लेन्सकथा : फोटोंच्या माध्यमातून केलेलं जीवन- मृत्यूच्या फेऱ्याचं, संस्कृतीच्या खुणांचं फोटो डॉक्युमेंटेशन!!
मृत्यू अटळ असला तरी तो येण्याचा क्षण मात्र ठाऊक नसतो, म्हणून माणूस मृत्यूला सतत घाबरत असतो. मृत्यूचं जे जे दृश्यरूप आहे ते टाळू लागतो. ते रूप समोर आलं की पळ काढतो, गांगरतो, बेचैन होतो,अतीव दुःखाने धाय मोकलून रडतो, प्रेत यात्रा दिसली की रस्ता बदलून घेतो. थोडक्यात काय, माणूस मृत्यू अशुभ मानतो. मृतावस्थेतला जिवंतपणा टिपण्याच्या वृत्तीचा अभाव मृत्यूला टोकाचं रखरखीत करून सोडतो. पण या जगाच्या पाठीवरच्या एका बाईने मृत्यूच्या डोळ्याला डोळा भिडवत त्या गोठल्या-थिजल्या क्षणातलं जिवंतपण आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे.
नाव आहे ग्रॅसीएला इटर्बाइड (Graciela Iturbide), मुक्काम पोस्ट मेक्सिको. वय वर्ष ७८! गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ हि गोरी आजी आपल्या लेन्समधून जगाला माणसाचं डोकं चक्रावेल अशा अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी दाखवतेय. तिच्या मातृभाषेतून तिने टिपलेल्या लेन्सकथां विषयी भरभरून बोलतेय. ती माणसांच्या वेगवेगळ्या गटांत जाऊन राहते. त्यांच्यातली होते. त्यांच्याविषयी भरभरून बोलते. त्यांना सन्मानपूर्वक जगासमोर आणते. त्यातलाच एक भाग म्हणजे तिने जगासमोर आणलेला मृत्यूचा चेहरा. हा चेहरा उदास, भकास, नकारात्मक नाही, तर तो स्वीकाराचा चेहरा आहे. काळाच्या या टाईमलाईनवर विचार केला तर मृत्यूच्या हाहा:कारानं वेशीपासून घराच्या उंबऱ्यापर्यंत सगळ्यांना हतबल केलेलं आहे. या पार्श्वभूमीवर ग्रॅसीएला इटर्बाइड यांनी आपल्या फोटोंच्या माध्यमातून जगासमोर जीवन - मृत्यूच्या फेऱ्याचं, संस्कृतीच्या खुणांचं केलेलं फोटो डॉक्युमेंटेशन महत्वाचं ठरतं.
कोण आहे ग्रॅसीएला इटर्बाइड ?
५० हून अधिक वर्षं स्वतःला फोटोग्राफी करण्यात गुंगवून घेतलेली ही आजी आहे मेक्सिकोतली. रोमन कॅथलिक कुटुंबात जन्मलेली. १३ भावंडातली सगळ्यांत मोठी. वडील हौशी फोटोग्राफर. आपल्या मुलांच्या हालचाली आणि भावविश्वाकडे छायाचित्रांचा विषय म्हणून पाहत. वडिलांची ही आवड ग्रॅसीएलात ही आली. ११ व्या वर्षी तिच्या हातात कॅमेरा आला. मुलीनं तिचं आयुष्य सांसारिक जीवनाला वाहावं अशा कुटुंबातली ती असल्याने लग्नाआधी तिला कलेत लक्ष घालता आलं नाही. मध्ये तिच्या घरच्यांनी पेद्रो मेयर या फोटोग्राफरशी तिचं लग्न लावून दिलं. २३ व्या वर्षी ३ मुलांचं मातृत्व तिच्या वाट्याला आलं. पेद्रो आणि ती विभक्त झाले आणि १९६० दरम्यान तिने कलेत लक्ष घातलं.
