लोणावळा चिक्की पहिल्यांदा कोणी बनवली माहित आहे का ? जाणून घ्या लोणावळा चिक्कीचा इतिहास !!
मंडळी, तुम्ही लोणावळ्याला फिरायला गेला नसाल तरी लोणावळ्याची चिक्की नक्कीच खाल्ली असणार. लोणावळा चिक्की एवढी प्रसिद्ध आहे की साध्यासुध्या चिक्कीला पण आजकाल लोणावळा चिक्की म्हणायची प्रथा पडलीय. आज आपण याच सुप्रसिद्ध लोणावळा चिक्कीचा इतिहास जाणून घेणार आहोत. चला तर पाहूया लोणावळा चिक्कीची आयडिया आली तरी कुठून !!
मंडळी, प्रत्येक क्लासिक गोष्टीला अनेक कथा चिकटलेल्या असतात. त्यातून खरी गोष्ट कोणती हे ओळखणं कठीण असतं. लोणावळा चिक्कीच्या बाबतीत अशा काही कथा प्रसिद्ध आहेत. आम्ही तुम्हाला त्यातल्या मोजक्या सांगणार आहोत.
मंडळी, लोणावळा चिक्की पहिल्यांदा तयार केली ती भेवरजी अग्रवाल यांनी. हेच लोणावळा चिक्कीच्या इतिहासाचं मुख्य सूत्र आहे. गोष्टीला फाटे फुटतात ते पुढे.
एका कथेनुसार भेवरजी अग्रवाल यांनी १८८०मध्ये आपल्या मुलाच्या नावे ‘मगनलाल स्वीट शॉप’ची स्थापना केली. मिठाईच्या पारंपारिक व्हरायटीज या दुकानात उपलब्ध होत्या. पुढे १९०० च्या दरम्यान लोणावळा ते मुंबई ट्रेन धावू लागली होती. याकाळात भेवरजी अग्रवाल यांनी प्रवाशांना शेंगदाणे आणि गुळाचं मिश्रण असलेली ‘गुड-दानी’ विकायला सुरुवात केली. आजच्या लोणावळा चिक्कीचं ते ढोबळ रूप होतं. लवकरच ‘गुड-दानी’ प्रसिद्ध झाली. लोक खास चिक्की घेण्यासाठी लोणावळ्याला येऊ लागले.
मंडळी, कालांतराने ‘गुड दानी’ ‘चिक्की’ म्हणून प्रसिद्ध झाली. मगनलाल स्वीट्सने तिचं नाव बदलून ‘मगनलाल चिक्की’ केलं. पण चिक्की खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाली ती लोणावळ्याच्या नावावरून...
मंडळी, ही झाली एक कथा. दुसऱ्या कथेनुसार लोणावळा चिक्कीचा शोध लागला तो मुंबई-लोणावळा रेल्वेच्या निर्मितीच्या वेळी. रेल्वे रुळाचं काम सुरु असताना कामगारांना झटपट उर्जा देणारा पदार्थ हवा होता. गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण हा उर्जेचा उत्तम स्रोत आहे हे तर आपल्याला ठाऊक आहेच. भेवरजी अग्रवाल यांनी हेच ओळखून कामगारांना चिक्की हा नवीन पदार्थ खाऊ घातला. रेल्वे रुळाचं काम पूर्ण होईपर्यंत चिक्कीने मगनलाल स्वीट शॉपमध्ये कायमचं बस्तान बसवलं होतं. हीच ती लोणावळा चिक्की.
आजही लोणावळा स्टेशनच्या आसपास मगनलाल चिक्कीची दुकाने दिसतात. भेवरजी अग्रवाल यांच्या पुढच्या पिढीने चिक्कीचा व्यवसाय आज अनेकपटीने वाढवला आहे.
तर मंडळी, अशारीतीने लोणावळा चिक्कीला जवळजवळ १०० वर्ष जुना इतिहास आहे. तुम्ही जर यापेक्षा वेगळी कथा ऐकली असेल तर आम्हाला सांगायला विसरू नका!!