computer

पालघरमध्ये आढळलाय दुर्मिळ पाखरू मासा.. त्याला खरंच उडता येतं का? ह्या माशाचं वैशिष्ट्य काय?

उडणारा मासा असतो हे तुम्हाला माहित आहे का? हा मासा तसा भारतात दुर्मिळच पण अधूनमधून तो सापडल्याची चर्चा होत असते. नुकतंच पालघर जिल्ह्याच्या मच्छीमारांच्या जाळ्यात असाच एक उडणारा मासा सापडला. ह्या माशाला खरोखर उडता येतं का? या माशाचं वैशिष्ट्य काय? तो नेमका कुठे आढळतो? चला तर आजच्या लेखातून या नव्या माशाची ओळख करून घेऊ या. 

जर्नादन दळवी या स्थानिक मच्छिमाराला पालघर जिल्ह्याच्या वाढवण समुद्र किनारी पंख असलेला मासा सापडला आहे. ह्या माशाला स्थानिक लोक पाखरु मासा म्हणून ओळखतात. हा मासा अतिदुर्मिळ आहे. त्यामुळे परिसरात या माशाचीच चर्चा रंगली असुन त्याला पाहण्यासाठी वाढवण समुद्र किनारी लोक गर्दी करत आहेत. 

शरीरावर पंख असलेला हा मासा पक्ष्यांप्रमाणे हवेत उडत नसला तरी तो वेळप्रसंगी ५० फुटांपर्यंत उडू शकतो. आपल्या पंखाच्या साहाय्याने काही वेळ पाण्याबाहेर तरंगू शकतो. अशाप्रकरचा मासा प्रथमच या समुद्र किनारी आढळून आला. 

एक्झॉसीटिडी कुलातले हे मासे उष्णकटिबंधातील समुद्रांत राहणारे आहेत.  त्यांची लांबी १५—४५ सेंमी. एवढी असते. हे मासे किनाऱ्यापासून दूर उघड्या समुद्रात राहणं पसंत करतात. समुद्रपृष्ठाजवळ यांचे थवे असतात. झिंगे, माशांची अंडी, लहान मासे हे त्यांचे भक्ष्य असतात. या माशांची पाठ निळीकाळी किंवा हिरवट रंगाची आणि खालची बाजू रुपेरी असते. तोंड  वरच्या बाजूला वळलेले असते.  डोळे फार मोठे असतात. अटलांटिक महासागराजवळील सरगॅसो समुद्र हा या माशांचे आवडते जनन-क्षेत्र आहे. जगभर त्यांच्या ९ प्रजाती आणि ६४ जाती आढळून येतात. सर्व उष्ण प्रदेशातील समुद्रात ते आढळतात. पश्चिम किनारपट्टीवर हे मासे फार दुर्मिळ आहेत.

या माशांचे उडणे पक्षांच्या उड्डाणासारखे नसते. ते विसर्पण किंवा विडयन (हवेत झेपावणे) यांच्या स्वरूपाचे असते. मोठे शिकारी मासे जेव्हा यांच्या मागे लागतात तेव्हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते पाण्याच्या बाहेर झेपावतात व परत पाण्यात येतात.

एक्झॉसीटिडी आणि डॅक्टिलॉप्टेरिडी या मत्स्यकुलांतील मासे उडणारे आहेत. यांशिवाय गोड्या पाण्यात राहणारे दक्षिण अमेरिकेतील गॅस्टरोपेलेसिडी कुलातले आणि आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात आढळणारे पँटोडोटिडी कुलातले काही मासे देखील उडू शकतात. एक्झॉसीटस आणि सिप्सिल्यूरस यांच्या काही जाती भारताच्या पूर्व किनाऱ्याजवळ आढळतात. यांचे मांस रुचकर असल्यामुळे तेथे पुष्कळ ठिकाणी ते पकडले जातात आणि खाल्ले जातात, पण पश्चिम किनाऱ्यावर ते फारसे कधी आढळत नाहीत.

(डॅक्टिलॉप्टेरिडी मत्स्यकुलांतील मासे)

यापूर्वी २४ डिसेंबर २०१६ गुहागरला असे दोन पाखरू मासे मासेमाऱ्यांच्या जाळ्यात सापडले होते. त्यावेळी मासेमाऱ्यांच्या लगेच लक्षात आलं आणि त्यांनी थोडावेळातच या मास्यांना परत पाण्यात सोडून त्यांना जीवदान दिलं. कालचा हा मासा स्वतः ला वाचवण्यासाठी चुकून पालघरच्या समुद्रकिनाऱ्यावर आला असावा आणि नेमका जाळ्यात सापडला असावा अशी शक्यता जाणकार सांगतात.

तर वाचकहो, ही माहिती कशी वाटली ? आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required