किस्से नोबेलचे: मरणोत्तर नोबेल मिळालेला जगातला एकमेव शास्त्रज्ञ कोण आहे ? त्याने कोणता शोध लावला होता ?
दरवर्षी नोबेल पुरस्कार कुणाला दिले जातील याची मोथी उत्सुकता असते. अर्थातच एवढा महत्वपूर्ण पुरस्कार म्हटल्यावर त्याचेही काही नियम असतील. तर नोबेलचे दोन महत्वाचे नियम आहेत. एक म्हणजे एका क्षेत्रात तीनपेक्षा जास्त लोकांना हा पुरस्कार दिला जात नाही आणि दुसरा म्हणजे १९७४ नंतर हा पुरस्कार फक्त जिवंत लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो.
नोबेलचा इतिहास १२० वर्षं जुना आहे. इतक्या वर्षांत फक्त एकाच शास्त्रज्ञाला मरणोत्तर नोबेल घोषित झाला आहे. १९७३ साली कॅनडात राहणाऱ्या रॉल्फ स्टाईनमन यांनी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेला कुठल्याही जीवाणू किंवा विषाणूंबद्दल माहिती देणाऱ्या अशा पेशींचा शोध लावला. रोगापासून बचाव करणाऱ्या या पेशींचे नाव त्यांनी ठेवले डेंड्रिटिक!! त्यावेळी स्टाईनमन यांच्या या शोधाला विशेष महत्व दिले गेले नाही. मग स्टाईनमन यांनी आपल्या दोन साथीदारांच्या सोबतीने पुढील दहा वंर्ष या डेंड्रिटिक पेशींवर संशोधन केले. शेवटी त्यांनी केलेला भरीव शोध जगाला मान्य करावा लागला.
स्टाईनमन यांनी या क्षेत्रात उपचारांच्या नविन पद्धतीला चालना दिली. पण त्यांचे दुर्दैव असे की २००७साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले. कॅन्सर असून देखील त्यांचे शोधकार्य सुरूच होते. संशोधक आपल्या शोध कार्यासाठी स्वत:ला इतके वाहून घेतात की ते स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करत नाहित. हे स्टाईनमनदेखील त्यांच्यातलेच एक!!!
आपले शोधकार्य सुरु असताना त्यांनी स्वतःच्या शरीरावरच अनेक प्रयोग केले. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यांना एकच इच्छा होती ती म्हणजे आपल्या शोधासाठी आपल्याला नोबेल पुरस्कार देण्यात येईल. विशेष गोष्ट म्हणजे नोबेल पुरस्कार घोषित व्हायच्या काहीच दिवस आधी ते आपल्या कुटुंबियांसोबत बोलताना म्हणाले होते, मला काही दिवस जिवंत रहावे लागेल, कारण मरणोत्तर नोबेल दिला जात नाही.
पण नोबेलचे स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच ३० सप्टेंबर २०११ रोजी त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे नोबेल समितीने नोबेलसाठी स्टाईनमन यांचे नाव निश्चित केले होते. त्यांचे निधन झाले आहे ही गोष्ट नोबेल समितीपर्यंत पोहोचली नव्हती. ३ ऑक्टोबरला नोबेल समितीकडून स्टाईनमन यांच्या नावाची घोषणा झाली. काही तासांनंतर त्यांना सांगण्यात आले की स्टाईनमन या जगात आता नाहीत.
नोबेलने या अभूतपूर्व अशा परिस्थितीत एक मिटिंग बोलावली. त्यांनी या संबंधी बरीच चर्चा केली. शेवटी स्टाईनमन यांचे स्वप्न मरणोत्तर का असेना, पण पूर्ण झाले. नोबेल समितीकडून त्यांच्या कुटुंबाकडे नोबेल सुपूर्द करण्याचा निर्णय झाला. अशा पद्धतीने स्टाईनमन हे मरणोत्तर नोबेल मिळवणारे एकमेव शास्त्रज्ञ ठरले.