computer

या गोवा मुक्ती संग्रामाच्या सांगलीकर क्रांतीकारकाला सोडवण्यासाठी थेट पोपने मध्यस्थी केली होती...

ब्रिटिश साम्राज्य उलथून टाकणाऱ्या अनेक स्वातंत्र्यवीरांची नावं तुमच्या लक्षात असतील पण या नावांमध्ये क्रांतिकारक मोहन रानडे हे नाव वाचल्याचं तुम्हाला फारसं आठवत नसेल. हे साहजिकच आहे.  मोहन रानडे यांनी  ब्रिटिशांच्या नव्हे, तर पोर्तुगाल सरकारच्या विरोधात सशस्त्र लढा दिला होता. जेव्हा भारत  १९४७ साली ब्रिटीशांच्या अंमलातून मुक्त झाला तेव्हा गोवा आणि पाँडीचेरी हे अनुक्रमे पोर्तुगाल आणि फ्रेंच अंमलाखाली होते. पाँडेचरीला १९५४ नंतर वाटाघाटीतून स्वातंत्र्य मिळाले.  पण गोव्याची स्थिती वेगळी होती. पोर्तुगीज सरकार माघार घ्यायला तयार नव्हते. गोवा मुक्ती संग्रामात मोहन रानडे यांचे नाव अग्रगण्य आहे. २५ जून २०१९ रोजी या क्रांतीकारकाचा देहांत झाला. आज आम्ही घेऊन आलो आहोत या महाराष्ट्राला तितक्याशा माहित नसलेल्या या क्रांतिकारकाचे जीवन चरित्र!!

मोहन रानडे मूळचे सांगलीचे..

सावरकरांचा शब्द झेलून तयार झालेले मोहन रानडे मूळचे सांगलीचे. त्यांचा जन्म १९३० मधला. गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आपणही काहीतरी काम केले पाहिजे ही प्रेरणा घेऊन गोव्यात जायचे त्यांनी ठरवले. वय होते अवघे १७. इतक्या कमी वयात हे विचार येणे म्हणजे काहीतरी वेगळेच बाळकडू मिळालेली व्यक्ती. मोहन रानडे यांचं खरं नाव ' मनोहर आपटे' पण ह्या नावाला  गोव्यात येण्यापूर्वीच या नावाला सोडचिट्ठी दिली आणि "मोहन रानडे" हे नाव घेतलं.......हे आजपर्यत कोणालाही माहिती नाही.'

देशासाठी नाव बदलून आयुष्यभर दुसऱ्या नावाने जगायचं म्हणजे केवढी विलक्षण गोष्ट. पण देशाला वाहून घेणारेच असं काही करू शकतात.
गोव्यात वास्तव्य करायचं तर, काही काम पण करावे लागेल असा विचार करून एका मराठी शाळेत शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केला. बोलावणेही आले. पण कुणीतरी टीप दिली की येणारे हे मराठी शिक्षक हे पोर्तुगीज शासनाविरुद्ध काम करतात आणि तरुण व्यक्ती तर निश्चितच असे काम करतात. झा...लं. ताबडतोब अर्ज रिजेक्ट झाला.

नंतर ते तरुण रक्त असलेल्या गोव्यातल्या एका ग्रुपमध्ये सामील झाले. त्या ग्रुपचे नाव होते 'आझाद गोमंतक दल'. हा ग्रुप गोवा मुक्तीसाठी सशस्त्र लढा देणार होता.  आझाद गोमंतक दल लढ्यासाठी आता शस्त्रे पुरविणार होता.  रानडे गोव्यात आले तेंव्हा त्यांनी ३०० रुपयांचं एक पिस्तुल खरेदी करून ठेवलं होतं. पण आता त्याचा ह्या लढ्यात फारसा उपयोग होणार नव्हता. मोठ्या शस्त्रांची गरज होती आणि ती आता पूर्ण होणार होती.

