computer

बुटा सिंग आणि झैनबची प्रेमकहाणी...गदर सिनेमामागची सत्यघटना माहित आहे??

गदर सिनेमा आपल्या सगळ्यांनाच आठवत असेल. सिनेमाची  कथा भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या काळातली आहे. एक मुस्लीम मुलगी आपल्या कुटुंबापासून हरवते. एक शीख माणूस तिला आसरा देतो. पुढे दोघांत प्रेम होतं. दोघं लग्न करतात. मग एके दिवशी ती आपल्या कुटुंबाकडे,  पाकिस्तानात जाते आणि गोष्टी बदलतात.

हीच कथा शहीद-ए-मोहब्बत बूटा सिंह या पंजाबी सिनेमात आली आहे आणि साधारण याच वळणाने जाणारी कथा वीर झारा सिनेमातही येते. याचं कारण काय असावं? गदरची कथा या दोन सिनेमांनी चोरली असं वाटण्यास इथे जागा आहे, पण खरे तर हे तिन्ही सिनेमे एका खऱ्या कथेवरून प्रेरित आहेत.

व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने आम्ही ह्या खऱ्याखुऱ्या कथेला घेऊन आलो आहोत. ही कथा सिनेमातल्या कथेप्रमाणे सुखांत कथा नाही. ही कथा वाचून मनाला नक्कीच चटके बसतील.

ही कथा फाळणीनंतरची आहे. बुटा सिंग हा ब्रिटीश लष्करातील निवृत्त सैनिक होता. त्याचं वय त्यावेळी ५५ वर्षे होतं. सैन्यातून निवृत्त झाल्यावर तो पूर्ण वेळ शेती करत होता. त्याने कधीच लग्न केलं नव्हतं. ५५ व्या वर्षी लग्न करण्याचा तसाही प्रश्न नव्हता, पण नियतीने काही वेगळंच घडवून आणलं. सप्टेंबरच्या एका दुपारी एक मुसलमान मुलगी धावत येऊन त्याच्या पायावर पडली आणि दयेची भिक मागू लागली. ती एका शीख माणसाच्या तावडीतून जीव वाचवून पळत होती. बुटा सिंगला लवकरच काय प्रकरण आहे याची पूर्ण कल्पना आली.

तिचं नाव होतं झैनब. वय अवघं १७ वर्षे. पाकिस्तानात जाणाऱ्या तांड्यातून तिला पळवून आणलेलं होतं. तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आले होते. तिथून सुटका करून घेण्यासाठी ती पळाली होती.  तिने आल्या आल्या बुटा सिंगचे पाय धरले. बुटा सिंगने या अनपेक्षित क्षणी एक निर्णय घेतला. त्याने तिच्या मागे लागलेल्या शिखाला सरळ सवाल केला. ‘किंमत किती?’. त्यावर त्या शिखाने ‘१५०० रुपये’ म्हटलं. बुटा सिंगने कोणताही विचार न करता आपल्या झोपडीतून १५०० रुपये आणून दिले. नोटा मोजत तो शीख निघून गेला आणि झैनब कायमची बुटा सिंगच्या मालकीची झाली.

पैसे देऊन खरेदी केल्याने बुटा सिंग हा तिचा मालकच झाला होता, पण मालक आणि गुलाम यांच्यात जो फरक असतो तो इथे नव्हता. झैनबचं आयुष्य अधिक सुरळीत झालं. ज्या प्रकारची वागणूक तिला मिळाली त्या मानाने तिचा हा नवीन मालक देवमाणूसच म्हणायला हवा होता.

झैनबच्या रूपाने बुटा सिंगला आपल्या वयाहून अर्ध्या वयाची एक सोबतीणच मिळाली होती. उतार वयात आलेल्या या मुलीने त्याचं आयुष्य बदललं. तो तिला प्रेमाने जपायचा. तिच्यासाठी रोज साबण, साडी,  चपला घेऊन जायचा. झैनब दिवसभर बुटा सिंगच्या शेतावर काम करायची. रात्री दोघे एकत्र यायचे.  कालांतराने दोघांनी सर्वासमक्ष लग्नही उरकलं.

इथे या गोष्टीचा पहिला अध्याय संपतो.  इथून पुढे ही कथा शोकांतिका बनत जाते.

