computer

जगातील बाजारपेठ जिंकणार्‍या मॅगीला खो देणार्‍या वाई वाई- या नेपाळी नूडल्स ब्रँडबद्द्ल वाचाच !

गेली अनेक वर्षं 'मॅगी' आपल्या सैपाकघरात ठाण मांडून बसली आहे. आज माझा नूडल्स खायचा मूड आहे असं म्हणावं आणि गृहिणीच्या चेहेर्‍याकडे बघावं. 'सुटले गं बाई आज रोजच्या कटकटीतून' असा भाव घरातल्या बाईच्या चेहेर्‍यावर दिसतो.

पण आता दुसरा सीन बघा.
घरी बरेच पै-पाहुणे गप्पा हाणत बसलेत आणि 'मॅगी' खाणार का? हा प्रस्ताव मतदानाला टाकला तर एखादा तरी पाहुणा -
मॅगी नको 'टॉप रॅमेन' आहे का ? असं विचारतोच. 
त्याच्याकडे बाकीचे सगळे हा आपल्या भावकीतला नाही असंच बघतात.

आता तिसरा सीन बघा. 
प्रस्ताव अर्थातच 'मॅगी' खाणार का ? 
एखादं चिंटं म्हणतं 'मला वाई वाई पायजे' 
आता भावकीच्या बाहेर बसलेला 'टॉप रॅमेन'वाला पण त्या चिंट्याकडे 'हे बेणं कुठून आलं इथे' असं बघायला लागतो.

आता तुमच्यापैकी पण बरेचजण हा 'वाई वाई' काय प्रकार आहे असा विचार करत असाल तर सांगतोच. भारतात सध्या 'मॅगी'च्या वर्चस्वाला थेट टक्कर देणारा नूडल्सचा ब्रँड म्हणजे ' वाई वाई'. भारतासह ३५ देशात पसरलेला हा ब्रँड 'नेस्ले इंडीया' म्हणजे मॅगीच्या निर्मात्यांची डोकेदुखी झाला आहे. पण या नूडल्सच्या चर्चेत आणखी पाणी घालून काहीतरी फुळकवणी करण्यापेक्षा थेट विषयालाच हात घालू या !

इंस्टट नूडल्स आपल्याला आता नवीन नाहीत. सुरुवातीच्या काळात नवं 'फ्याड' अशी त्यांची संभावना झाली, पण आता ते घराघरात पोहचलं आहे. इंस्टट नूडल्समध्ये 'मॅगी' एक नंबरवर असलं तरी मॅगीसोबत निसीनचं टॉप रॅमेन- नॉर कंपनीचं सूपी नूडल्स- सनफिस्ट यीप्पी-चिंग शेजवान- रामदेव आटा नूस्डल्स हे ब्रॅंड गर्दी करून उभे आहेत. या गर्दीला धक्के मारत म्हणजेच या मातबर कंपन्यांना बाजूला सारत 'वाई वाई' हा एक छोटा ब्रँड झपाट्याने पुढे येतो आहे.

'वाई वाई' हे नाव आपल्यासाठी नवं आहे पण 'वाई वाई' १९८४ पासून बाजारात उपलब्ध आहे. आपल्या भारतीय बाजारात नाही, नेपाळच्या बाजारात ! आता नेपाळच का तर त्याचं कारण असं आहे की 'वाई वाई' हे नेपाळचं उत्पादन आहे. जे भारतात,चीनमध्ये किंवा आशिया खंडातल्या इतर कोणत्याही उद्योगप्रधान देशात जे घडलं नाही ते नेपाळमध्ये बिनोद चौधरी नावाच्या उद्योजकाने करून दाखवलं. आता नेपाळमध्ये नूडल्स म्हणजे फक्त 'वाई वाई' ! नेपाळी जनता दिवसाला चाळीस लाख वाई वाईची पाकीटं फस्त करते.गेल्या काही वर्षांपूर्वी 'वाई वाई' नेपाळमार्गे भारतात आलं आणि त्यानी हळूहळू उत्तर-पूर्वेचं मार्केट ताब्यात घेतलं.

