computer

२०००० बळी घेणारा महापूर, एका रात्रीत वाहून गेलेलं शहर आणि त्यापासून घेतलेला धडा!

२०१३ सालचा हिमाचल राज्यातला महापूर आठवतो का ? हो तोच तो महापूर, त्याच्यावर आधारित केदारनाथ नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेलच. एका रात्रीत पडलेल्या पावसाने केदारनाथमध्ये आलेल्या महापुरात जवळजवळ ३ लाख लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले. ‘एनडीआरएफ’चे (National Disaster Response Force) जवान, ITBP चे २००० निष्णात सैनिक आणि लोकसहभागातून बहुतेकांचे प्राण वाचले. या सर्वांना जोडणारी उत्कृष्ट दूरसंचार व्यवस्था उपलब्ध असल्याने दुर्घटनेच्या वेळेस वेळ वाया न जाता ही मोहीम यशस्वी झाली. पण विचार करा वर उल्लेख केलेले मदतीचे हात जर उपलब्ध नसतील तर अशा प्रलयकारी पुरात काय झालं असतं?

काय झालं असतं? असा जर विचार तुमच्या मनात आला असेल तर १९७९ साली गुजरातमधल्या मोरबीत आलेल्या पुराची कथा वाचली की एका रात्रीत होत्याचे नव्हते कसे होते याची खात्री तुम्हाला पटेल. पण ही कथा वाचण्याआधी २ संकल्पनांचा आपण विचार करूया.

केदारनाथ काय किंवा मोरबी काय, या ठिकाणी आलेल्या पुराला शास्त्रीय परिभाषेत “flash flood” असे म्हणतात. कमीतकमी वेळात जास्तीतजास्त पाऊस झाला किंवा धरण फुटले, बंधारे कोसळले तर जो पूर येईल त्याला “flash flood” म्हणतात. जर पाऊस हे कारण असेल तर पावसाची सुरुवात झाल्यानंतर ६ तासाच्या आत आलेल्या पुराला “flash flood”  म्हणतात. मोरबीत जे घडले ते फक्त पावसामुळे नव्हे. पावसासोबत मोरबीचे ‘मछू डॅम-२’चे मातीचे बंधारे कोसळल्याने झालेल्या जलप्रलयात  २०,००० माणसे मृत्युमुखी पडली.

बंधारे असे कसे वाहून गेले? हा प्रश्न साहजिकच मनात उभा राहतो. त्याचे उत्तर असे आहे की सत्तरीच्या दशकात जलसंधारणासाठी मातीचे धरण बांधणे ही राजमान्य पद्धत होती. अशा प्रकारच्या धरणात धरणाचा मुख्य भाग सिमेंट-कॉंक्रीटने बांधला जायचा, तर डाव्या आणि उजव्या बाजूचे बंधारे मातीचे असायचे. (नकाशा पाहा.) ज्या भागांमध्ये पर्जन्यमान कमी असते अशा भागात हे धरण कमीतकमी खर्चात तयार होते. लक्षात घ्या, आपल्याला स्वातंत्र्य मिळून तेव्हा जेमतेम ३० वर्षं होत होती. साहजिकच कमीतकमी खर्चात धरण बांधणे ही काळाची गरज होती.

चला तर आता वाचूया नक्की काय घडले होते.

ज्या मछू नदीचा उल्लेख वर केला आहे ती नदी गुजरातच्या सौराष्ट्र भागातली आहे. ज्या गावात पूर आला ते मोरबी एकेकाळी पॅरीस ऑफ सौराष्ट्र समजले जायचे. अतिशय समृद्ध अशा मोरबी परिसरात हजारो छोटेमोठे उद्योगधंदे होते. चणचण होती ती फक्त पावसाची. संपूर्ण पावसाळ्यात या भागात केवळ २० इंच (५० सेंटीमीटर) पाऊस पडायचा. यासाठी मछूवरती २ धरणे बांधण्यात आली. ‘मछू-१’ आणि ‘मछू-२’. यांपैकी मछू २ च्या पश्चिमेच्या बाजूला मोरबी जोधपाल, लीलापार, सनाला, अशी गावे आहेत.

