computer

भवाल संन्यासी - DNA टेस्ट अस्तित्वात नसलेल्या काळात २६ वर्षे चाललेली तोतया की खरा राजा याच्या ओळखीची जगप्रसिद्ध केस!!

तुम्ही अनेक सिनेमे बघितले असतील ज्यात दोन भावंडं असतात- मग त्यांची ताटातूट होते - अचानक  दैवाच्या फेर्‍याने ते समोरासमोर येतात  - दोघांची मारामारी होते - शर्ट वगैरे फाटून शरीरावरची एखादी खूण दिसते. मग काय, ओळख पटते आणि चित्रपटाचा गोड गोड शेवट वगैरे  वगैरे होतो!! 

सिनेमाचं जाऊ दे हो. आम्हांला हे म्हणायचंय की अशा शरीरावरच्या खुणा आपली ओळख पटवत असतात. आता आपलं आधार कार्डसुद्धा बोटांच्या ठशांवर आणि डोळ्यांच्या बाहुलीच्या Iris आधारित असतं, ज्याला बायोमेट्रीक आयडेंटीफीकेशन म्हटलं जातं. त्याही पलीकडे जाऊन ओळख पटवण्याचा शेवटचा उपाय म्हणून डीएनए टेस्ट आहेच. हे उपाय जेव्हा नव्हते, तेव्हा "मी मीच आहे" हे सिध्द करण्यासाठी शरीरावरच्या खाणाखुणा हा एकच कायदेशीर आधार होता. आज जी भवाल संन्याशाची सत्यकथा  तुम्हाला सांगणार आहोत ती आहे शारीरिक खुणांवरून ओळख पटवण्याची अशीच एक घटना… ही तुम्हाला सिनेमाची स्टोरी वाटली तरी हरकत नाही, कारण या घटनेवरूनच अनेक सिनेमांच्या कहाण्या रचल्या गेल्या आहेत! 
 

तर, ही स्टोरी घडलीय साधारण १९०९ ते १९४६ इतक्या मोठ्या कालखंडात! या स्टोरीचा हिरो आहे राजा रामेन्द्र नारायण रॉय. याला मेलेला  म्हणून घोषित केलं गेलं होतं.  परंतु तो तब्बल दहा वर्षांनी संन्याशाच्या रुपात परत आला. इतकंच नव्हे तर कोर्टात जाऊन त्यानं मीच तो राजा आहे असं सिद्ध केलं. या अतिशय गाजलेल्या केसला ‘भवाल संन्यासी केस’ म्हणून ओळखलं जातं. चला तर मग जाणून घेऊया नेमकं काय घडलं होतं या आगळ्यावेगळ्या केसमध्ये… 

ही घटना आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली. तेव्हा बंगालचे दोन तुकडे झालेले नव्हते. त्यावेळी बंगालमधली सर्व जमीन बारा जमीनदारांमध्ये -संस्थानिकांमध्ये वाटली गेली होती. या बारा जमीनदारांना "बारा भुईंया" असं म्हटलं जायचं. यापैकी एक होते  आता बांगलादेशात असलेले  भवाल इस्टेट नावाचे मोठे संस्थान!! या संस्थानचे राजे होते भवाल राजे. यांना तीन मुले आणि एक मुलगी होती. या तीन मुलांतला मधला मुलगा म्हणजेच आपल्या कहाणीचे मुख्य पात्र, रामेंद्र नारायण रॉय उर्फ भवाल संन्यासी!! 
 

त्या काळच्या इतर जमीनदारांसारखाच हा रामेंद्र रॉय अय्याश होता. याला स्त्रियांच्या गराड्यात राहायला अतिशय आवडत असे. सोबत बाकीची इतर व्यसनं होतीच. त्याचा बराचसा वेळ शिकारीमध्ये आणि आपल्या रखेलींसोबत जात असे. वयाच्या पंचविसाव्या वर्षी याला सिफिलीस नावाचा आजार झाला आणि डॉक्टरांनी उपचारासाठी दार्जिलिंगला जाण्याचा सल्ला दिला. मग १९०९ साली तो आपली पत्नी विभावती देवी, पत्नीचा भाऊ सत्येंद्रनाथ बॅनर्जी आणि फॅमिली डॉक्टर यांच्या सोबत रामेन्द्र रॉय दार्जिलिंगला गेला. पण तिथं गेल्याबरोबर रामेन्द्र रॉयला पत्नी आणि डॉक्टरांनी ७ मे रोजी मृत घोषित केले आणि गेलेले सगळेजण दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ मे रोजी तिथेच त्याचा अंत्यसंस्कार करून परत भवाल इस्टेटला परत आले. सर्वजण रामेन्द्र नारायण रॉयला विसरून गेले, ते तब्बल दहा वर्षांनी तो परत येईपर्यंत…

या मधल्या दहा वर्षाच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. दार्जिलिंग वरून परत आल्यानंतर रामेन्द्रची पत्नी विभावरी देवी ही भावासोबत ढाक्याला निघून गेली होती. रामेन्द्रचे दोन्ही भाऊ निरनिराळ्या कारणांनी निधन पावले होते. आणि संस्थानाला कुणी वारस उरला नसल्याने ब्रिटिशांनी कोर्टामार्फत हे संस्थान त्यांच्या ताब्यात घेतलं होतं.

और दस साल बाद कुछ ऐसा हुआ की सब चौंक गये!