आता तर भारतातच त्यांचे उत्पादन सुरु झाले आहे. आता या नूडल्समध्ये काय खास आहे हे समजून घेऊच पण त्याआधी बिनोद चौधरींची ओळख करून घेऊ या.

(बिनोद चौधरी)

बिनोद चौधरी यांचे कुटुंब मूलतः राजस्थानच्या शेखावतीचे पण चार पिढ्यांपूर्वी त्यांनी नेपाळमध्ये स्थलांतर केले. त्यांचा मुलगा निर्वाण चौधरी ही त्यांची नेपाळमधील चौथी पिढी आहे. त्यांच्या कुटुंबाचा मूळ व्यवसाय टेक्स्टाइल्सचा आहे. आता मात्र त्यांना 'वाई वाई बिलीयनर' अशी ओळख मिळाली आहे. 

नेपाळच्या त्रिभुवन विमातळावर चौधरींना अनेक नेपाळ फिरायला आलेले प्रवासी 'मॅगी'ची पाकीटं घेऊन येताना दिसायचे. त्यांच्यातल्या जागृत धंदेवाईकाने नूडल्सच्या मार्केटमधली संधी हेरली. त्यांना नेपाळमध्ये 'मॅगी' आणायचं नव्हतं. नूडल्स उत्पादन करणारे ते नेपाळचे पहिले उद्योजक नव्हते. त्यावेळी नेपाळच्या बाजारात हिमश्री फूड या कंपनीच्या 'रारा' नूडल्सने बाजारात बस्तान बसवलेले होते. हिमश्री सोबत स्पर्धा करण्यासाठी नेस्ले सोबत काम करणे त्यांना शक्य नव्हतेयासाठी चौधरींनी थायलंडमध्यल्या एका कंपनीशी संपर्क केला. 'वाई वाई' हे त्या कंपनीचा ब्रँड होता. थायी भाषेत वाई वाई म्हणजे लवकर लवकर ! १९७४ साली त्यांनी हा ब्रँड विकत घेतला आणि कामाला सुरुवात केली. आजही त्या कंपनीला ते रॉयल्टी देतात.

नूडल्सच्या व्यवसायात येण्याचे आणखी एक महत्वाचे कारण बिनोद चौधरींकडे होतं. त्यांच्या वडीलांची नेपाळमध्ये ' इंडस्ट्रीअल फ्लोर मिल' होती. या मिलमध्ये उरलेल्या म्हणजे 'सरप्लस' पिठातून ते ' पशुपती' नावाची बिस्कीटं बनवायचे. नूडल्स बनवायचे हे आणखी एक कारण होते. नूडल्सच्या उत्पादनामुळे त्यांच्या फ्लोर मिलमध्ये 'सरप्लस स्टॉक' उरण्याची शक्यता शून्यवत झाली.

नेपाळच्या बाजारात वाई वाईचा खप होण्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील सर्वसामान्य माणूस. नेपाळमधील सर्वसामान्य माणूस मुख्यत: शारिरीक श्रमाची कामं करतो. त्याचं 'बजेट' मर्यादीत असतं. त्या बजेटमध्ये वाईवाईचे एक दहा रुपयाचे पाकीट घेतले, त्यात मिळतील त्या भाज्या घातल्या की पोट भरेल इतकं पोषण मिळतं. केवळ १० रुपयांचे पाकीट हेच एक आकर्षण नाही. वाई वाईची नूडल्स पाण्यात न टाकताही खाता येतात. 'मॅगी' नूडल्स या पध्दतीने खाता येत नाहीत. मॅगीच्या ५०% किमतीत वाई वाई मिळतं हा पण महत्वाचा मुद्दा आहेच. त्याखेरीज येता जाता सहज खाता यावीत अशी नूडल्सच्या चुर्‍याची पाकीटं पण २ रुपयात मिळतात. थोडक्यात किंमत, सोय, दर्जा या तिन्ही पातळीवर वाई वाई सरस असल्याने ते लोकांचे आवडते नूडल्स झाले आहेत.

