भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या ‘ढाक-बहिरी’ किल्ल्याबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
महाराष्ट्रातले गिरिदुर्गांची उंची बघून आजही अनेकांना घाम फुटतो. नाशिकचा हरिहरगड, माळशेज जवळचा हरिश्चंद्रगड, अलंगगड, कलावंतीण दुर्ग अशी कित्येक नावं घेता येतील. आज आम्ही ज्या किल्ल्याची ओळख करून देणार आहोत तो मात्र या सगळ्यांचा कळस म्हणावा लागेल. हा किल्ला म्हणजे ‘ढाक बहिरी’.
ढाक बहिरी तब्बल २७०० फुट उंच आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात गुहा आहे. किल्ल्याचा वापर टेहळणीसाठी केला जायचा.किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो रस्ता आहे तो या किल्ल्याला सगळ्यात अवघड बनवतो.
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोरखंडाचा वापर केला जातो. ही वाट चक्क ७० अंश कलेली आहे. दोरखंड, कातळात कोरलेली वाट आणि मध्येमध्ये असलेल्या खोबण्या यांच्या सहाय्याने प्रवास करावा लागतो. किल्ला चढताना आठ ते दहा मीटर लांब खिंड लागते. पुढे कातळकडा चढवा लागतो. हा कातळकडा पार करताना अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत.
तुम्ही जर अनुभवी ट्रेकर असाल तरच हा किल्ला सर करण्याचा प्रयत्न करू शकता. एकदा का तुम्ही किल्ल्यावर पोहोचलात की तुमची मेहनत किती सार्थ होती हे तुम्हालाच समजतं. या भागातून सह्याद्री आणि तिथल्या निसर्गाचं अनोखं दर्शन घडतं. नीट निरीक्षण केल्यास तुम्हाला राजमाची, विसापूर, माणिकगड आणि कर्णाला किल्ले दिसतात.
किल्ल्यावर काय काय पाहण्यासारखं आहे ?
किल्ल्याच्या वरच्या भागात गुहा लागते. या गुहेत ढाक बहिरीचं मंदिर आहे. तिथे रात्री निदान ४ लोकांना राहता येईल एवढी प्रशस्त जागा आहे. गुहेत पाण्याचे टाके देखील आहे. रात्री राहणार असाल तर तुम्हाला अन्नपदार्थ सोबतच न्यावे लागतात. गडाच्या वरच्या भाग अर्धा तासात फिरून होतो. या भागात शिवमंदिर, ढासळलेला वाडा, भवानी मंदिर पाहायला मिळतं.
कसे जाल ?
कर्जत येथून १२ किलोमीटरवर जांभिवली गाव आहे. या गावापासून काही अंतरावर कोंडेश्वर मंदिर आहे. तिथून पुढे चालत गेल्यावर खिंड लागते.
तर, नवीन वर्षात नवीन अनुभव घ्यायचा असल्यास ढाक बहिरी सारखं दुसरं आव्हान मिळणार नाही. पण त्यापूर्वी संपूर्ण तयारी करूनच हे आव्हान स्वीकारा.