दारूच्या नशेत केलेल्या बडबडीमुळे तब्बल ५ वर्षांनी कळलं तो अपघात होता की खून!

गुन्हा करताना गुन्हेगार एकतरी पुरावा मागे सोडून जातोच. पण कधीतरी या नियमालाही अपवाद होतो आणि गुन्ह्याची उकल न झाल्यामुळे त्या प्रकरणाची फाईल बंद केली जाते. मात्र कधीतरी असं होतं की भविष्यात त्या घटनेला अनपेक्षित कलाटणी मिळते. कुठेतरी एखादा धागा हाती लागतो, गोष्टी जुळून येतात, आणि काळाच्या उदरात दडलेली गुपितं जणू आपणहूनच बाहेर येतात. इथे नमूद केलेला गुन्हाही असाच आहे. तो खरा त्यावेळी अपघात म्हणूनच समोर आला होता, पण तब्बल पाच वर्षांनी तो थंड डोक्याने केलेला पूर्वनियोजित खून असल्याचं स्पष्ट झालं. त्याचा सुगावा लागला तोही एका दारुड्याने नशेच्या अमलाखाली केलेल्या बडबडीमुळे.
ही जानेवारी २०१४ मध्ये नोंद झालेली हिट अॅन्ड रन केस होती! मुंबईतल्या वडाळा येथे सकाळीसकाळी एका टँकरने एका सायकलस्वाराला ठोकरलं होतं आणि तो फरार झाला होता. जंग जंग पछाडूनही त्यावेळी पोलिसांना त्या अज्ञात वाहनचालकाचा शोध लागला नव्हता. मयत इसम अहमद हा बेकर्यांना लागणारा कच्चा माल पुरवायचा. अपघाताच्या दिवशीही तो कामावरच निघाला होता. टँकरचालकाचा पत्ता न लागल्याने या प्रकरणात काहीही प्रगती झाली नाही. फाईल काही काळासाठी बंद केली गेली.
या प्रकरणाचा पुढचा अंक घडला यानंतर ५ वर्षांनी. एका बारमध्ये. अगदी अनपेक्षितपणे. दारू पिऊन तर्र झालेल्या अमोल नावाच्या एका इसमाने २०१४ मध्ये आपण सुपारी घेऊन एका सायकलवाल्याला उडवल्याचं मित्रांना सांगितलं. त्याच्या दुर्दैवाने त्यांच्या टेबलाच्या बाजूच्याच टेबलापाशी पोलिसांचा खबरी बसला होता. अमोलची खरी गोची अशी होती, की काम झाल्यावर त्यालाही फसवण्यात आलं होतं; कबूल केलेले सुपारीचे पैसे ५ वर्षं उलटून गेली तरी त्याला मिळाले नव्हते. ४० हजार रुपयांपैकी फक्त १० हजार रुपये मिळाले होते. यामुळे तो मनातून प्रचंड वैतागला होता. आपलं नैराश्य दूर करण्यासाठी तो इथे पेगवर पेग रिचवत तो त्याच्या मालकाला लाखोली वाहत होता. दुसरीकडे त्या खबर्याचे कान आणि डोळे सज्ज झाले होते. बाजूला बसलेला हा वीर जे काही बरळत होता ते सगळं तो त्याच्या मेंदूत नोंदवून घेत होता. महत्त्वाचा तपशील मिळाला तसा तो हळूच उठला, पोलिसांचा नंबर फिरवण्यासाठी.
थोड्याच वेळात पोलीस आले आणि त्यांनी अमोलला ताब्यात घेतलं. थोडा हिसका दाखवल्याबरोबर त्याने आपला गुन्हा कबूल केला. त्याचबरोबर आपल्या साथीदाराचीही माहिती पोलिसांना दिली. हा साथीदार म्हणजे तो जो टँकर चालवायचा त्याचा मालक. पोलिसांनी त्या साथीदारालाही ताब्यात घेतलं. हळूहळू या प्रकरणाचे धागे उलगडू लागले. पाच वर्षांपूर्वी अपघात अशी नोंद झालेला तो गुन्हा अपघात नसून खून आहे हे सिद्ध झालं.
(प्रातिनिधिक फोटो)
या खुनामागचा कर्ताकरविता होता, मयत अहमदचा बिझनेस पार्टनर जुबेर. त्यानेच माहीम परिसरात राहणार्या आणि स्वत:च्या मालकीचे अनेक टँकर असणार्या सलीमला अहमदला ‘उडवण्याची’ सुपारी दिली होती. तो अहमदला १० लाख रुपये देणं लागत होता, त्यातून त्याची सुटका होणार होती. याशिवाय अजून एक महत्त्वाचं कारण होतं. तो आणि अहमद हे दोघंही मूळचे उत्तरप्रदेशातल्या हरडोई गावचे होते. इथे बिझनेस पार्टनर असले तरी गावात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी. काही वर्षांपूर्वी गावच्या सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत त्याला अहमदकडून पराभव पत्करावा लागला होता, हे शल्य जुबेरला डाचत होतंच. त्यातूनच त्याने अहमदला आपल्या मार्गातून कायमचं दूर करण्याचा प्लॅन आखून अमलात आणला होता. त्यावेळी त्याचं नशीब जोरावर होतं. नाटक हुबेहूब वठलं होतं. आता मात्र तसं झालं नाही. मालकाने फसवल्यामुळे डिवचला गेलेला अमोल बोलू नये ते आणि बोलू नये तिथे बोलला आणि सगळाच खेळ खलास झाला.
कदाचित अमोलला सगळे पैसे इमानेइतबारे मिळाले असते, तर त्याने तोंड उघडलंही नसतं कधी! मग हे रहस्य रहस्यच राहिलं असतं. पण परफेक्ट क्राईम भासेल अशा या गुन्ह्यात फसवणूक आडवी आली आणि इथेच सगळं बिनसलं.
लेखिका : स्मिता जोगळेकर