सगळ्यात आधी त्यांनी हल्ला केला एका पोलीस स्टेशनवर. आत्तापर्यंत कधी कोणावर हल्ला न केलेले किंवा कुठूनही सैनिकी शिक्षण न घेतलेले ते तरुण त्या पोलिसांवर एकदम तुटून पडले. हातात होत्या फक्त बांबूच्या काठ्या. पण हा हल्ला काही सफल झाला नाही. अपेक्षा होती की निदान ५/७ पोलिसांची पिस्तुल्स हाती लागतील पण नाही लागली. पण ह्या हल्ल्यामुळे एक फायदा झाला की ज्यांनी आतापर्यंत कधी मुंगीसुद्धा मारली नव्हती त्यांना त्यांच्यातल्या प्रचंड शक्ती असल्याची जाणीव झाली आणि ते ह्या आंदोलनासाठी आपला प्राण द्यायलाही तयार झाले. त्यामुळे ही  आता ५०/६० जिगरबाज लोकांची टीम झाली.

त्यानंतर १९५५ मध्ये बेतीम पोलीस स्टेशनवर केला अचानक हल्ला केला गेला. हल्ल्याचे प्रमुख मोहन रानडे होते आणि साथीला होती स्टेनगन चालवता येणाऱ्या निवडक १२जणांची टीम. ते  एकटे स्टेनगन घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घुसले. सगळे पोलीस स्टेशनच्या बाहेर तयारीत होते. आत घुसताच समोरच्या हवालदाराला संपवला.  गोळ्यांच्या वर्षावात आणखी काही संपले. पण एकाची गोळी त्यांच्या बरगडीच्या खाली घुसली आणि रानडे खाली कोसळले. अर्थातच ते पोलिसांच्या हाती लागले.
 

अण्णा दुराई आणि पोप..

ह्या पोटात शिरलेल्या गोळीने रानडे यांना वाचवलं. पण पुढे पोर्तुगीजांनी त्यांचे खूप हाल केले. कोर्टाचा निर्णय यायला पुढची ५वर्षं लागली. कोर्टाने मोहन रानडे यांना २६ वर्षाच्या बंदिवासाची शिक्षा सुनावली आणि लगेचच पोर्तुगालला त्यांची रवानगी करण्यात आली. पुढे रोज त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पोर्तुगीज लोक त्यांना अंगावर एकही कपडा ना ठेवता मारायचे. रोज शस्त्राने शरीराला इजा करणे हेही चालूच राहिले. पाच पावलंही चालायची ताकत त्यांच्या शरीरात नव्हती. तरीही छळ चालूच राहिला. त्या कोठडीत त्यांच्यासोबत बोलण्यासाठी दुसरे कोणीच नव्हते. असे त्यांना खूप हाल सहन करावे लागले. 

ही शिक्षा भोगल्यावर त्यांना दुसऱ्या तुरुंगात हलवले. सुदैवाने तिथे काही भारतीय कैदी होते. त्यांच्या सहकार्याने त्यांनी भारत सरकारला त्यांच्या सुटकेबद्दल अनेक पत्रे लिहिली. पण काहीही परिणाम झाला नाही. म्हणून रानडेंनी अनेक देशांच्या दूतावसाशी संपर्क केला आणि सुटकेची मागणी केली. पण शेवटी ही माहिती तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना- अण्णा दुराई- यांना कळली. अण्णा दुराई जेव्हा पोपला भेटले तेव्हा त्यांनी मोहन रानड्यांच्या सुटकेसाठी पोपना मध्यस्थी करण्याची विनंती केली. एक महत्वाची गोष्ट अशी की अण्णा दुराईंना मोहन रानड्यांचे कार्य माहित होते पण ते रानडेंना व्यक्तिशः ओळखत नव्हते. हे ऐकल्यावर पोपना थोडे आश्चर्यच वाटले.  पण त्यांनी मध्यस्थी केली आणि  त्यांच्या मदतीने गोवा मुक्ती संग्रामातल्या सर्व भारतीय कैद्यांची सुटका करण्यात आली. तो भाग्याचा दिवस होता २६ जानेवारी १९६९.  
 

२६वर्षांची शिक्षा १३वर्षं भोगून ह्या सुपुत्रांची सुटका झाली. त्यावेळी ते रोम शहरात होते. तोपर्यंत गोवा ही पोर्तुगीजांच्या हातून मुक्त झाला होता. त्या मुक्त गोव्यात मोहन रानडे यांनी पाऊल ठेवलं आणि धन्य झाले. पुढे २००१ साली मोहन रानडे यांना भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

गोवा मुक्तीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या या महाराष्ट्राच्या सुपुत्राला बोभाटाचा कडक सलाम!!

सबस्क्राईब करा

* indicates required