computer

एलआयसीच्या आयपीओचा अर्ज भरण्यापूर्वी हे नक्की वाचा.पुढच्याच आठवड्यात येतो आहे पब्लिक इश्यू !

ऐक ना ! आता आपलं फिक्स ना ? 
होय्य्य! एकदम फिस्क !
आपण सांगायचं का आता सगळ्यांना ? 
घाई नको, लोकं काय म्हणतील ते बघू !
मग पुढच्या महिन्यात सांगूया  ? 
बघू या ! आज ना उद्या सांगावं लागणारच आहे ना ?
आणि तसाही कितीजणांना आपल्यात इंटरेस्ट आहे ?
आपल्या भावकीत तर सगळेच वाट बघतायंत.
आणि बाकीच्यांचं काय ?
फुकटाच्या भावात असेल तर सगळ्यांनाच ! 
जाऊ देत, होईल ते जाईल, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण आपलं उरकूनच टाकू या ! 
वाचकहो,हे दोन प्रेमीकांचे संभाषण नाही. 
आज नको ,उद्या ! उद्या नको परवा अशा पध्दतीने ढकलत गेलेल्या एलाआयसीच्या पब्लिक इश्युबद्दल आहे
अनेकवेळा तारखा पुढे पुढे ढकलत भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ आता ४ तारखेला येतो आहे !

जाऊ द्या विनोदाचा भाग बा़जूला ठेवू या.भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या या निर्गुंतवणूकीकरण करून सरकार २१००० कोटी उभे करते आहे. या  प्रस्तावाचा विचार करण्यापूर्वी आमची वाचकांना एक नम्र सूचना अशी आहे की तूर्तास तुमचा राजकीय कल बाजूस ठेवून हा लेख वाचा.

आपल्या बचतीचे रूपांतर सार्वकालीन महागाईला पुरून उरेल अशा चलनात करण्याची ही उत्तम संधी आहे.कदाचित हे समभाग ताबडतोब पैसे मिळवून देणार नाहीत पण दीर्घकालीन गुंतवणूकची ही उत्तम संधी आहे असे आम्हाला वाटते. चला तर बघू या काय आहे आपल्यासाठी या आयपीओमध्ये !

१ भारतीय आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ -पब्लीक इश्यू -  मे महिन्याच्या चार तारखेला बाजारात येतो आहे. 
२ एकूण भाग भांडवलापैकी ३.५% समभाग सर्वसाधारण जनतेसाठी आता उपलब्ध असतील.
३ प्राइस बँड ९०२- ९४९ असा आहे. जर ९४९ रुपयांची किंमत गृहित धरली तर सरकारला २१००० कोटी रुपये मिळणार आहेत.
४ या पब्लीक इश्यूत पॉलीसीधारकांसाठी १०% राखीव कोटा आहे.
५ या व्यतिरिक्त ०.७१% महामंडळाच्या कर्मचार्‍यांसाठी राखीव आहे.
६ रिटेल कस्टमर म्हणजे किरकोळ ग्राहकांचा कोटा ३५% आहे. 
असे आहेत या आयपीचे ठळक मुद्दे. 

आता आपण बघू या आपल्या फायद्याचे मुद्दे ! 
लक्षात घ्या , किरकोळ ग्राहकाला वर उल्लेख केलेल्या सर्व राखीव कोट्यातून अर्ज करण्याची मुभा आहे.
आता या राखीव कोट्यात दाबून पैसे टाका असे सगळेच म्हणत असतील पण त्यावर काही मर्यादा आहेत त्या समजून घ्या.
१ तुम्ही फक्त किरकोळ कोट्यातून अर्ज करणार असाल तर जास्तीतजास्त २ लाखांचा अर्ज भरू शकाल.
२ समजा तुम्ही किरकोळ ग्राहक आणि पॉलीसीधारक या दोन्हीत अर्ज करणार असाल तर जास्तीतजास्त ४ लाखांचा अर्ज भरू शकाल.
३ तुम्ही सगळ्याच म्हणजे (किरकोळ ग्राहक +कर्मचारी + पॉलीसीधारक) राखीव कोट्यातून अर्ज करणार असाल तर ही मर्यादा ६ लाखांची आहे.

 हे झाले जास्तीतजास्त गुंतवणूकीचे नियम पण सगळ्यांकडे इतके पैसे असतीलच असे नाही. कमीतकमी गुंतवणूक करायची असेल तर ही मर्यादा १५ समभागांची आहे. 

पॉलीसीधारक अर्जदारांना फायनल कट ऑफ प्राइसवर ६० रुपये डिस्काऊंट मिळणार आहे.कर्मचारी आणि इतर छोट्या किरकोळ अर्जदारांना ४५ रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे

आता आणखी काही महत्वाचे ! 
१ जर तुम्ही पॉलीसीधारकांच्या कोट्यातून अर्ज करत असाल तर तुमचे पॅन कार्ड पॉलीसीसोबत जोडलेले असलेच पाहिजे. तसे नसेल तर आता धावपळ करू नका. शेवटची तारीख निघून गेली आहे.
२ अर्जदाराच्या नावाचे डिमॅट खाते अर्ज करताना तयार असले पाहिजे. 
३ अर्ज फक्त ASBA  (application supported by blocked amount) च्या माध्यमातून करता येतील
४ UPI च्या माध्यमातून्ही अर्ज करता येईल. UPI  तुमच्याच नावाचे असले पाहिजे.

छापील फॉर्मही उपलब्ध आहेत पण तो मार्ग वापरू नका. फॉर्म किचकट असतात. फॉर्म भरताना काही तृटी असली तर अर्ज नाकारला जातो.

आयपीओ मेच्या ४ तारखेला उघडेल आणि ९ तारखेला बंद होईल. १७ मे रोजी शेअरचे लिस्टिंग होईल.
तुम्ही पैसे जमवाल, अर्ज कराल , कदाचित शेअर तुम्हाला मिळतीलही पण एक महत्वाचा प्रश्न उरतोच की लिस्टिंग झाल्यावर किती फायदा होईल. शेअरचा भाव दणदणीत वरच्या अंगाला असेल की पेटीएम सारखं काही होईल ?
हे आताच सांगणं अयोग्य आहे. परंतू ग्रे मार्केटला आत्ताच्या घडीस हा समभाग नफ्यात विकला जातो आहे. परंतू ग्रे मार्केटमध्ये सहभागी व्हा असे आम्ही कधीच म्हणणार नाही.

पण हा समभाग जिंदगी के साथ भी और जिंदगीके बाद भी ! असाच असेल 

सबस्क्राईब करा

* indicates required