ती फिल्ममेकिंग शिकली. नामांकित फोटोग्राफर्सच्या स्टुडिओत असिस्टंट म्हणून काम पाहू लागली. सगळे प्रभाव नाकारत ती आपला स्वतःचा वेगळा प्रवाह तयार करत गेली. विषय आणि फोटोग्राफीतल्या आशयाविषयी प्रवाही होत राहिली. 'फोटो एसे' नावाचा आपला स्वतःचा वेगळा फॉर्म तिने जगासमोर ठेवला. फोटोग्राफीच्या इतिहासात महत्वाची मानली जाणाऱ्या 'डिसिसिव्ह मोमेन्ट' चे प्रणेते 'Henri Cartier-Bresson' तिला मार्गदर्शक म्हणून लाभले. आपल्या कारकिर्दीविषयी बोलत असताना ग्रॅसीएला त्यांचा उल्लेख आयुष्याचे गुरु असाच करते. पण तरीही तिने काढलेल्या फोटोंवर त्याचा प्रभाव दिसून येत नाही. तेवढा डिसिसिव्ह मोमेंटचा 'जे आहे ते, जसं आहे तसं' टिपण्याचा जगाने घेतलेला आदर्श मात्र ग्रॅसीएलाने ही घेतलाय.
सौंदर्य, क्रौर्य, भय, आनंद, वय, लिंग, श्रद्धा, मृत्यू, स्त्रियांचं सामाजिक स्थान, सामाजिक जाणिवा, शहरी आणि ग्रामीण जीवनातील विरोधाभास इथपासून ते स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष इथपर्यंतची सामाजिक, भावनिक अंतर्वर्तुळं ग्रॅसीएलाच्या फोटोग्राफीतल्या कामात दिसतात.
ग्रॅसीएला आणि मृत्यूची गाठभेट
फोटोग्राफी करण्याच्या सुरुवातीच्या काळातलं ग्रॅसीएलाचं काम हे लहान मुलांचे मृत्यू, त्याबाबतच्या प्रथा आणि एकूणच मेक्सिकोतल्या मृत्यूविषयक प्रथा यांच्याभोवतीचं होतं. आपल्या फोटो काढण्याच्या धारणेबाबत बोलताना ग्रॅसीएला म्हणते की, "जे जे मला चमत्कारिक वाटेल ते ते मी टिपत गेले. मी त्याचेच फोटो काढले." हे वाचल्यावर सहजच वाटून जातं या बाईला चक्क मृत्यू ही चमत्कारिक वाटला की काय! पण तसं अजिबात नाहीये.
ग्रॅसीएलाची मुलगी ६ वर्षांची असताना वारली. तो तिचा आणि मृत्यूचा झालेला पहिला आमनासामना. या क्षणापासून ती मृत्यूचा चेहरा शोधू लागली. एकूणच तिने काढलेल्या फोटोंत मग मृत्यू आपली वेगळी छाप सोडू लागला. मेक्सिकोतल्या मृत्यूविषयीच्या काही प्रथा तिला मोठ्या गमतीशीर आणि मरणाचं वेगळंच चित्र रंगवणाऱ्या वाटू लागल्या. कुठल्याही शहराच्या सांस्कृतिक खुणा या तिथल्या प्रथांमधून दिसत असतात. मेक्सिकोतल्या अशाच प्रथा ग्रॅसीएलाच्या फोटोत दिसतात. मृत्यू भोवतीच्या प्रथांच्या फोटोमध्ये सगळ्यात आधी उल्लेख करावा असे फोटो म्हणजे 'Día de muertos / Day of the Dead' या प्रथे भोवतीचे.
एक सण मृत्यूचा -
'डे ऑफ डेड' हा मेक्सिकोतला एक उत्सव आहे. यात मृत नातेवाईकांच्या आवडत्या वस्तू, खाद्यपदार्थ सजवून ठेवल्यावर ते त्या दिवशी पुन्हा घरी येतात असं मानलं जातं. हे खरंतर काही अंशी आपल्याकडच्या वर्षश्राद्धासारखंच आहे. पण आपल्याकडे त्याभोवती श्रद्धा आणि अंधश्रद्धेचं अवडंबर अधिक जाणवतं. सगळं नीट होईल ना याचीच धास्ती अधिक असते. मेक्सिकोत मात्र हा मृत्यूचा सण मोठ्या आनंदात साजरा करतात. तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे चढवून, चित्रविचित्र पोशाख करून मिरवणूक काढतात. ग्रॅसीएलाच्या कॅमेऱ्यात टिपले गेलेले हे असे चित्रविचित्र क्षण मोठे गमतीशीर आहेत. तिच्या एका फोटोत हाडांच्या सापळ्यासारखा पोशाख अंगावर चढवून चालणारी व्यक्ती आणि अजून आजूबाजूला अशाच विचित्र वेशातली माणसं दिसतात. ग्रॅसीएला याविषयी आपल्या भाषेत भरभरून बोलताना म्हणते, "माझं शहर हे असंच आहे. चमत्कारिक दृश्यांनी भरलेलं, प्रथांच्या जंजाळावर पोसलं गेलेलं. या इथे माणसं मृत्यू हसत - खेळत जगतात, त्याच्याच सोबत मरतात ही."
