चिम्पान्झी ऐकलंय पण हे ह्यूमांझी काय असतं? भेटा जगातील सर्वात प्रसिद्ध ह्यूमांझी ऑलिव्हरला !!
चिंपांझी माहित आहे, पण हे ह्यूमांझी काय प्रकरण आहे असा प्रश्न पडला असेल ना? तर ही गोष्ट आहे माणूस (Human) + चिंपांझी (Chimpanzee) = Humanzeeची. वाचायला थोडं वेगळं वाटतंय ना? आणि मनात प्रश्नही बरेच आले असतील. त्या सगळ्यांच्या उत्तरासाठी चला वाचूया विचित्र ह्यूमांझीची गोष्ट.
ही गोष्ट आहे ऑलिव्हर नावाच्या चिंपांझीची. तो सेन्ट्रल आफ्रिकेतल्या काँगो नावाच्या देशात जन्मला. त्याची ख्याती नंतर जगभर पसरली. आता तुम्ही म्हणाल एक चिंपांझी बाकी चिंपांझीसारखाच, त्याची काय जगभर ख्याती पसरली?
ऑलिव्हरमध्ये काय विशेष काय होतं?
इतर सर्वसाधारण चिंपांझी आणि ऑलिव्हरचा चेहरा ह्यामध्ये बराच फरक होता. त्याचा चेहरा अगदी माणसासारखा दिसायचा. त्याचे डोके अंडाकार होते आणि मुख्य म्हणजे त्याच्या डोक्यावर बाकी चिंपाझींप्रमाणे केस नव्हते. त्याचा जबडाही इतरांप्रमाणे मोठा फुगीर नव्हता. त्याचे कपाळ माणसासारखे केस विरहित होते, बाकी चिंपांझीसारखे केसाळ नव्हते. त्याच्या त्वचेचा रंग गुलाबी-तपकिरी असा होता. इतर चिंपांझीचे साधारणतः गोलाकार कान असतात, पण या ऑलिव्हरचे कान टोकदार होते.
(सामान्य चिम्पान्झी)
बाकी हा ऑलिव्हर आणि इतर चिंपाझींमधला फरक हा फक्त त्यांच्या बाह्य रुपापुरताच मर्यादित नव्हता. हा ऑलिव्हरबाबा माणसांप्रमाणे बिनधास्त सिगरेटदेखील ओढायचा. टीव्ही पाहायला त्याला खूप आवडायचे. बाकी चिंपांझीमध्ये मिसळण्याची त्याची अजिबात इच्छा नसायची. त्यापेक्षा त्याला माणसांच्या सहवासात राहाणे आवडायचे. सर्वात महत्वाचा फरक हा की बाकी चिंपांझी खूप कमी वेळापुरतं दोन पायावर चालू शकतात, पण ऑलिव्हर चार वर्षांचा असल्यापासून माणसाप्रमाणे फक्त दोन पायांवर चालायचा. ऑलिव्हरची सर्वात पहिली मालकीण जानेट बर्जर हिच्या म्हणण्यानुसार ऑलिव्हर इतर चिंपाझींसारखा अजिबात नव्हता. तो स्वतः कॉफी करून घेऊन निवांत टीव्ही पाहत कॉफी प्यायचा. अगदी एखाद्या माणसासारखंच!! तो इतर माकडांसारख्या सतत उड्यादेखील मारायचा नाही.
पण, हा चमत्कारिक ऑलिव्हर आला कुठून?
१९७० मध्ये फ्रँक आणि जानेट बर्जर ह्यांनी सेन्ट्रल आफ्रिकेतल्या काँगो या देशातून ऑलिव्हरला ब्लॅकवूड (न्यू जर्सी) येथे आणले. त्यावेळी तो फक्त चार महिन्यांचा होता. सोळाव्या वर्षांपर्यंत तो तिथेच राहिला. जानेट आणि फ्रांक हे दोघे त्यावेळी कुत्रे, चिम्पान्झी, डुक्कर ह्यांना घेऊन साईड शो आणि सर्कस करायचे. जानेट सांगते, "ऑलिव्हर तिला तिच्या रोजच्या कामात मदत करायचा. कुत्र्यांना खायला देणे, ढकलगाडीमधून सामानाची ने-आण करणे. दिवसभर कामात मदत केल्यावर तो रात्री निवांत टीव्ही पाहत बसायचा. कधीकधी तर तो ग्लासमध्ये थोडी विस्की, थोडं सेव्हन-अप, थोडं पाणी मिक्स करून आपलं ड्रिंक स्वतः तयार करून घ्यायचा. तर कधी झोपण्यापूर्वी बिअर आणि सिगारेटही प्यायचा."
