computer

तीन चाकी गाडीवर तयार केलेलं जगातलं पहिलं घर...

चार चाकी वाहनाचं रुपांतर घरात केलेलं तुम्ही नक्कीच बघितलं असेल. कारच्या इतिहासाएवढाच फिरत्या घरांचा इतिहास सुद्धा जुना आहे. सुरुवातीच्या काळात हा एक जुगाड होता, पण आता या कल्पनेने मोठं रुप घेतलं आहे. वाहनाला कोणत्या प्रकारे बदलायचं, आतल्या गोष्टींची मांडणी कशी असली पाहिजे, वजन किती असलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींचं नियोजन करून फिरतं घर तयार केलं जातं. आज आपण भारतातल्या एका अनोख्या फिरत्या घराबद्दल जाणून घेणार आहोत.

तामिळनाडूच्या नमक्कल येथील २३ वर्षांच्या अरुण प्रभू नावाच्या तरुणाने चक्क रिक्षाचं रुपांतर फिरत्या घरात केलं आहे. तो बंगलोरच्या Billboards या स्टार्टअपमध्ये काम करतो. त्याने Bajaj RE रिक्षाचं रुपांतर घरामध्ये केलं आहे. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हा कोणताही जुगाड नसून नियोजनबद्धतेने तयार केलेलं घर आहे. ५ महिन्यांची मेहनत आणि लाखभर पैसे खर्चून त्याने हे घर तयार केलं आहे.

अरुणच्या डोक्यात सुरुवातीपासूनच अशा हटके आयडिया होत्या. त्यातली तीन चाकांवर उभ्या असलेल्या घराची कल्पना त्याने साकारायला घेतली. आजवर चार चाकी वाहनावर घर बांधल्याची अनेक उदाहरणं झाली आहेत, पण ३ चाकी वाहनावर असा प्रयोग कोणी केलेला नाही. अरुण समोर मार्गदर्शनासाठी पूर्वी केलेलं कोणतंही काम नव्हतं.त्याला स्वतःलाच नव्याने सुरुवात करायची होती. हे खऱ्या अर्थाने आव्हानात्मक होतं.

कामाला सुरुवात कशी झाली ?

अरुणने बजाजच्या जुन्या रिक्षाचा वापर केला. त्याने आपल्याला नेमकं कशा पद्धतीने काम करायचं आहे याचं नियोजन केलं. त्यानंतर रिक्षाची मागची बाजू काढून टाकली. त्याजागी बसच्या वेगवेगळ्या भागांचा वापर करून ढाचा तयार केला. आत कोणत्या गोष्टी कुठे असतील याचं योग्य नियोजन करण्यात आलं.

घरात काय काय आहे ?

प्रवाशांना आणि लहानसहान विक्रेत्यांना आपल्या हक्काची जागा असावी या उद्देश्याने हे घर तयार करण्यात आलं आहे. घरात ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या सगळ्या या लहानशा ठिकाणी बसतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. उदाहरणार्थ आत लहानसं बेडरूम, बाथरूम, किचन, काम करण्यासाठी जागा, पाणी गरम करण्यासाठी हिटर,कपड्यांसाठी छोटं कपाट, आणि टॉयलेटची व्यवस्था आहे.

पाण्यासाठी छतावर २५० लिटरची टाकी बसवण्यात आली आहे. सोबत ६०० व्होल्ट क्षमतेची सौर उर्जेची यंत्रणा आहे. हे सगळं एका माणसाला राहता येईल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलंय. म्हणूनच टॉयलेटसाठी खोली नसून लिव्हिंग रूममध्येच टॉयलेटची व्यवस्था आहे. प्रायव्हसीचं म्हणाल तर आतली पूर्ण केबिन हीच प्रायव्हेसी आहे.

अरुणने तयार केलेलं हे तीन चाकी घर सुरक्षेच्या दृष्टीने पुरेसं तयार नाही. हे मान्य केलंच पाहिजे. एक वेगळी सुरुवात म्हणून या प्रयोगाकडे नक्कीच बघता येईल. तीन चाकी गाडीवर तयार झालेलं हे जगातलं पहिलं घर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्हाला हे घर आवडलं का ?

सबस्क्राईब करा

* indicates required