मेक्सिकोतल्या मृत्यूविषयीच्या प्रथांविषयी जगभर बोलताना ही असंच म्हटलं जातं. मृत्यू हा जीवनाचा क्रमप्राप्त असा भागच आहे. माणसं मरण पावली तरी आपल्या कुटुंबाचा भागच असतात. ती आपल्या स्मृतीत जिवंत असतात. त्यांना या दिवशी घरी बोलावतात, त्यांचा आदर सत्कार करतात. इथली माणसं खरोखरीच हे सगळं मनोभावे करतात. तो दिवस जगून घेतात. ग्रॅसीएलासारख्या कलाकाराला याची भुरळ पाडेल असंच आहे. म्हणूनच अंगावर येणारे, विचित्र वाटणारे आणि तरी विनोदी फोटो तिने आवर्जून टिपले असावेत.
मृत्यू पुसून टाकणारी, ज्या घरातल्या माणसाचा जीव जातो ते घर मृत्यूनंतर दहा दिवसांच्या आत रंगवणारी, गेलेल्या माणसाच्या वस्तूही त्याच्याच सोबत जाळून टाकणारी, त्यांचे भिंती वरचे स्पर्शही पुसून टाकणारी, अंत्यविधीच्या मंत्रोच्चारात अमक्याचा हा गेला, तमक्याचा तो गेला म्हणत जाणाऱ्याला सद्गती देणारी, स्वतःला आणि त्याला नात्यांच्या बंधनातून सोडवून घेणारी माणसं, आपल्याला परिचित असलेल्या प्रथा एकीकडे आणि ग्रॅसीएलाच्या प्रांतातली माणसं तिच्या फोटोंमधून दिसणारा मृत्यूचा स्वीकार एकीकडे. असं राहून राहून वाटत राहातं. म्हणूनच तिला वाटत असावं की माणसं मृत्याला सामोरं जाण्याची तयारी करतात. असं तिचं एखादं वाक्य आपण पचवू लागतो आणि तेवढ्यात भल्या मोठ्या भिंतीसमोर वेडिंग गाऊनमधला एक सापळा दिसतो. आता गंमत अशी की ही वेशभूषा आणि सणाचा संबंध लावावा, की लग्न हे एका अर्थी मरणच असतं हा तर्क लावून पोटभर हसावं हे पटकन आपल्याला समजतच नाही.
एकाच वेळी हाय कॉन्ट्रास्टमधले हे फोटो गंमतीशीर, विचित्र आणि विचार करायला भाग पाडणारे ही वाटतात. मग एका बेकरीच्या काचेवर ती काचेची खिडकी सजवणारे दोन कार्टूनसारखे सांगाडे दिसतात. आणि वाटायला लागतं ग्रॅसीएलाने ज्या देशात, शहरात फोटोग्राफी केली त्या शहराची प्रकृतीच तशी असावी का? की या गोऱ्या आजीलाच तेवढी ही मृत्यूच्या स्वीकाराची दृष्टी देवाने दिली असावी?
ग्रॅसीएला सांगते की ती जे फोटोत टिपते ते आपल्याला फोटोतल्यासारखं दिसतं कारण तिला ती प्रतीकं तशीच दिसलेली असतात, जाणवलेली असतात. म्हणूनच की काय चालताना गडद शालीत स्वतःला लपेटून घेतलेल्या तीन शोकाकुल स्त्रियांच्या फोटोतला शोक हा संथ, प्रवाही, संयमी वाटतो. त्यात आक्रस्ताळेपणा नाही. गडद शाली, त्या स्त्रियांचे त्याहून जरा उजळ चेहरे आणि त्याहून उजळ असा कोपऱ्यात दिसणारा चिमुकला हात. हे एकूणच कंपोझिशन फोटोतलं असलं तरी ते काळाचं प्रातिनिधिक रूप वाटू लागतं. यात जीवनाचं चक्र पूर्ण होत राहतं. ग्रॅसीएलाच्या सगळ्या छायाचित्रांचं हे खरंतर वैशिष्ट्य म्हणायला हवं. त्यातला शोध बिंदूतून सुरु होऊन बिंदूंतूच संपणारा आहे. म्हणूनच की काय, ते फोटो मृत्यचे असले तरी जीवनकेंद्री आहेत असंच वाटतं.