लग्नानंतर झैनबने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव बुटासिंगने तन्वरी ठेवलं. दोघांचा संसार सुरु झाला, पण दुसऱ्या बाजूला एक वेगळंच प्रकरण घडत होतं. बुटा सिंगच्या दोन पुतण्यांना बुटा सिंग आणि झैनबचं लग्न पटलेलं नव्हतं. त्यांचा बुटा सिंगच्या संपत्तीवरही डोळा होता. त्यावेळी फाळणीच्या काळात अपहरण झालेल्या स्त्रियांचा शोध सुरु होता. बुटा सिंगचा काटा काढण्यासाठी दोघांनी झैनबची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना दिली.

सरकारी अधिकाऱ्यांनी फारशी चौकशी न करता झैनबला सरकारी आश्रयालयात ठेवलं आणि तिच्या कुटुंबाचा शोध सुरु केला.  झैनबला घेऊन गेल्यानंतर बुटा सिंग पुरता वेडा झाला होता. त्याने तडक जाऊन इस्लामचा धर्माचा स्वीकार केला आणि पत्नी परत मिळावी म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु केले. आता त्याचं नाव जमाल महंमद झाले होते. सरकारी अधिकाऱ्यांनी झैनबला जिथे ठेवलं होतं तिथे तो जायचा. दोघांनाही अश्रू अनावर व्हायचे.

असंच एकदा बातमी आली की राजस्थानातून पाकिस्तानात गेलेलं झैनबचं कुटुंब सापडलं आहे.  तेव्हाच्या पद्धतीनुसार अपहरण झालेल्या स्त्रियांना लगेचच त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं जायचं. झैनबलाही तिच्या कुटुंबाकडे, पाकिस्तानात पाठवायची सोय करण्यात आली. मुलगी बुटा सिंगकडेच राहिली. झैनबने जाताना आपण लवकरच परत येऊ असं वाचन दिलं.

झैनब पाकिस्तानात गेल्यानंतर बुटा सिंगने काही काळ वाट बघितली, पण झैनब परत येत नाही बघून त्याने तिला मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्याने आधी तर सरकारकडे पाकिस्तानात स्थलांतर करण्याची परवानगी मागितली. ती फेटाळण्यात आली. त्याने व्हिसासाठी अर्ज केला. तोही फेटाळण्यात आला. बुटा सिंगकडे दुसरा मार्गच नव्हता. त्याची झैनबला मिळवण्याची इच्छा एवढी प्रबळ होती की त्याने बेकायदेशीररीत्या पाकिस्तानात जायची तयार केली. 

बुटा सिंगने मुलीला सोबत घेऊन पाकिस्तान गाठलं. झैनबच्या गावी जाऊन पोचल्यावर त्याला प्रचंड हादरा बसला. झैनब पाकिस्तानात पोचल्यावर लगेचच तिचं लग्न मावस भावाशी लावण्यात आलं होतं. पत्नी परत मिळावी म्हणून त्याने झैनबच्या कुटुंबाकडे याचना केली पण त्याला हाकलून देण्यात आलं. झैनबच्या भावांनी त्याला प्रचंड मारहाण केली. याखेरीज बुटा सिंगला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

बुटा सिंग पाकिस्तानी पोलिसांच्या ताब्यात गेला. आपली पत्नी परत मिळावी म्हणून त्याने न्यायालयात मागणी केली. निदान तिला भेटता यावं आणि ती भारतात परतायला तयार आहे का हे तिच्याकडूनच ऐकण्याची संधी मिळावी म्हणून त्याने याचना केली. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली. 

हे घडेपर्यंत बुटा सिंगची कहाणी पाकिस्तानात फिरत होती. ज्या दिवशी झैनबला न्यायालयात बोलावण्यात आलं त्या दिवशी पाहणाऱ्यांची तौबा गर्दी उसळली.

न्यायाधीशांनी बुटा सिंगकडे बोट करून विचारलं, ‘तू या माणसाला ओळखते का?”

झैनब - “हो, हा बुटा सिंग आहे. माझा पहिला पती. मी त्याला ओळखते.”

न्यायाधीश – “या माणसासोबत भारतात परतण्याची तुझी इच्छा आहे का?”

या दुसऱ्या प्रश्नावर बुटा सिंगचं भविष्य ठरलेलं होतं. झैनबने प्रचंड दबावाखाली असताना आणि तिथे जमलेल्या, तिच्याकडे पाहत असलेल्या नजरांना सहन करत उत्तर दिलं.

“नाही, माझी इच्छा नाही!”

