साऊथवेस्ट एअरलाईन्सचा पंचसूत्री कार्यक्रम! नवीन व्यावसायिकांसाठी उत्तम पाठ!!
वाचकहो, जमाना बदलतो आहे. आजपर्यंत जे व्यापार व्यवसायाचा विचार करत नव्हते ते आता या क्षेत्रात प्रवेश करत आहेत. यापैकी सगळ्यांनी प्रोफेशनल मॅनेजमेटचे धडे गिरवले असतील असे नाही. या नव्या तरुण व्यावसायिकांना उत्तेजन देण्याचे काम 'बोभाटा' नक्कीच करू शकते. म्हणून येत्या काही दिवसात मार्केटींग- ब्रँडींग- जाहिरात या विषयावर वेळोवेळी काही माहितीपूर्ण लेख रंजक पध्दतीने आपल्यासमोर ठेवण्याचा आमचा विचार आहे. जशी लेखांची संख्या वाढेल त्याप्रमाणे अधिकाधिक सूसूत्रता त्यात येईल इतकेच आजच्या पहिल्या लेखाच्या निमित्ताने आम्ही सांगू शकतो.
पहिली कथा आहे अमेरिकेतील एका विमान कंपनीची - या कंपनीचं नाव आहे, साउथ वेस्ट एअरलाइन्स! साऊथवेस्ट एअरलाइन्स फक्त अमेरिकेत आंतरराज्य हवाई सेवा देते. त्यामुळे हे नाव आपल्याला परिचयाचे नाही. अमेरिकेतल्या अग्रगण्य हवाई कंपन्यांमध्ये त्यांचे नाव पहिल्या पाचांत असते. या कंपनीचा 'मार्केटिंग मंत्र' आहे "स्वस्त आणि मस्त हवाई प्रवास"! पण फक्त मार्केटिंग मंत्र बनवून कंपनी चालत नाही, तो मंत्र प्रत्यक्ष अंमलात आणावा लागतो.
हवाई प्रवास स्वस्त असतो का? इतरांपेक्षा चार पैसे कमी घेऊन स्वस्त असल्याचा दावा बर्याच कंपन्या करतात. पण साऊथ वेस्ट एअरलाइन्सचा हा दावा १००% खरा आहे आणि तेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे! ते त्यांनी कसे साध्य केले ते आधी समजून घेऊ या.
कंपनीची उद्दिष्टे ठरवतानाच त्यांनी असा धोरणात्मक निर्णय घेतला होता की त्यांची सेवा फक्त ५०० किलोमीटरची आंतरराज्य हवाई सेवा देईल. आता अमेरिकेत ५०० किलोमीटरची हवाई सेवा जर स्वस्तात मिळत असेल तरच जनता विमानाने प्रवास करते. हा प्रवास थोडासा जरी महाग झाला तरी लोक रस्तेमार्गाने म्हणजे बसने जाणे पसंत करतात. हे लोक मोठ्या नावाजलेल्या विमान कंपन्यांची सेवा वापरतच नाहीत आणि त्या कंपन्यांना पण असे पैसे वाचवणारे ग्राहक नको असतात. त्यामुळे साऊथवेस्टचे ग्राहक त्यांना सोडून जात नाहीत. नेहेमीच तिकिटांची किंमत कायम ठेवणे साऊथवेस्टला पण कठीण जाते. हे खरे आहे. पण त्यासाठी त्यांनी अनेक वेगवेगळे उपाय शोधून काढले आहेत. एक उपाय असा आहे की त्यांनी पीकअवर्स (गर्दीची वेळ) आणि नॉन पीक अवर्स (गर्दी नसलेल्या) ची तिकीटे वेगवेगळी ठेवली आहेत. इंधन महाग झाले तरी तिकीटांचे दर फारतर २/३ डॉलर्सने कमीजास्त होतात. त्यामुळे छोटा प्रवास- स्वस्त प्रवास म्हणजे साऊथवेस्ट एअरलाइन्स हे ग्राहकांना चांगलेच कळले आहे.
आता मस्त प्रवास म्हणजे काय, तर कमी पैशात- वेळच्या वेळी -सुरक्षित प्रवास म्हणजे 'मस्त प्रवास'. गेली अनेक वर्षे याच तत्वावर साऊथ वेस्ट एअरलाइन्स काम करते आहे आणि सतत नफा पण कमावते आहे. विमान उशिरा सुटणे, प्रवाशांची गैरसोय होणे असे प्रकार या कंपनीत फार कमी असतात. म्हणूनच काही वर्षांपूर्वी कंपनीला उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार देण्यात आला तेव्हा एका मोठ्या कंपनीने त्यांचे श्रेय चोरायचा प्रयत्न केला. अशा प्रकारात कोर्टाकडे दाद मागण्यापेक्षा थेट जाहिरात करून खोटेपणा उघडकीस आणणे ही पण बचतच आहे. त्याची साक्ष या जाहिरातीत मिळेल. रुळलेल्या वाटेवरून न जाता काहीतरी वेगळे करणे हे साऊथवेस्टला छान जमलेले तंत्र आहे.