१० ऑगस्ट १९८० रोजी पावसाला सुरुवात झाली. असा प्रचंड पाऊस शेकडो वर्षांत या भागात झाला नव्हता. जेथे वार्षिक पर्जन्यमान २० इंचाचे आहे तिथे एकारात्रीत २० इंच पाऊस पडला. त्यामुळे ११ ऑगस्टच्या दुपारी मछू-२ धरण फुटले आणि ही दुर्घटना घडली. दुर्दैव असे की पावसामुळे सर्व टेलिफोन लाईन, टेलेक्स लाईन, इलेक्ट्रिसिटी ही सर्व व्यवस्था कोलमडून पडली. परिणामी झालेल्या वाताहतीची बातमी फार उशिरा सरकारपर्यंत पोहोचली.

प्रसारमाध्यमांना तर २४ तासानंतर ही बातमी मिळाली. काहीजणांच्या मते ही बातमी आधी ‘बीबीसी’ने प्रसारित केली. इंग्लंडच्या भारतीय नागरिकांनी फोन केल्यानंतर परिस्थिती किती गंभीर आहे याची जाणीव झाली.

१० ऑगस्टला दुपारी पावासाची सुरुवात झाली.  धरणाचे प्रभारी अभियंता ए सी मेहता तेव्हा वाकानेरला होते . वाकानेर मछू डॅम-१ आणि मछू डॅम-२ मधले शहर आहे. त्यांनी वाकानेरला जाण्याचे कारणही तसे महत्वाचे होते. मछू -२ आणि वाकानेरमधला टेलिफोन संपर्क पूर्णपणे तुटला होता. मेहतांनी वाकानेरला येऊन राजकोटच्या कार्यालयाला पावसासंबंधी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी वाकानेरहून मछू डॅम-२ वरच्या कर्मचाऱ्यांना धरणाचे दरवाजे उघडण्याचा वायरलेस मेसेज पाठवला.

आदेशानुसार कर्मचारी दरवाजे उघडायला गेले. एकावेळी बटण दाबल्यावर दरवाजे दोन फूट वर जातील अशी व्यवस्था होती. अठरा दरवाजांपैकी सोळा दरवाजे १६ फूट उघडले आणि जनरेटरचा फ्यूज उडाला. दरवाजे पूर्णपणे उघडलेच नाहीत. पण इथे दुर्दैव आडवे आले. धरणावरचा जनरेटर बंद पडला. तो जनरेटर चालू केला की दरवाजे काही फूट उघडायचे आणि जनरेटर पुन्हा बंद पडायाचा. काही दरवाजे तर उघडले पण नाहीत. शेवटी जनरेटर पुन्हा चालू होण्याच्या पलीकडे गेला तेव्हा फारच उशीर झाला होता.

दोन्ही बाजूचे मातीच्या बंधाऱ्याची अवस्था चिखलाच्या गोळ्यासारखी झाली होती. त्यावरून परतीचा जाण्याचा मार्ग बंद पडला होता. पाण्याची उंची दरेक मिनिटाला वाढत होती. थोड्याच वेळात ती पातळी १९० फुटांच्या वर गेली. दोन्ही बाजूंचे बंधारे मुंग्यांच्या वारूळासारखे त्यांच्या नजरेसमोर वाहून गेले. पहिली लाट छोटी होती, पण त्यनंतरची लाट २५ फुटांची आली. त्यांनतरच्या लाटा किती मोठ्या आल्या हे बघायला कोणीच शिल्लक नव्हते.

