मेघालयात लोक बांधतात जिवंत पूल...!!!
मेघालयसारख्या दुर्गम भागात जिथे अधिकाधिक प्रदेश झाडांनी आणि नद्यांनी वेढला आहे अशा प्रदेशात दळणवळण ही मुख्य समस्या असते. नदी किंवा ओढ्याच्या एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत जाण्यासाठी काहीच व्यवस्था नसते. याच समस्येवर उपाय म्हणून “लिविंग रूट ब्रिज” म्हणजेच ’जिवंत मुळांपासून बनवलेला पूल’ नावाची संकल्पना इथल्या ’खासी’ आणि ’जयंतिया’ नावाच्या आदिवासी लोकांनी शोधून काढली.
’लिविंग रूट ब्रिज” म्हणजे नदी किंवा ओढ्यावर बनवलेला वडाच्या पारंब्यांचा पुल. या कामात तीन ते चार झाडांचा उपयोग करून पारंब्या पुलाच्या आकारात बांधून घेतल्या जातात. पुढे नैसर्गिकरित्या त्याची वाढ होऊन पारंब्या एकमेकात गुंतत जातात. पूल तयार झाल्यावर चालण्याची जागा तयार करण्यासाठी माती आणि दगडाचा वापर होतो. या कामात १० ते १५ वर्षांचा काळ जाऊ शकतो परंतु एकदा का पूल तयार झाला की जवळ जवळ ५०० माणसे ये-जा करू शकतील एवढा मजबूत पूल तयार होतो. या पुलाची खासियत म्हणजे स्टील किंवा लोखंडाच्या पुलासारखा हा पूल पावसाळ्यात गंजत नाही उलट पावसात झाडाच्या पारंब्या एकमेकात अधिक घट्ट होऊन पूल जास्त मजबूत होतो. मेघालयमधील ’खासी’ आणि ’जयंतिया’ जिल्ह्यात तुम्हाला या प्रकारचे लिविंग रूट ब्रिज पाहायला मिळतील. १०० वर्षापेक्षा जास्त जुने पूलसुद्धा या भागात आहेत. लिविंग रूट ब्रिज इथल्या जनजीवनाचा अविभाज्य घटक बनून गेला आहे.
नैसर्गिकरित्या तयार केलेल्या या पुलांना पाहण्यासाठी हजारो पर्यटक मेघालयला भेट देतात. लिविंग रूट ब्रिजचा नेमका शोध कधी आणि कसा लागला ते कोणालाही माहित नाही पण याचा प्रथम उल्लेख १८४४ च्या ‘जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ मध्ये आढळतो.
जिथे एकीकडे आपण नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शहरांना जोडणारे पूल तयार करत असताना मेघालयातले हे निसर्ग आणि मानव निर्मित लिविंग रूट ब्रिज वेगळा आदर्श ठेवून जातात.