चायनीज वस्तू आणि ॲप्स टाळताय? पण मग या कंपन्यांनाही टाळाल का?
एकीकडे चीनने अख्या जगाला कोरोनाच्या महासंकटात ढकललंय, तर दुसरीकडे त्यांनी भारतीय भूमीवर अतिक्रमण करत सीमेवरही तणाव निर्माण केलाय. साहजिकच त्यामुळे देशात आता चायनीज वस्तूंना मोठा विरोध होताना दिसतोय. वस्तू सोडाच, पण टिकटॉकसारख्या चायनीज ॲप्सनासुध्दा भारतीयांनी नाकारायला सुरूवात केलीय. आपल्या पंतप्रधानांनीही आत्मनिर्भर भारताचा नारा देत देत स्वदेशी उत्पादनांवर भर देण्याचा संकल्प केला आहे. पण यावेळी आपण हेही लक्षात घ्यायला हवं की आपला देश चीनवर किती मोठया प्रमाणात विसंबून आहे.
आक्रमक विस्तारवादी धोरण असणाऱ्या चिनी ड्रॅगनने अनेक देशांवर आपला विळखा अतिशय घट्ट आवळलाय. भारतीय अर्थव्यवस्थेपेक्षा अडीच पटीने मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या चीननं म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका अशा अनेक लहान देशांच्या अर्थव्यवस्था कर्जे आणि गुंतवणूकीच्या जोरावर काबीज केल्या आहेत. भारताच्या एकूण आयातीपैकी २५% आयात ही एकट्या चीनमधून होते. यात प्रामुख्यानं प्रतिजैवकं आणि अत्यावश्यक औषधांच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौर ऊर्जेवरील उत्पादनं, मोबाईल्स, कंप्युटर्स, मौल्यवान खडे इ. गोष्टींचा समावेश आहे. आपल्या भारतातल्या जवळपास ९२ लहान-मोठ्या कंपन्यांमध्ये चायनीज कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. यातली काही नावं ही आपल्या अतिशय ओळखीची आहेत. या कंपन्यांमध्ये चायनीज कंपन्यांनी केलेली गुंतवणूक पाहा.
बिग बास्केट
बंगळूरुमध्ये हेडक्वार्टर असलेलं ऑनलाईन ग्रोसरी स्टोअर
एकूण गुंतवणूक - ८३०४ कोटी रुपये
अलिबाबा ग्रुप आणि TR कॅपीटलची गुंतवणूक - १८९ कोटी रुपयांहून अधिक
बायजू
बंगळूरुमध्ये हेडक्वार्टर असलेलं जगातलं सर्वात मोठं ऑनलाईन शैक्षणिक ॲप
एकूण गुंतवणूक - १०५६८ कोटी रुपये
टेनसेन्ट होल्डिंग्सची गुंतवणूक - ३७७ कोटी रुपयांहून अधिक
Dream 11
मुंबईमध्ये हेडक्वार्टर असलेला फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म
एकूण गुंतवणूक - ७०५५ कोटी रुपये
Steadview कॅपिटल आणि टेनसेन्ट होल्डिंग्सची गुंतवणूक - ११३२ कोटी रुपयांहून अधिक
फ्लिपकार्ट
बंगळूरुमध्ये हेडक्वार्टर असलेली ई-कॉमर्स कंपनी
एकूण गुंतवणूक - ५८, ११० कोटी रुपये
Steadview कॅपिटल आणि टेनसेन्ट होल्डिंग्सची गुंतवणूक - २२६४ कोटी रुपयांहून अधिक
Hike मेसेन्जर (Hike Private Ltd)
इन्स्टंट मेसेजिंग ॲप
एकूण गुंतवणूक - १९७० कोटी रुपये
टेनसेन्ट होल्डिंग्स आणि फॉक्सकॉनची गुंतवणूक - ११३२ कोटी रुपयांहून अधिक
झोमॅटो
भारतीय ऑनलाईन फूड डिलीव्हरी ॲप
एकूण गुंतवणूक - ६९०२ कोटी रुपये
Ant फायनान्शियल, अलिबाबा ग्रुप, Shunwei कॅपिटलची गुंतवणूक - १५०९ कोटी रुपयांहून अधिक