धरण पूर्णपणे फूटून पाणी धरणाच्या खालच्या अंगास असलेल्या शहरात घुसले. मेहतांनी त्याच्या सेक्शन ऑफीसरला मामलेदाराला भेटून गावात धोक्याचे भोंगे वाजवण्याची सूचना दिली होती.  पण लोकांना गांभीर्य कळलेच नाही. त्यांना वाटले की शरात घुसलेले पाणी हे सतत पडणाऱ्या पावसाचे आहे. बऱ्याचवेळा असे व्हायचे की वरच्या अंगास असलेल्या मछू-१ ची पातळी वाढली की अशा धोक्याच्या सूचना दिल्या जायच्या. प्रत्यक्षात पूर कधीच यायचा नाही. त्यामुळे लोकांनी दुर्लक्ष केले आणि काही तासातच संपूर्ण शहरात विनाशाचे साम्राज्य होते.

सरकारी मदत पोहचण्याआधीच आसपासच्या शहरातून स्वयंसेवक मोरबीकडे रवाना झाले. हे स्वयंसेवक पोहचले खरे, पण प्रत्यक्ष परिस्थिती बघितल्यावर ते हतबुद्ध झाले. संपूर्ण शहर एक चिखलाच्या राड्यात होते. घरं, दुकानं, रस्ते काहीच शिलक नव्हतं. शहरात फक्त आक्रोश ऐकू येत होता. हवेत सडणाऱ्या प्रेतांचा पोट ढवळून टाकेल असा दुर्गंधी येत होता. विजेच्या खांबांवर ,रस्त्यावर चिखलात, भिंतीवर प्रेतच प्रेतं होती. काही जनावरांची तर काही माणसांची. शहरातला पूल वाहून गेला होता. एकेकाळी सौराष्ट्राचे पॅरिस अशी ख्याती असलेल्या शहराची मसणवट झाली होती.

एव्हाना सरकारी यंत्रणा कामास लागली होती. त्याच भागात दुसऱ्या एका धरणाजवळ गोरखा रेजिमेंटची एक तुकडी तैनात होती. ही तुकडी पुढच्या २४ तासात घटनास्थळी पोहोचली. जे पुराच्या तडाख्यातून वाचले होते त्यांचे लोंढे शहरातला चिखल तुडवत कुटुंबातल्या हरवलेल्या सदस्यांच्या शोधत होते. या लोकांसाठी आश्रयस्थान निर्माण करून स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणं अत्यन्त आवश्यक होतं. पुराचं पाणी होतं, पण ते पिऊन साथीचा रोग पसरला असता. शहराचा वीज पुरवठा बंद पडला होता. जनरेटरसाठी डीझेल पण नव्हते, टेलिफोनच्या सर्व लाईन्स खांबांसकट पुरात वाहून गेल्या होत्या. संकट चारीबाजूने आ वासून उभे होते.

या पूरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुरुवातीला ११९० अशी सांगण्यात आली होती. पण प्रत्यक्षात हा आकडा २०००० पर्यंत असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. हाती लागलेले मृतदेह  पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होते. पाण्याने फुगून गेले होते. उचलायला जावे तर तुकडेच हातात येत होते. स्वयंसेवकांच्या अंगावर त्या देहात साचलेले पाणी उडत होते. अशा परिस्थितीत मोजणी करणे शक्यच नव्हते. एका वेळी एका चितेवर पन्नास साठ मृतदेह ठेवून अग्नी दिला जायचा. त्या देहांची ओळख पटवणे देखील शक्य नव्हते. अंगावर असलेल्या कपड्यावरून काहींची ओळख पटली, पण ती संख्या फारच कमी होती. शहरात वस्तीस असलेल्यांची प्रेते चार ते पाच किलोमीटर वाहून गेली होती.

एक हृदयद्रावक उदाहरण पाहा. पूर आला तेव्हा एक शेतकऱ्याच्या घरात एकूण सहा अपत्यं होती. एक तान्ही मुलगी आणि पाच मुलगे. पूर आल्यावर हा शेतकरी तान्ह्या मुलीला, पत्नीला आणि वृद्ध आईला घेऊन झाडावार चढला. पाचही मुलगे घराच्या छतावर चढले होते. पाण्याच्या एका लोटात त्याच्या नजरेसमोर घराचे छत कोसळून पडले आणि लोंढ्यात पाचही मुले वाहून गेली. या मुलांचे देह चार पाच दिवसांनंतर घरापासून तीन चार किलोमीटर अंतरावर एका मिठागरात सापडले.

