computer

जगातला सर्वात उंच पुतळा बनवण्याचा मान जातो या मराठी माणसाकडे.. यांनी आणखी कोणकोणते पुतळे बनवले आहेत माहित आहेत का?

स्टॅच्यू ऑफ युनिटी जगातला सर्वात उंच पुतळा म्हणून ओळखला जाईल. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्ताने आज ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.

मंडळी, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच हा पुतळाही भव्य आहे. प्रत्येक भारतीयाला याचा अभिमान असणार आहेच पण मराठी माणसाला याचा आनंद दुप्पट असेल. यामागचं कारणही खास आहे. एका कर्तुत्वान महापुरुषाचा भव्य पुतळा तयार करण्यासाठी तेवढेच कर्तृत्ववान हात राबले आहेत. आम्ही बोलत आहोत जगातील सर्वात उंच पुतळ्याला डिझाईन करणाऱ्या ‘राम सुतार’ या ज्येष्ठ कलाकाराबद्दल.

राम सुतार आज ९३ वर्षांचे आहेत. आपल्या ७० ते ८० वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी अनेक शिल्पकृतींना जन्म दिला. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा त्यांच्या कारकिर्दीतील एक मास्टरपीस आहे. प्रचंड मोठ्या आकाराची शिल्पे ही राम सुतार यांची खासियतच म्हणता येईल. त्यांच्या कामासाठी जवाहरलाल नेहरूंनी त्यांची पाठ थोपटली होती.

चला तर आज जाणून घेऊया राम सुतार यांच्या थक्क करणाऱ्या प्रवासाबद्दल.

राम सुतार यांचा जन्म १९२५ साली धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. त्यांचे वडील सुतारकाम करायचे. घरची परिस्थिती बेताचीच होती. लहानपणीच राम सुतार शिल्पकलेकडे आकर्षित झाले होते. त्यांच्यातील गुण बघून त्यांचे गुरु श्रीराम कृष्ण जोशी यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं.

राम सुतार ५ वी इयत्ता संपल्यानंतर श्रीराम कृष्ण जोशी यांच्यासोबत दुसऱ्या गावी निघून गेले. तिथून त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर पडेल ते काम करून त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश मिळवला. त्यांनतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टस कॉलेजमध्ये त्यांनी शिल्पकलेची पदवी मेयो सुवर्णपदक मिळवून पूर्ण केली. पुढे त्यांनी १९५८ ते १९५९ पर्यंत ‘माहिती व प्रसारण मंत्रालय, दिल्ली’ येथे काम केलं. पण मध्येच ती नोकरी सोडून त्यांनी शिल्पकलेला पूर्णपणे वाहून घेतलं.

आता पाहूयात राम सुतार यांनी पार पाडलेली महत्वाची कामे

 

१. १९५४ ते १९५८ पर्यंत त्यांनी अजिंठा वेरुळच्या भग्न शिल्पांच्या डागडुजीचं काम केलं.

२. राम सुतार यांच्या कामाची दाखल घेतली गेली ती त्यांनी तयार केलेल्या चंबळ देवीच्या उत्कृष्ट मूर्तीमुळे. चंबळ देवीची मूर्ती मध्यप्रदेशच्या गंगासागर बांधावर तयार करण्यात आली होती. या मूर्तीची उंची आहे ४५ फुट. खुद्द जवाहरलाल नेहरू राम सुतार यांच्या कामाने अत्यंत प्रभावित झाले होते. या कामामुळेच त्यांना जवाहरलाल नेहरूंनी भाक्रा धरणावर ५० फुट उंच ब्राँझ शिल्प तयार करण्याचं काम दिलं.

३. राम सुतार यांनी तयार केलेली काही महत्वाची शिल्पे पुढीलप्रमाणे : मौलाना आझाद - १८ फूट, वल्लभभाई पटेल - १८ फुट (दिल्ली),  इंदिरा गांधी - १७ फूट, जगजीवनराम - ९ फूट, राजीव गांधी – १२ फुट, गोविंदवल्लभ पंत - १० फूट आणि महात्मा गांधी पुतळा – १७ फुट (गुजरात). नेत्यांच्या जीवनावर आधारित शिल्पकृती, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण किंवा अर्धपुतळे अश्या अनेक शिल्पांना राम सुतार यांनी घडवलं. राम सुतार यांनी घडवलेले काही पुतळे सरकारतर्फे भेटीदाखल परदेशी पाठवण्यात आले आहेत.

४. राम सुतार यांच्या कामाची कीर्ती फक्त भारतात नव्हे तर जगभरात पोहोचली आहे. रशिया, इंग्लंड, मलेशिया, फ्रांस आणि इटली या देशांमध्ये त्यांच्या हातून तयार झालेली शिल्पे पाहायला मिळतात.

राम सुतार यांना त्यांच्या कामगिरीसाठी पद्मश्री व पद्मभूषण आणि गेल्याच आठवड्यात त्यांना प्रदान करण्यात आलेल्या टागोर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. सध्या ते नोएडा येथे आपल्या परिवारासोबत राहतात. तिथेच त्यांचा स्टुडीओ आहे. त्यांच्या सोबत त्यांचा मुलगाही शिल्पकार म्हणून काम करतो.

सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा तयार झाल्यांनतर ते आणखी एका महत्वाच्या कामाला सुरुवात करणार आहेत. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी केलेल्या योगदानाची आठवण म्हणून एक महत्वाचं युद्ध स्मारक बनवण्यात येणार आहे. हे स्मारक डिझाईन करण्याचं कामही राम सुतार करणार आहेत.

मंडळी, वयाच्या ९३ व्या वर्षी देखील ते ज्या जोशाने काम करत आहेत ते पाहून थक्क व्हायला होतं. अशा या अद्भुत शिल्पकाराला बोभाटाचा सलाम !! 

सबस्क्राईब करा

* indicates required