झैनबचं उत्तर ऐकून बुटा सिंग हादरला. तिच्याकडे जाऊन त्याने म्हटलं, ‘जशी तुझी इच्छा, पण आपल्या मुलीचा तरी स्वीकार कर.”

न्यायाधीशांनी झैनबला तिची मुलीचा स्वीकार करण्याची  इच्छा आहे का असा प्रश्न विचारला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तिच्या नातेवाईकांनी उघडपणे आपला विरोध दर्शवला. खास करून पुरुष मंडळी रागाने पेटली होती. झैनबने नकार दिला.

बुटा सिंगला रडू आवरलं नाही. झैनबही स्वतःला आवरू शकली नाही. दोघेही रडले. बुटा सिंग मग आपल्या मुलीला कडेवर घेऊन तिथून चालता झाला. ती रात्र त्याने दादा गंग बक्ष या संताच्या कबरीपाशी बसून काढली.

दुसऱ्या दिवशी तो मुलीला घेऊन बाजारात गेला. मुलीसाठी चपला आणि झगा विकत घेतला. दोघेही मग शहादरा रेल्वे स्थानकावर गेले. तिथे पहिल्यांदाच त्याने मुलीला सांगितले की तिची आई आता तिला कधीही भेटणार नाही. तेवढ्यात ट्रेन आली. त्याने मुलीला छातीशी कवटाळलं. ट्रेन जवळ आली. बुटा सिंग पुढे गेला आणि त्याने स्वतःला झोकून दिलं.

सुदैवाने मुलीला कोणतीही इजा पोचली नाही. बुटा सिंग मात्र संपला होता. त्याच्याकडे एक चिट्ठी सापडली. चिठ्ठीत लिहिलं होतं  “प्रिय झैनब, तुझ्या सहवासात राहण्यावे  एवढी एकंच माझी शेवटची इच्छा आहे. माझ्यावर दया करून माझी कबर तुझ्या गावातच बांध आणि तिथे तुझ्या हाताने फुल चढव.”

बुटा सिंगची कहाणी आणि त्याने केलेली आत्महत्या पाकिस्तानभर पसरली आणि लोकांनी त्याला अभूपूर्व  प्रतिसाद दिला. बुटा सिंगची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचं प्रेत घेऊन हजारो लोक झैनबच्या गावी पोचले. मात्र गावकऱ्यांनी त्यांना प्रखर विरोध केला. यात झैनबचा दुसरा पती सर्वात पुढे होता. हे घडलं २२ फेब्रुवारी १९५७ रोजी.

प्रकरण दंगल घडण्याच्या दिशेने जाऊ लागलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणाचा शेवट करावा लागला. बुटा सिंगबद्दल आत्मीयता वाटणाऱ्या जमावाला शांत करून त्यांना परत पाठवण्यात आलं. बुटा सिंगचा दफनविधी लाहोरला करण्यात आला. लोकांनी उस्फुर्तपणे फुले वाहिली.

ही कहाणी इथेच संपत नाही. मेल्यानंतरही बुटा सिंगला शांतता लाभली नव्हती. झैनबचे घरचे त्याच्या कबरीची नासधूस करत राहिले. संपूर्ण कबरच नष्ट करण्याचा त्यांचा बेत होता. पण बुटा सिंगसाठी काही सहृदय लोक पुढे आले. त्यांनी थडगे पुन्हा उभारले आणि त्यावर पहाराही बसवला.

बुटा सिंगच्या मुलीचे काय झाले? तर बुटा सिंग गेल्यानंतर त्याच्या मुलीला एका कुटुंबाने दत्तक घेतले. तिला एक चांगलं भविष्य देऊ केलं. एका बातमीनुसार ती लग्नानंतर लिबियामध्ये निघून गेली. तिथे तिला ३ मुलेही झाली. झैनबचं पुढे काय झालं याबद्दल आज कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

बुटा सिंग आणि झैनबची कहाणी आज जगभर पसरलेली आहे. आजही या कहाणीने फाळणीच्या जखमा आणखी तीव्रपणे जाणवतात. दोन देशांच्या भांडणात दोन जीवांची झालेली ससेहोलपट दिसते. त्याकाळी स्त्रियांना कशाप्रकारे वागवलं जायचं याचं एक जिवंत चित्र उभं राहतं.

हे वास्तव कदाचित बघणं शक्य होणार नाही म्हणूनच की काय गदर सिनेमाचा शेवट गोड करण्यात आला आहे. तुम्हाला ही मूळ कथा कशी वाटली? आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required