computer

लंडनच्या आगीतून 'प्लास्टर ऑफ पॅरिस'ला प्रसिद्धी कशी मिळाली? या नावाचा इतिहास जाणून घ्या !!

पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस. या पीओपीपासून बनवलेल्या वस्तू आणि त्यांचा वापर करून बांधलेल्या वास्तू कित्ती देखण्या दिसतात नाही? याचा उपयोग तसा मूर्ती बनवणे, शोभेच्या वस्तू बनवणे, घराच्या, इमारतींच्या बांधकामात केला जातो. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थापन केल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या गणेश मूर्त्या आणि घरगुती गणेश मूर्त्यांसाठीही प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो.

मुळात प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे काय? तांत्रिकदृष्ट्या पाहायचं तर याला वैज्ञानिक भाषेत कॅल्शियम सल्फेट हेमी हायड्रेट म्हटले जाते. जिप्सम नावाच्या खनिजाला १४०-१८० डिग्री सेल्सिअस इतकी उष्णता दिल्यानंतर त्याचे रुपांतर प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये होते. सल्फेट ऑफ लाइमचे सामान्य नाम म्हणजेच जिप्सम. एकदा जिप्समचे प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये रुपांतर झाले की शक्यतो त्याला तडे जाणे, फुटणे, किंवा पाण्याच्या माऱ्याने विरघळणे असे प्रकार होत नाहीत. खनिजापासून बनवलेला हा पदार्थ अतिशय टिकावू असतो.

आता एका खनिजापासून बनवल्या जाणाऱ्या ह्या वस्तूला प्लास्टर ऑफ पॅरिस का म्हणत असतील? म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच का? प्लास्टर ऑफ लॉस अँजेलीस, प्लास्टर ऑफ लोगोस, दिल्ली, टोकियो, असे का नाही? या प्लास्टर ऑफ पॅरिस आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस यांचा काही संबंध आहे का? आणि असेल तर तो कसा? असे अनेक प्रश्न कदाचित तुमच्या मनातही खदखदत असतीलच. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे या लेखातून.

प्लास्टरचा इतिहास पाहिल्यास आपल्याला हजारो वर्षे मागे जावे लागेल. पूर्वीच्या काळी इजिप्त, ग्रीक आणि रोमन अशा सर्वच प्राचीन संस्कृतीत प्लास्टर ऑफ पॅरिसचा शोध लागला होता असे दिसते. पण १७व्या शतकापर्यंत याचा वापर फारसा होत नव्हता. मात्र १७व्या शतकात पॅरिसमधल्या बहुतांश वास्तू बांधताना याचा सढळहस्ते वापर करण्यात आला.

१६६६ साली लंडन शहरात एक वणवा पेटला. यामुळे शहरातील वास्तूंचे अपरिमित नुकसान झाले. या आगीची बातमी ऐकून फ्रान्सच्या राजाने पॅरिसमधील लाकडापासून बनवण्यात आलेल्या सर्वच भिंतीना प्लास्टर लावण्याचे आदेश दिले. यामुळे उन, वारा, पाऊस, अशा सर्वच गोष्टींपासून या वास्तूंचे जतन केले जाईल असा त्याचा उद्देश होता. राजाचा हा आदेश पाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारागीर कामाला लागले. पॅरिसजवळील मोंटमार्त्रे डोंगराच्या पायथ्याशी जिप्समच्या बेसुमार खाणी होत्या. तिथून जिप्सम खोदण्याला सुरुवातही झाली. अशाप्रकारे १८व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत पॅरिस हे प्लास्टरची निर्मिती करणारे एक प्रमुख शहर बनले आणि म्हणूनच याचे नावही प्लास्टर ऑफ पॅरिस असे पडले.

(मोंटमार्त्रे येथील जिप्समची खाण)

प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून बनवलेल्या मूर्त्या असोत की आणखी काही वस्तू, त्या शक्यतो लवकर तुटत-फुटत नाहीत. इतकेच काय, अगदी माणसाचे मोडलेले हाड जुळवण्यासाठीही याच कठीण खनिजाचा वापर केला जातो ना? इमारतींचे बांधकाम करताना त्याच्या छतावर नाजूक नक्षीकाम करण्यासाठीही याचाच वापर केला जातो. इमारतीच्या भिंतीना रंग देण्यापूर्वी त्यांनाही एकदा प्लास्टर ऑफ पॅरिसचा थर दिला जातो.

काही शिल्पकारही आपल्या कलाकृतींसाठी याचा आवर्जून वापर करतात. कारण हे प्रकरण हाताळायला एकदम सोपे आहे. कमीतकमी वेळेत यापासून शिल्प साकार केले जाऊ शकते. आपल्याकडेही गणेश मूर्त्या बनवण्यासाठी हल्ली याचा सर्रास वापर केला जाऊ लागला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून बनवलेल्या गणेश मूर्त्या आकर्षक असतात. शाडूच्या मूर्त्यांपेक्षा या मुर्त्या जास्त देखण्या दिसतात यात वादच नाही. परंतु गणेशोत्सवात स्थापित केलेल्या या गणेश मूर्त्या आपण पाच ते दहा दिवसांनी लगेचच विसर्जित करतो. प्लास्टर ऑफ पॅरिसचे जलद विघटन होत नसल्याने जलप्रदूषणाची समस्या तीव्र होत चालली आहे. पण उपलब्धता, सौंदर्य आणि किंमत या तिन्ही गोष्टी पाहून बरेच ग्राहक पीओपीच्या मूर्त्यांना प्राधान्य देतात.

तर, तुम्हांला आता कळालेच असेल की प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पॅरिस या सुंदर शहराचा नेमका काय संबंध आहे.

 

लेखिका: मेघश्री श्रेष्ठी

सबस्क्राईब करा

* indicates required