देवाची भेट देवाला
Dolores Hidalgo हा असाच एक हृदयस्पर्शी फोटो आहे. त्याच्यासारख्याच आणखी एका फोटोत दोन - तीन लहान मुलं आणि बाजूलाच एका तान्ह्या बाळाची शवपेटी असलेला एक फोटो आहे. या फोटोत मात्र फक्त ती सजवलेली शवपेटी आहे. त्यात तान्हा निष्प्राण देह आहे, त्यावर काही फुलं आहेत. आपण लहान मुलांना देवाघरची फुलं किंवा गॉड गिफ्ट म्हणतो. तसंच गिफ्ट देवाने पृथ्वीवर पाठवलं होतं आणि आता ते पुन्हा देवाकडेच पाठवलं जातंय. आता दस्तरखुद्द देवालाच जर भेट पाठवायची तर ती नेटकी पाठवावी लागणार, म्हणून ही पेटी अशी सजवलेली आहे की काय? असं वाटून जातं. जणू देवाच्या हाती जेव्हा हे गिफ्ट पडल्यावर तो त्या बाळात नव्याने प्राण फुंकणार आहे. त्यामुळे मरण हा ही त्या बाळाच्या नव्या प्रवासाचा आरंभबिंदू म्हणावा का? हे तो फोटो पाहताना वाटून जातं.
सावध करणारा मृत्यू
Dolores Hidalgo क्लिक करून झाल्यावर बाळाच्या अंत्ययात्रेत चालत असताना त्या बाळाच्या वडिलांनी चालताचालता ग्रॅसीएलाचं लक्ष जमिनीवर पडलेल्या बेवारस प्रेताकडे वेधलं. सर्व धार्मिक विधी आटोपल्यावर पुन्हा या जागी परतू तेव्हा आपण याचा फोटो काढू असा विचार करून ती पुढे गेली. परतून पुन्हा ती त्या जागी आली तेव्हा तो मृतदेह तिथे नव्हताच. तिने वर आकाशात पाहिलं आकाश पाखरांनी भरलेलं होतं, मृत्यूचं नामोनिशाण ही जमिनीवर उरलेलं नव्हतं. ती तिथेच थबकली. या क्षणाविषयी म्हणताना ग्रॅसीएला म्हणते जणू मृत्यूने मला रोखलं असावं. माझ्या हाती पक्षी हा नवा विषय दिला असावा. खरोखरच या प्रसंगानंतर ती पक्षी आणि त्यांच्या बळी देण्याच्या प्रथा यावर काम करू लागली.
ग्रॅसीएला नावाची संस्कृती वाहून नेणारी नदी -
ग्रॅसीएलाच्या फोटोंचा विचार करत असताना काही गोष्टी आपलं लक्ष वेधून घेतात. त्यातल्या स्त्री प्रतिमा या सूचक असतात. त्या प्रस्थापित समाजातल्या वाटत नाहीत. त्या दुर्लक्षित अल्पसंख्याक समाजातल्या असतात. म्हणूनच की काय, त्या व्यापक, खऱ्या, निसर्गाच्या अधिक जवळच्या वाटतात. त्या नाजूक नाहीत. रांगड्या आहेत. तरीही त्या सुंदर आहेत. कारण ग्रॅसीएला त्यांचं सौंदर्य, संस्कृती जगाला माहित व्हावी म्हूणन सन्मानपूर्वक त्यांचे फोटो काढून त्यांना आपल्या लेन्सकथेचा भाग बनवत आली आहे. दुर्लक्षित घटकांना, प्रथांना, प्रश्नांना त्यांच्या परवानगीने जगासमोर आणावं हे तिचं तत्व होतं. त्यात वास्तव असावं. पण ते पाहून कुणाला करूणा वाटू नये, त्रास होऊ नये हे कधीच तिला वाटलं नाही.
