. आर. डी यांनी स्वतः यात लक्ष घातले. महिलांना कंपनीत काम करण्यासाठी का नाकारले जाते यावर विचारले असता त्यांना कळले की पुण्यातल्या पदवीधर प्रशिक्षणार्थींना कारखान्यात कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सर्व कामगार प्रशिक्षणार्थीप्रमाणे त्यांनाही सहा महिने हातांनी मशीनवर काम करावे लागते. याखेरीज पदवीधर प्रशिक्षणार्थींना कामगारांसह फॅक्टरीत वेगवेगळ्या शिफ्ट्समध्ये काम करावे लागणार होते.
स्त्रियांसाठी हे काम खूप कठोर होते. शिवाय महिलांसाठी ते सुरक्षितही नव्हते. दुसरी समस्या म्हणजे कार्यशाळांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सुविधा नव्हती आणि फॅक्टरीज कायद्यानुसार महिलांना स्वतंत्र शौचालय उपलब्ध केल्याशिवाय त्यांना नोकरी देऊ शकत नाही. हे सर्व लक्षात येताच जे. आर. डींनी श्री. सुमंत मुळगावकर यांच्याशी बोलून त्यांनी तातडीने बदल केले. सुमंत मुळगावकर तेव्हा टेल्कोचे प्रमुख होते. त्यांच्याच नावाच्या आद्यक्षरावरून टाटा सुमो गाडी आली होती.
(सुमंत मुळगावकर आणि जेआरडी टाटा)
तर, केवळ स्वतंत्र शौचालय उपलब्ध नाही म्हणून स्त्रियांना नोकरीवर न घेणे हा स्त्रियांच्या कार्यक्षमतेचा अनादर करणे आहे असे जे. आर. डींचे स्पष्ट मत होते. महिलांना घेतले नाही तर खूप मोठ्या कार्यक्षम महिला वर्गावर अन्याय होतो असे त्यांना वाटले. त्यांनी महिला अर्जदारांसाठी मुलाखती व परीक्षा घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्या पत्र लिहिलेल्या मुलीला कामावर रुजू करून घेतले गेले. ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून सुधा नारायण मूर्ती होत्या. त्या पहिल्या महिला इंजिनीअर म्हणून टाटामध्ये रुजू झाल्या. त्यांनी अनेक वर्षे तिथे काम केले. त्यांनतर त्यांचे लग्न इन्फोसिसचे जनक नारायण मूर्ती यांच्याशी झाले.
सुधा मूर्ती यांनी जे. आर. डी यांची एक आठवण सांगितली आहे. त्या म्हणतात, "टेल्कोत कामाची वेळ संपली की माझे पती मला घरी न्यायला यायचे. एके दिवशी त्यांना उशीर झाला म्हणून मी एका व्हरांड्यात थांबले होते. JRD यांनी पाहिले आणि अंधार होत आल्याने तेही माझ्यासोबत थांबले. बराच वेळानंतर मूर्ती आले. JRD यांनी स्वतः त्यांना वेळेवर येण्यास बजावले. मूर्ती तेव्हा एका दुसऱ्या कंपनीत काम करत होते." पुढे सुधा मूर्तींनी नोकरी सोडली. तरीही जेआरडी टाटा यांनी त्यांना कायम प्रोत्साहन दिले. नव्या ठिकाणी काम करतानाही सुधा मूर्ती टाटामधली मूल्यं कधी विसरल्या नाहीत. पुढे इन्फोसिसची स्थापना झाली. अनेक यशस्वी उद्योजक टाटा समूहातून उदयास आले.
(नारायण मूर्ती)
जे आर डींची कारकिर्द मोठी उद्यमशाली होती. त्यांच्या काळात उद्योगसमूहाच्या विस्ताराबरोबरच इतर अनेक संस्था स्थापन झाल्या. भारतात मूलभूत संशोधन व्हावे म्हणून त्यांनी १९३६ साली टाटा समाजविज्ञान संस्था आणि इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्था या संशोधनसंस्था स्थापण्यात पुढाकार घेतला. आशियातील पहिले कर्करोग रुग्णालय १९४१ साली मुंबईत सुरू केले. १९५७ साली जेआरडींना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले, तर इ.स. १९९२ साली त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने भूषवण्यात आले. २९ नोव्हेंबर १९९३ साली वयाच्या ८९ व्या वर्षी जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
अशा या महान भारतीय उद्योजकास बोभाटाचा मानाचा मुजरा. लेख आवडल्यास लाईक करून शेयर करण्यास विसरू नका.
लेखिका: शीतल अजय दरंदळे