नेपाळचे मार्केट काबीज केल्यावर चौधरींनी नूडल्सच्या एक्स्पोर्ट मार्केटकडे लक्ष वळवले. गमतीची गोष्ट अशी की परदेशात जाहिरात करण्यासाठी त्यांना ब्रँड अ‍ॅबेसेडरची गरजच पडली नाही. नेपाळी लोक भारतासह जगातल्या अनेक देशात कामगार किंवा सैनीक म्हणून नोकरी करतात. हेच लोक घरून येताना ' वाई वाई' घेऊन येतात आणि वाई वाईचा प्रचार होतो. भारत, सौदी अरेबिया, कझाकस्तान, बांगलादेश, सर्बिया सह ३५ देशात 'वाई वाई' पोहचलेलं आहे. १३ वेगवेगळ्या स्वादात 'वाई वाई' मिळतं. या देशांमध्ये दरवर्षी वाईवाईची २८० कोटी पाकीटं संपतात. सध्या नेपाळचे ५०% मार्केट तर जागतिक स्तरावर ३% मार्केट त्यांच्या ताब्यात आहे. भारतात त्यांची फॅक्टरी सुरु झालीच आहे. भारतात आसाम, उत्तरप्रदेश, बंगाल, हरयाणा, राजस्थान, सिक्कीम आणि इशान्येकडील अनेक राज्यात नूडल्सच्या प्रस्थापित ब्रँडचा हिस्सा वाई वाईने काबीज केला आहे. भारतातील नूडल्सचे २०% मार्केट त्यांच्याकडे असल्याचा बिनोद चौधरींचा दावा आहे.

पण वाचकहो, 'वाई वाई' ची कहाणी तुम्हाला सांगण्यामागे आमचा उद्देश फारच वेगळा आहे. बोभाटाचे अनेक वाचक छोटे उद्योजक आहेत. त्यांना स्फूर्ती मिळावी आणि मार्केट काबीज करण्यासाठी कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो, हे सांगणे हा लेखाचा उद्देश आहे. वाचकांच्या सोयीसाठी या मुद्द्यांना आम्ही बोल्ड केले आहे, ते काळजीपूर्वक बघा.

त्याचे विवरण सोबत देतो आहे ते वाचा आणि प्रश्न विचारा.

१. प्रवासी 'मॅगी'ची पाकीटं घेऊन येताना दिसायचे- धंद्याची संधी हेरत राहा .

२. त्यांना नेपाळमध्ये 'मॅगी' आणायचं नव्हतं- आंतरराष्ट्रीय कंपनीला सोबत घेणे बर्‍याच वेळा अडचणीचे असते, कारण ते स्थानिक भागीदाराला मॅनेजमेंटचे समान हक्क देत नाहीत. चौधरींना स्वातंत्र्य हवे होते.

३. 'सरप्लस स्टॉक' उरण्याची शक्यता शून्यवत झाली- त्यांच्याकडे जो कच्चा माल वाया जाण्याची शक्यता होती त्याचा योग्य वापर केला.

४. नेपाळमधील सर्वसामान्य माणूस- आपल्या ग्राहकाची 'प्रोफाईल' अभ्यासून बघा. त्याला हवं ते द्या, तो आनंदाने घेईल.

५. ब्रँड अ‍ॅबेसेडरची गरजच पडली नाही- तुमचा संतुष्ट ग्राहकच तुमचा ब्रँड अँबॅसेडर असतो.

तुम्हाला आणखी काही मुद्दे सुचत असतील तर नक्की भर घाला. तुमच्या कमेंटची आम्ही वाट बघत आहोत.

सबस्क्राईब करा

* indicates required