घोरपडीचा मुकुट ल्यायलेली आणि एका शहराची ओळख झालेली स्त्री, सेरी या अल्पसंख्याकांच्या जगाच्या प्रवाहात येत जाण्याच्या खुणा, सोनोराच्या वाळवंटातील स्त्रियांचा फोटो, हातात रेडिओ असणाऱ्या बाईचा पाठमोरा फोटो, हाताच्या प्रतिकृती घेऊन उभ्या असणाऱ्या लहानग्या मुलीचा आणि वृद्ध स्त्रीचा फोटो, आरसा धरलेला पण स्त्रीवेषात असणाऱ्या पुरुषाचा फोटो.... असे कितीतरी फोटो विलक्षण असे आहेत. ग्रॅसीएलाने त्यांना दिलेली शीर्षक मोठी मार्मिक असतात. त्यात गर्भित-गहन अर्थ असतात. सोबत त्यांना अर्थपूर्ण करणारे काळा आणि पांढरा असे दोनच रंग असतात. जणू संस्कृतीच्या खुणा वाहून आणत असताना तिने जन्म आणि मृत्यू हे दोन चेहरे आपल्या फोटोत मोठ्या खुबीने एकाच वेळी दिसावेत.
ग्रॅसीएला एक बंडखोर मायाळू आजीग्रॅसीएला एक बंडखोर मायाळू आजी
फोटोग्राफीतल्या कामासाठी ग्रॅसीएला इटर्बाइडला अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले. तिने फ्रिडाची वेदना टिपली. म्युझियममध्ये ग्रॅसीएलाचे फोटो संग्रही ठेवलेले आहेत. तरी ही गोरी आजी जगभर आपला कॅमेरा आणि त्यात कैद केलेल्या लेन्सकथा घेत मातृभाषेतून बोलत क्युबा, जर्मनी, फ्रान्स, युनायटेड स्टेटस् अशी भ्रमंती करत राहिली. कधी प्रत्यक्ष मृत्यू टिपला, कधी त्याच्या खुणा टिपल्या, तर कधी Goat's Dance, Before the Slaughter सारख्या फोटोत कसायाने कापण्याआधी समाधानाने मिटल्या डोळ्यांनी शेवटचे काही श्वास घेणाऱ्या बकरीच्या फोटोतून तिचं माणसाला पर्यायाने मृत्याला शरण येणं दाखवलं. स्वतःच्या डोळ्यांवर अनुक्रमे एक मृत आणि एक जिवंत पक्षी धरून काढलेल्या सेल्फ पोर्टेटमधून या गोऱ्या आजीने मृत्यूचा स्वीकार दाखवला. जणू मृत्यूला स्वीकार हे नाव द्या हेच ती आपल्या फोटोतून सांगू, सुचवू पाहतेय.
ती हा स्वीकार सहजासहजी शिकली नसावी. त्यासाठी ती तावून सुलाखून काही अनुभवांतून गेली. बंड पुकारलं. तिचं हे बंड आपल्याच माणसांविरुद्धचं होतं. त्याविषयी सांगत असताना ती म्हणते, "सुरुवातीच्या काळात माझ्या घरच्यांच्या विरोधाला मला सामोरं जावं लागलं. अर्थात तेव्हाच्या परिस्थितीत तेच माझ्या आयुष्याचे निर्णयकर्ते होते. आणि त्यांच्या लेखी मी होते तरी कोण? फिल्ममेकिंग शिकलेली, नवऱ्यापासून विभक्त झालेली एक ठार वेडी." हे सांगत असताना ती सूचकपणे स्त्री, संस्कृती, संस्कार, जगाची रीत, समाज मानसिकता, विरोध आणि तरीही स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची असणारी धग याविषयी बोलते. मुलींना स्वतंत्र, कणखर होण्याचे धडे देते.
५० वर्षं फोटोग्राफीसाठी स्वतःला वाहून घेत, पछाडलं जाऊन काम करणारी दूर देशातली बाई मृत्यूविषयी आकर्षण असणाऱ्या, त्यांकडे फोटोग्राफीचा विषय म्हणून पाहणाऱ्या पिढीला जवळची वाटते. ग्रॅसीएला आपल्याच मातीतल्या एखाद्या आजीने प्रथा, परंपरा सांगाव्यात इतकी आपली वाटते. एक अशी आजी जिने काळाच्या गालावरचे मृत्यूचे ओघळ आपल्या हातांनी पुसले आणि कॅमेरा नावाच्या डबीत साठवले, मृत्यूचा नवा चेहरा दाखवत जगाचे डोळे टिपले. "मृत्यू - मृत्यू म्हणजे काय? तर फक्त स्वीकार!!." हेच ती जगाला मातृभाषा आणि सर्वसमावेशक अशी दृश्यभाषा या दोन्ही माध्यमांतून सांगत आली. जिने जन्म-मृत्यूचं पारडं आपल्या फोटोंत समतोल साधेल असं ठेवलं.