याखेरीज साऊथवेस्ट आणखी काय काय कल्पना लढवते ते आपण या लेखात बघणार आहोतच. त्या आधी साऊथवेस्ट कंपनीने जी मार्गदर्शक तत्वे बनवली होती त्यावर एक नजर टाकली तर 'बोभाटा'चे अनेक वाचक जे उद्याचे उद्योजक आहेत त्यांना योजना राबवताना मार्गदर्शन मिळेल.
१. आपली ज्या क्षेत्रात खासियत आहे तेच काम करा.
२. एकदम मोठा घास न घेता आधी छोटा विचार करा, कार्यप्रणाली सोपी करा. अंमलात आणा.
३. 'वेळ वाचवा पैसे कमवा'
४. कर्मचार्यांशिवाय व्यवसाय आकार घेणार नाही.
५. कर्मचार्यांना नफ्याचा हिस्सा द्या.
१. आपली ज्या क्षेत्रात खासियत आहे तेच काम करा.
साऊथवेस्ट कंपनीने फक्त छोटे आणि सुखकर विमानप्रवास ही आपली खासियत बनवली होती. त्यामुळे ते या क्षेत्राच्या बाहेर पडलेच नाहीत. मोठ्या कंपन्या त्यांच्या लांबलचक रूटसाठी मोठमोठी जेट-बोईंग- एअर बस वापरतात. साऊथवेस्ट छोटी विमानं घेते. परिणामी गुंतवणूक कमी- कर्जाचा बोजा कमी- भाडेतत्त्वाचा हप्ता कमी आणि विमानतळावर येणारा पार्किंगचा खर्चही कमी! काही वर्षांपूर्वी टेक्सास- ह्यूस्टन इथे नवा विमानतळ आला. सगळ्या मोठ्या कंपन्या नव्या विमानतळावर गेल्या. या कंपनीने जुनाच विमानतळ वापरण्याचे ठरवले. साहजिकच निव्वळ स्पर्धेपोटी येणारा खर्च त्यांनी टाळला.
२. छोटा विचार करा, कार्यप्रणाली सोपी करा. अंमलात आणा.
युनायटेड- काँटीनेंटल- डेल्टा यांसारख्या कंपन्यांची तिकिटं बुक करणारी यंत्रणा साऊथवेस्ट एअरलाइन्स वापरत नाही. किंबहुना या कंपन्यांनीच या कंपनीला 'कॉमन बुकिंग प्लॅटफॉर्मवरून ढकलून बाजूला केले. असं झाल्यावर कंपनीने 'तिकिटलेस ट्रॅव्हल' नावाखाली एक शक्क्ल लढवली! कंपनीच्या वेबसाइटवर तुम्ही तिकिटलेस ट्रॅव्हल बुक करू शकता. आता तिकिटलेस ट्रॅव्हल म्हणजे काय? तर तुम्ही कंपनीला फोन करून किंवा ऑनलाइन तिकिटे बुक करायची पण आगाऊ पैसे द्यायचे नाहीत. कंपनीतर्फे एक नंबर प्रवाशाला दिला जातो. विमानतळावर पोहचल्यावर तो नंबर सांगून तिकिट विकत घेता येते. बोर्डींग पास छापून देण्यापेक्षा प्लॅस्टिकचे कार्ड वापरले जाते. वेळही वाचला आणि खर्चही वाचला. अशा छोट्या छोट्या सुविधा देऊन साऊथवेस्ट ग्राहकांना पकडून ठेवते. ग्राहकही खूष आणि बुकिंग एजंटचे कमिशन वाचल्याने कंपनीही खूष!
३. 'वेळ वाचवा, पैसे कमवा'
कंपनीच्या कल्पकपणाची खरी चुणूक 'वेळ वाचवा पैसे कमवा' या एका वाक्यात सांगता येते. त्यांचे विमान एकदा फलाटाला म्हणजे बोर्डिंग गेटवर लागले की १० ते २० मिनिटांत पुन्हा उड्डाण करते. विमान एकदा विमानतळावर आले की ते जितके जास्त वेळ उड्डाणाला लावेल त्या प्रमाणात एअरपोर्ट ऑथोरिटीचे खर्च वाढतात. आता हा वेळ वाचवण्यासाठी साऊथवेस्ट सीट नंबर देत नाही. त्यामुळे ग्राहक रांगेत उभे राहून झटपट सीट मिळवतात. बोर्डिंग गेटचा हा वेळ ज्याला 'गेट टर्न अराउंड टाईम' म्हणतात, हा कमी असल्यावर चार्जेस कमी लागतात. दुसरा मोठ्ठा फायदा असा की १२ तासांत इतर कंपन्यांची विमानं ४ फेर्या मारत असतील तर साऊथवेस्टची विमानं त्याच वेळात ५ फेर्या मारतात. म्हणजे २५% कमाई जास्त!
