परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग २ : १७ गोळ्या लागूनही शत्रू सैन्याच्या गोटातली माहिती काढणारे योगेंद्र सिंग यादव!!
४ मे १९९९ ची रात्र. २१ भारतीय सैनिकांनी जम्मू काश्मीर येथील द्रास- कारगिल क्षेत्रातील सर्वात उंच शिखर टायगर हिलची यात्रा सुरू केली होती. यापैकी 7 सैनिकांची एक टोळी पुढे निघून गेली आणि सर्वात आधी जाऊन तिथे पोहोचले. या ७ सैनिकांपैकी एक सैनिक होते योगेंद्र सिंग यादव!! त्यावेळी त्यांचं वय फक्त १९ वर्ष होतं. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या असामान्य शौर्याची गोष्ट आज आपण वाचणार आहोत.
योगेंद्र सिंग यादव हे उत्तर प्रदेश येथील बुलंदशहरातील अहिर गावाचे होते. अवघे १६ वर्ष वय असताना ते भारतीय सैन्यात सामील झाले. त्यांना कमांडो पलटण 'घातक' मध्ये समाविष्ट करण्यात आले. ही पलटण टायगर हिलवरील तीन बंकर सांभाळण्याचे काम करत असे.
जेव्हा त्यांची '१८ ग्रेनेडियर्स' बटालियन ५ मे १९९९ च्या सकाळी टायगर हिलच्या शिखरावर पोहोचली तेव्हा त्यांना शत्रू सैन्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या हल्ल्याने सर्व सैनिक हादरले पण लढणे भाग होते. हाती असलेल्या तुटपुंज्या हत्यारांसहीत या सातही सैनिकांनी लढाईला सुरुवात केली. पण ७ पैकी ६ सैनिक धारातीर्थी पडले.
उरले एकटे योगेंद्र सिंग यादव १७ गोळ्या लागून देखील ते लढत होते, पण अशा परिस्थितीत जास्त काळ तग धरता येणे शक्य नाही, हे ओळखून त्यांनी मृत झाल्याचे नाटक केले. यावेळी पाकिस्तानी सैनिकांची ५०० मीटर डाऊनहिल येथील भारताच्याच्या पोस्टवर हल्ला करण्याची योजना त्यांनी ऐकली. यादव यांना काहीही करून स्वतःचा जीव वाचवायचा होता जेणेकरून त्यांना ही माहिती आपल्या सैन्याला देता येईल.
पण यावेळी दोन सैनिक परत आले आणि त्यांनी मेलेल्या सैनिकांवर पुन्हा गोळीबार करण्यास सुरूवात केली. चुकून देखील कोणी जिवंत राहता कामा नये असा त्यांचा प्रयत्न होता. यादव यांना आता काय करावे सुचत नव्हते. एक गोळी त्यांच्या छातीत लागली होती. अशाही परिस्थितीत त्यांनी एक हॅन्डबॉम्ब उचलला आणि पाकिस्तानी सैनिकांवर फेकला. प्रचंड स्फोटात पाकिस्तानी सैनिकांच्या चिंध्या झाल्या.
यानंतर यादव यांनी सरपटत जाऊन एक रायफल उचलली आणि शत्रुवर हल्ला केला. ते जागा बदलून फायरिंग करू लागले जेणेकरून शत्रूला एकापेक्षा जास्त सैनिक आहेत असा गैरसमज व्हावा. अशाही परिस्थितीत त्यांनी सरपटत जाऊन पाकिस्तानी पोस्टवरील परिस्थितीचा अभ्यास केला.
यादव यांचा एक हात तुटून लटकत होता, तो हात पाठीवर टाकत ते सरपटत जाऊन एका खड्ड्यात जाऊन पडले. तिथून त्याना काही भारतीय सैनिक दिसले. ते सैनिक त्यांना भारताच्या कमांडिंग ऑफिसरकडे घेऊन गेले. कर्नल कुशल चंद यांना त्यांनी पाकिस्तानची पूर्ण योजना सांगितली.
यानंतर यादव यांना श्रीनगरच्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे ते काही दिवस बेशुद्ध होते. या दरम्यान भारताने कारगिल जिंकले होते. त्यांच्या या असामान्य शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र पदक देऊन सन्मानित करण्यात आले. अशा या भारत मातेच्या या शूर पुत्रास सलाम....