(जानेट बर्जर)
जानेट हे देखील सांगते की, बाकी चिम्पान्झींप्रमाणे ऑलिव्हरच्या शरीराचा वास यायचा नाही, त्याची जीभ ही नेहमी बाहेर आलेली असायची. बाकी चिंपाझी उड्या मारायचे, झाडावर चढायचे.. पण ऑलिव्हर मात्र त्या सर्वांपेक्षा शारीरिक ठेवण आणि वागण्यामध्ये खूप वेगळा होता. जानेट ह्यांच्या म्हणण्यानुसार ऑलिव्हर त्यांच्याकडे आणि बाकी महिलांकडे शारीरिक दृष्ट्या आकर्षित झाला होता. तसा तो काही इजा पोहोचवायचा नाही, पण तो कीस करायचा, मिठी मारायचा. ऑलिव्हरने वयात आल्यावर म्हणजे सोळाव्या वर्षी जानेटसोबत संग करण्याचा प्रयत्न केला होता. याच कारणाने त्याला दूर करावे लागले होते. अखेर त्यांनी त्याला विकण्याचा निर्णय घेतला.
ऑलिव्हरचे पुढे काय झाले?
जानेट ह्यांनी ऑलिव्हरला न्यूयोर्कमधले एक वकील मायकेल मिलर ह्यांना ८००० डॉलरला विकले. या मायकेल मिलरनी ऑलिव्हरची ख्याती सातासमुद्रापार पोहोचवण्यात मोठा वाटा उचलला. जगासमोर त्यांनी ऑलिव्हरला मनुष्य आणि चिम्पान्झीमधली एक ”मिसिंग लिंक” म्हणून उभे केले. अर्थातच लोकांमध्ये ऑलिव्हरविषयी प्रचंड कुतुहल निर्माण झाले होते. पुढे जाऊन मिलर ह्यांनी ऑलिव्हरला राल्फ हेल्फर ह्या इसमास विकले. तो Enchanted Village (California) नावाच्या थीम पार्कचा पार्टनर होता. एका वर्षात ते थीम पार्क विकले गेले, परंतु हेल्फर ह्यांनी ऑलिव्हरचे शो चालूच ठेवले होते.
ऑलिव्हरची प्रसिद्धी...
ऑलिव्हरचे सर्व शो हाउसफुल्ल असायचे. लोकांमध्ये त्याच्याविषयी आकर्षण वाढतच होते. १९७७ साली जपानी टेलिव्हिजनवर ‘ऑलिव्हर: ह्युमन किंवा एप’ हा शो झाला. २६ मिलियन लोकांनी तो पहिला. एलए टाईम्सने “मिसिंग लिंक” किंवा चिम्पान्झीची नवीन जात सापडली असं आपल्या मुखपृष्ठातून ऑलिव्हरला लोकांसमोर आणलं. टीव्ही शो, व्यावसायिक जाहिरातीमध्ये ऑंलिवर झळकला. डिस्कव्हरी चायनल आणि अनसॉल्वड मिस्ट्रीजवरही तो झळकला. न्यूयॉर्कमधल्या एक्सप्लोरर्स क्लबपासून ते जपान टेलिव्हिजन सर्वत्र त्याचे शो चालूच होते.
ऑलिव्हरची वादग्रस्त जपान ट्रीप :
ऑलिव्हरने एकदा जपानला भेट दिली. जपानी मीडियाने त्याचे विमानतळावर जोरदार स्वागत केले. जपानी वैद्यानिकांनी त्याची DNA टेस्ट केली. ह्या टेस्टचे सारे व्हिडीओज टेलेव्हिजनवर प्रसारीत करण्यात आले होते. टेस्टच्या निकालानुसार वैद्यानिकांच्या मते ऑलिव्हरमध्ये ४७ क्रोमोझोम्स होते. मनुष्यांमध्ये ४६ आणि चिम्पान्झी मध्ये ४८ क्रोमोझोम्स असतात. पण ऑलिव्हरमध्ये ४७ असून ते माणसांत असणाऱ्या ४६ पेक्षा एक जास्त आणि सामान्य चिम्पान्झीपेक्षा एकने कमी होते. म्हणून ऑलिव्हर हा हायब्रीड आहे असे मानून त्याला ह्यूमांझी म्हणून घोषित करण्यात आले.