मोठ्या कंपन्या त्यांच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान जेवण देतात. साऊथवेस्टची विमानं हवेत जेमतेम तास दिडतास असतात. त्यामुळे ते जेवण न देता टाइमपास म्हणून शेंगदाण्याची पाकीटं देतात. म्हणजेच जेवण विमानात चढवण्याचा वेळ वाचतो. जेवणाचा ५ डॉलर खर्च वाचतो आणि एका प्रवाशामागे ४.८० डॉलरची बचत होते. त्याखेरीज मुक्कामाला पोहचल्यावर साफसफाई करण्यात वेळच लागत नाही, विमान रिकामं झाल्यावर २० मिनिटांत गेटवर पुन्हा हजर होतं!
सकाळच्या काही फेर्यांना ब्रेकफास्ट द्यावा लागतो. हा ब्रेकफास्ट कंपनी विमानतळावरच्या वेटिंग एरियातच देतात. असे केल्याने पुन्हा एकदा 'गेट टर्न अराउंड टाईम वाचतो'. या सगळ्या कल्पना राबवताना त्या ग्राहकांच्या लक्षात येत नाहीत असे नाही, पण अशा आयडियांतूनच आपल्याला तिकिट स्वस्त पडते हे लक्षात आल्यावर कंपनीबद्दल अधिकच आपुलकी वाटायला लागते.
४ कर्मचार्यांशिवाय व्यवसाय आकार घेणार नाही.
या तत्वावर साऊथवेस्टचा भरवसा त्यांची कंपनी सुरु झाली त्या दिवसापासून आजपर्यंत अढळ आहे. तुम्ही जसे कर्मचार्यांशी वागाल तसे ते तुमच्या ग्राहकांशी वागतील हे तत्व कंपनीने नेहमीच यशस्वीरित्या वापरले आहे. वेगवेगळ्या विभागाच्या कामाची ओळख, सर्व कर्मचार्यांना ट्रेनिंगच्या माध्यमातून वारंवार शिकवले जाते. त्यामुळे 'हे माझे काम नाही' अशी वृत्ती निर्माण होत नाही. सुरुवातीच्या दिवसात ४ विमानं आणि ७० कर्मचारी यांच्या भरवशावर कारभार करताना अनेक वेळा कंपनी टेकीला आली, पण कर्मचार्यांच्या जोरावर पुन्हा जोमाने चालत राहिली. आता इथं हजारो कर्मचारी काम करतात, पण त्यांचा उत्साह आणि वृत्ती आहे तशीच आहे. उदाहरणार्थ बुकिंग प्लॅटफॉर्मवरून कंपनी बाहेर पडली तेव्हा कंपनीची वेबसाइट कर्मचार्यांपैकी काहीजणांनी पुढाकार घेऊन बनवली. थोडक्यात, कर्मचारी हे कर्मचारी नाहीत तर 'उत्साही कार्यकर्ते' आहेत असेच म्हणावे लागेल.
५ कर्मचार्यांना नफ्याचा हिस्सा द्या.
जेव्हा कर्मचार्यांच्या पगाराचा प्रश्न येतो तेव्हा साऊथवेस्ट इतर एअरलाइन्स कंपन्यांच्या कर्मचार्यांसारखेच पगार आणि भत्ते देते. त्यात कोणतीही काटकसर करत नाही. सोबतच कर्मचार्यांना कंपनीचे शेअर्स पण देते. स्टॉक ऑप्शन ही संकल्पना आता खूपच लोकप्रिय आहे, पण यांनी ती बरीच वर्षे आधी वापरली. कंपनीचे ११% शेअर कर्मचार्यांकडे आहेत. म्हणजे नफ्यात पण त्यांना हिस्सा मिळतो. या अशा अनेक मार्गाने कर्मचारी घट्ट जोडले जातात आणि काम काम न राहता संस्कृती बनते.
त्याचं काय आहे, कुणाकडून काही शिकण्यासारखं असेल, तर त्यातलं चांगलं आपण नक्कीच अंगीकारावं आणि आपलं भलं करून घ्यावं. केवळ याचकारणाने आम्ही या साऊथवेस्ट कंपनीचं उदाहरण खास आमच्या वाचकांसाठी घेऊन आलो आहोत. आमच्या उद्यमी वाचकांकडेही अशी काही आपलीशी करण्याजोगी तत्त्वे असतीलच, त्यांनी ती इथे कमेंटबॉक्समध्ये 'बहुजन हिताय' शेअर करावी, हीच आमची विनंती!! काय म्हणता?