पण जवळजवळ सगळ्याच घरांची ही अवस्था होती. हॉस्पीटलमधले अंथरुणाला खिळलेले पेशंट, तुरुंगात बंदिस्त असलेले कैदी, या लोकांना जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही. जन्मठेपेची शिक्षा भोगणारा टापू नावाचा एक गुन्हेगार पुरातून पोहत-पोहत बाहेर पडला. पुढचे ३ दिवस तो इतरांना वाचवण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत कामाला लागला. त्यानंतर पुन्हा एकदा तो कायद्याच्या स्वाधीन झाला. एकवेळ तर अशी होती की तुरुंगातले कैदी आणि पोलीस अधिकारी एकाच निराधारांच्या छावणीत होते.

आसरा घ्यावा असे छप्पर  नाही, पिण्याचे पाणी नाही, वीज नाही अन्न नाही, औषधं नाही, कपडे नाहीत, आजूबाजूला फक्त कोसळलेल्या घरांचे अवशेष, चिखलाचे ढिगारे, कोसळलेले विजेचे खांब आणि सडणारे मृतदेह-माणसांचे आणि जनावरांचे!

अशा अवस्थेत सुरुवातीला मदतीला आले ते स्वयंसेवकांचे थवे आणि गोरखा रेजिमेंटचे सैनीक! मृतदेहांना अग्नी द्यायला सुकी लाकडे पण नव्हती. हे मृतदेह एकत्र करताना स्वयंसेवकांचे मनोधैर्य तुटून पडायचे. त्यांना दर दोन तासाने सक्तीची विश्रांती घ्यायला लावून मनोबल उंचावण्याचे प्रयत्न करावे लागायचे.

हळूहळू राजकोटमार्गे सरणाची लाकडे आली. पण पाण्यानी फुगलेली प्रेते त्या चितेवर जळेनात. मग स्वयंसेवकांनी हायवेवरून धावणाऱ्या पेट्रोल टँकरना अडवून मोरबीकडे वळवले. काहीना सक्तीने, तर काहींचे मन वळवून. दुसरा इलाजच शिल्लक नव्हता. त्यामुळे मोरबीत किती जणांचे प्राण गेले हे कधीच निश्चित कळाले नाही, पण सरकारी आकडा आजही दोन हजारांचीच नोंद सांगतोय.

१२ ऑगस्टपासून सुरु झालेल्या मोहिमेचे नेतृत्व स्पेशल सेक्रेटरी एच. के. खान या सनदी अधिकाऱ्याने केले. सर्वप्रथम त्यांनी जो निर्णय घेतला तो आजही पाळला जावा अशी अपेक्षा करावी असा होता. येणाऱ्या सर्व व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पुढाऱ्यांचा भेटीचा मार्ग त्यांनी असा आयोजित केला होता की आलेला माणूस परिस्थिती बघून ताबडतोब शहराच्या बाहेर पडायचा. (एच. के. खान यांचे यावर्षीच म्हणजे २०१९ साली निधन झाले.)

(स्पेशल सेक्रेटरी एच. के. खान)