इथेच एक पत्रकार परिषदही घेण्यात आली होती. याच परिषदेदरम्यान जपानमधील एका अभिनेत्रीने आपण ऑलिव्हरसोबत संग करण्यासाठी तयार आहोत आणि हा व्हिडीओ वैद्यानिक जागृतीसाठी टीव्हीवर लाइव्ह प्रसारित केला जावा अशी खळबळजनक वक्तव्ये केली. असे काहीच झाले नाही. मिलर ह्यावर प्रतिक्रिया देताना म्हणतात की हा कदाचित प्रसिद्धी मिळवण्यासठी केलेला नाटकाचा एक भाग होता.
ऑलिव्हरचे पुढचे आयुष्य एका ट्रेनरकडून दुसऱ्या ट्रेनरकडे असे व्यतित झाले.उपलब्ध माहितीनुसार १९८० साली त्याला पेनसिल्वानिया मधील एका वैज्ञानिक प्रयोगशाळेत प्रयोगासाठी म्हणून विकण्यात आले होते. ऑलिव्हरचे नशीब चांगले होते, त्यामुळे त्याला कोणत्याही वैज्ञानिक प्रयोगासाठी वापरण्यात आले नाही. तिथे सात वर्षं त्याला एका छोट्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते. 'प्रायमरीली प्रामेटस संक्च्युअरी टेक्सास'(Primarily Primates)मध्ये त्याने आपल्या आयुष्याची शेवटची वर्षे व्यतित केली. उतारवयात त्याला संधिवाताचा त्रास सुरु झाला होता. संक्च्युअरीचे मालक स्वेट यांच्या म्हणण्यानुसार ऑलिव्हर हा बाकी चिंपांझीपेक्षा दिसण्यात आणि चालण्याच्या पद्धतीमध्ये खूप वेगळा होता. तो कधी इतर चिंपांझींमध्ये मिसळत नसे. स्वेट यांच्या विनंतीवरून शिकागो विद्यापीठातल्या जेनेटिक वैज्ञानिक डॉ. डेविड लेडबेटर यांनी ऑलिव्हरचा जेनेटिक अभ्यास केला.
ह्या अभ्यासानुसार ऑलिव्हरच्या शरीरात ४८ क्रोमोझोम्स होते. ह्या आधी जपानी वैद्यानिकांनी केलेला ४७ क्रोमोझोम्सचा दावा डॉ. डेविड ह्यांनी साफ फेटाळून लावला.
कुतूहल, वादविवाद, आश्चर्याने भरलेल्या ऑलिव्हरचा मृत्यू वयाच्या ५२ व्या वर्षी म्हणजे २ जून २०१२ ला झोपेत झाला. त्याच्या मृत्युनंतरही त्याच्या वेगळेपणावरून म्हणा किंवा न मिळालेल्या काही उत्तरांमुळे म्हणा, तो आजही चर्चेत असतो. २०१८ मध्ये प्रसिद्ध उत्क्रांतीवादी मानसशास्त्रद्य गोर्डन गलप ह्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानुसार १९२० मध्ये फ्लोरिडामधील प्रयोगशाळेत माणूस आणि चिम्पाझीमध्ये संकराचे प्रयोग यशस्वी ठरले होते. त्यामुळे ऑलिव्हरभोवती निर्माण झालेले गूढतेचे वलय आणखी गडद होत गेले.
तर ऑलिव्हर ह्यूमान्झी होता का? किंवा तो फक्त बाकी चिम्पान्झीपेक्षा हुशार होता का? किंवा त्याला ट्रेनिंग देऊन दोन पायांवर चालायला शिकवले होते का? किंवा माणसांचे अनुकरण करायचे म्हणून तो स्वतःच दोन पायांवर चालायचा का? असे एक न अनेक प्रश्न आजही कोड्यात टाकणारे आहेत.
लेखिका : स्नेहल यशवंत बंडगर