मेक माय ट्रिप
भारतीय ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी
एकूण गुंतवणूक - ४१३५ कोटी रुपये
Ctrip ची गुंतवणूक - १३५८ कोटी रुपये
पॉलिसी बझार
भारतीय ऑनलाईन विमा आणि अर्थविषयक वेबसाइट
एकूण गुंतवणूक - ३७४७कोटी रुपये
Steadview कॅपिटलची गुंतवणूक - ही माहिती आम्हांला उपलब्ध होऊ शकली नाही
पेटीएम
भारतीय ई-कॉमर्स आणि पेमेंट सिस्टम कंपनी
एकूण गुंतवणूक - २.२ बिलीयन डॉलर्स
अलीबाबा ग्रुप आणि SAIF पार्टनर्सची गुंतवणूक - ४०० मिलीयन डॉलर्सहून जास्त
पेटीएम मॉल
भारतीय ई-कॉमर्स कंपनी
एकूण गुंतवणूक - १६६०२ कोटी रुपये
अलिबाबा ग्रुपची गुंतवणूक - ११३१ कोटी रुपयांहून अधिक
ओयो
भारतीय हॉटेल चेन स्टार्ट-अप
एकूण गुंतवणूक - २४,१५८ कोटी रुपये
Didi Chuxing आणि China Lodging ग्रुपकडून गुंतवणूक - ७५५ कोटी रुपयांहून अधिक
ओला
भारतीय ऑनलाईन कॅब ॲग्रीगेटर कंपनी
एकूण गुंतवणूक - २८,६८४ कोटी रुपये
टेनसेन्ट होल्डिंग्स, Steadview कॅपिटल, Sailing कॅपिटल अँन्ड चायना, Eternal Yeild International Ltd, China-Eurasian इकॉनॉमिक को-ऑपरेशन फंड यांच्याकडून केलेली गुंतवणूक - ३७७४ कोटी रुपयांहून अधिक
Swiggy
भारतीय ऑनलाईन फूड डिलीव्हरी ॲप
एकूण गुंतवणूक - १२,०७७ कोटी रुपये
Meituan Dianping, Hillhouse कॅपीटल, टेनसेन्ट होल्डिंग्स, SAIF पार्टनर्सची गुंतवणूक - ३७७४ कोटी रुपयांहून अधिक
स्नॅपडील
भारतीय ई-कॉमर्स कंपनी
एकूण गुंतवणूक - १३,५८७ कोटी रुपये
अलिबाबा ग्रुप आणि FIH मोबाईल लिमिटेड कडून गुंतवणूक - ५२८३ कोटी रुपयांहून अधिक
ही काही पूर्ण यादी नाही. ही फक्त काही प्रमुख कंपन्यांची नावं आहेत ज्यांनी देशातील लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध केलेल्या आहेत. याव्यतिरिक्त शाओमी, ओप्पो, वीवो, वनप्लस या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांनी आपल्या मोठ्या फॅक्टरीज भारतात सुरू करून ५३% बाजारपेठ काबीज केलीय.
चायनीज कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व प्रस्थापित करण्यामागे मूळ कारण आहे दोन्ही देशांच्या ग्राहक मानसिकतेमध्ये असणारं साधर्म्य. आज आपण ज्या टप्प्यावर आहोत तिथे चीन गेल्या दहा वर्षांत होता. म्हणजेच भारतीयांच्या गरजा, मागण्या, आवडीनिवडी आणि मानसशास्त्र त्यांना चांगल्याप्रकारे माहित आहे. चीनमध्ये चाललेल्या डिस्काउंट, EMI अशा लोभावणाऱ्या गोष्टींचा त्यांनी इथेही पुरेपूर वापर केलाय. चीनचा आर्थिक महासत्ता बनण्याचा प्रवास एका दिवसाचा नाही. हा त्या देशाच्या १९९१ ते २०११ पर्यंतच्या दिर्घकालीन नीतीचा परिणाम आहे.
हे सगळं पाहाता आपल्यासाठी चीन म्हणजे आपल्याच भविष्याचा आरसा ठरतो. चीन जिथे आज पोहोचलाय तिथे पोहोचण्यासाठी आपल्याला कदाचित चीनकडूनच काही धडे घ्यावे लागतील.