मोरबी पूर्ववत होण्यासाठी बरेच दिवस लागले. सरकारी कचेरी पाण्यात वाहून गेली होती. या सर्व दिवसात मुख्यमंत्री बाबूभाई पटेल, कृषी मंत्री केशुभाई पटेल आणि स्पेशल सेक्रेटरी एच के खान मोरबीतच राहत होते. मुख्यमंत्री रोज सकाळी ९ वाजता कामाला सुरुवात करायचे. त्यांचा दिवस रात्री १ वाजता संपायचा. मोरबीतल्या मणी मंदिरमध्ये दिवसभराच्या कामाची रुपरेषा आखली जायची आणि झालेल्या कामाचा आढावा घेतला जायचा. मोरबीचे मेयर मयूर पारेख त्यांना मदत करण्यासाठी रोज राजकोटहून सकाळी यायचे आणि रात्री परत जायचे. दु:खाची गोष्ट अशी होती की या पुरात त्यांचा मुलगा मरण पावला होता. ते दु:ख बाजूला सारून मयूर पारेख दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले होते. हेलिकॉप्टरमधून पूरस्थितीची पाहणी करणारे मुख्यमंत्री तेव्हा जन्माला आले नव्हते.

(त्यावेळचे मुख्यमंत्री बाबूभाई पटेल)

मदतीचा ओघ चारी दिशांनी मोरबीत पोहोचला. सुरुवातीला ट्रक पोहचला की पूरग्रस्तांचे लोंढे धाव घ्यायचे. साबण, तेल, केरोसीन,मेणबत्त्या, कपडे, माचीस, भांडी, अन्नधान्याची पोती अशी मदत मोरबीत यायची. जो पहिला पोहचेल त्याला सामान मिळायचे. एच के खान यांच्या ते लक्षात आल्यावर त्यांनी शिस्तीचा अवलंब केला. मदतीचे ट्रक ताब्यात घेऊन सामान शहराच्या चार वेगवेगळ्या डेपोत पाठवायला सुरूवात केली. हे डेपो सांभाळण्याचे काम सेवाभावी संस्थाना दिले. रामकृष्ण मिशनकडे अन्न वाटपाचे काम दिले.  वेगवेगळ्या धार्मिक संस्थांनी पैशाची मदत दिली. अहमदाबादेत सिनेस्टार नाईट झाली. सगळा देश मोरबीच्या मागे उभा होता, पण काही अप्रिय घटनाही घडल्या.

सुरुवातीला मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत या जाणिवेने लोक भारून गेले. पण काही दिवसांतच त्यांना रस्त्यात अडवून त्यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात झाली. मदत अधिकाऱ्याचा बराचसा वेळ वाया जायला लागला. उच्च जातीचे लोक हरिजनासोबत मदतीच्या रांगेत उभे राहण्याचे टाळायला लागले. मदत सर्वत्र पोहचत होती, पण मुस्लिम वस्त्यांकडे कोणीही फिरकत नव्हते. लोकांनी मदतीचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. साठेबाजीला उत आला. अशाच एका तपासणीत एक बाईने मदत म्हणून आलेले नऊ स्टोव्ह साठवून ठेवलेले मिळाले. हे निश्चितच वाईट होते. पण करणार काय, सगळेच एक दिवसात भिकारी झाले होते.

वर्षभरातच मोरबी सुरळीत चालू झाले. विरोधी पक्षांनी चौकशीची मागणी केली. त्या सर्व अहवालातून एकच निदर्शनास येते की एका रात्रीत पडलेला पाऊस हा दैवी प्रकोप असेल, पण त्यानंतर तुटलेले दळणवळण आणि संचारव्यवस्था हा केवळ सरकारी हलगर्जीपणाचा नमुना होता.

चौकशी अहवालात एका गंभीर बाबीची नोंद कधीच घेण्यात आली नाही. ती अशी की १० ऑगस्टला कृषिमंत्री केशुभाई पटेल धरणाला भेट देण्यास निघाले होते, पण रस्त्यात पाणी साचल्याने ते राजकोटकडे निघून गेले. राजकोटला पोहोचल्यानंतर परिस्थिती किती गंभीर आहे याची त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती पण दिली नाही. ही आगाऊ सूचना मिळाली असती तर....??? दुर्दैवाने हेच गृहस्थ काही वर्षांनी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. 

या पावसाळ्यात अशीच पूर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातही आली होती, पण एनडीआरएफ आणि चारही दिशांनी मिळणारी मदत यामुळे कोल्हापूरचे मोरबी होता होता वाचले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required