१९२० मध्ये एक संन्यासी संपूर्ण अंगाला राख फासलेल्या अवस्थेत संस्थानात दाखल झाला. याचे आपले एकच काम, भिक्षा मागून खायचे आणि संस्थानाच्या रस्त्यांवरून फेरफटका मारायचा! पण त्याचे बलिष्ठ शरीर आणि तो दिसायला बराचसा रामेन्द्र नारायण सारखा असल्याने त्याने संस्थानात राहणाऱ्या रहिवाशांचे लक्ष वेधून घेतले नसते तरच नवल. रामेन्द्र नारायण कसाही असला तरी नागरिकांचा राजा होता. आपल्या लाडक्या राजाचे रूप त्या संन्याश्यात बघून लोकांना कमालीचा आनंद झाला. लोक त्याच्याभोवती गर्दी करू लागले आणि तूच आमचा राजा रामेन्द्र आहेस असे म्हणू लागले. राजा परत आला ही बातमी पाहता पाहता वणव्यासारखी पसरली! लोकांची ही चर्चा रामेन्द्रच्या बहिणीच्या कानावर गेली आणि तिनं याची खात्री करून घेण्यासाठी तिच्या मुलाला संन्याशाकडे पाठवले. भाचा मामाला भेटायला तर आला खरा, पण हाच आपला मामुजान आहे याची खात्री मात्र त्याला पटली नाही. इकडे लोकांचा जोर वाढतच होता. सर्वांच्या आग्रहावरून शेवटी संन्याश्याने मौन सोडले आणि कबूल केले की, "होय, मीच राजा रामेन्द्र नारायण रॉय आहे"!

सगळीकडे एकच खळबळ माजली… एका व्यक्तीला मृत घोषित करून आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करूनसुद्धा दहा वर्षांनी ती व्यक्ती परत येते म्हंटल्यावर खळबळ माजणार नाही तरच नवल! 

(भवाल राजबारी)

हा काय प्रकार? भुताटकी तर नव्हे? मात्र याचेही स्पष्टीकरण संन्याशाकडे तयार होते! त्याच्या सांगण्यानुसार त्याला, म्हणजे राजा रामेन्द्रला दहा वर्षांपूर्वी जेव्हा दार्जिलिंगला घेऊन गेले, तेव्हा त्याला समजलं की राजाच्या राणीचे आणि फॅमिली डॉक्टरचे अनैतिक संबंध आहेत. आता ही गोष्ट राजाला समजल्यावर राणी थोडीच गप्प बसणार? तिने राजाच्या जेवणात विष घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा विषामुळे रामेन्द्र नारायण बेशुद्ध झाला, तेव्हा घाईघाईने चिता रचली गेली आणि त्यावर रामेन्द्रला ठेवून आग लावली गेली. चितेला आग लावताच मोठे वादळ आले आणि पाऊस सुरू झाला. अंत्यसंस्काराला जमलेले सगळे जिकडे तिकडे आसरा शोधण्यास पांगले. वाऱ्यामुळे आणि पावसामुळे आग विझल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. इतक्यात त्या ठिकाणी काही नागा साधू फिरतफिरत आले व रामेन्द्र नारायण रॉय जिवंत असल्याचे पाहून त्याला चितेवरून काढून आपल्या सोबत घेऊन गेले आणि त्या साधूंनी त्याच्यावर उपचार करून शरीरातले विष काढून टाकले. इकडे वादळ कमी झाल्यावर परत चितेला आग लावण्यात आली. सर्वांचा असा समज झाला की राजा रामेन्द्र नारायण रॉय चितेत जळून संपला. 

काय मंडळी? वाटत आहे ना सिनेमाची स्टोरी? पण ही सत्य घटना आहे हे लक्षात असू द्या. 

संन्याशाची ही कहाणी लोकांना पटली. काही दिवसांनी  रामेंद्रच्या बहिणीची खात्री झाली की हाच आपला भाऊ आहे. त्यानंतर त्याला कित्येक नातेवाईक आणि संस्थानातील नागरीक भेटायला येऊ लागले. जो तो आपापल्या परीने प्रश्न विचारून खात्री करून घेऊ लागला. एका जवळच्या नातेवाईकाने त्याच्या लहानपणी सांभाळ केलेल्या दूध-दाईचे नाव विचारल्यावर रामेन्द्रने ते अचूक सांगितले. मग मात्र संन्यासी हा रामेन्द्रच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. कारण, त्या स्त्रीचे नाव अतिशय गोपनीय होते आणि फारच जवळचे नातेवाईक वगळता बाकी कुणाला ठाऊक नव्हते.

पण अजूनही पत्नी विभावरी देवी हे मानण्यास तयार नव्हती की हाच तिचा पती आहे. कशी मानेल? तिने तर त्याची भेट घेण्याचे सुद्धा नाकारले आणि हा कुणीतरी तोतया आहे असे जाहीर केले. शेवटी रामेन्द्रने भवाल हाऊस येथे जाऊन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांची दोन वकिलांसह भेट घेतली आणि आपणच राजा रामेन्द्र नारायण रॉय असून माझी वडवडिलार्जित संपत्ती आणि अधिकार मला परत मिळावे असा दावा केला. अर्थात ब्रिटिश अधिकारी हे संस्थानातील नागरिकांप्रमाणे श्रद्धाळू नसल्याने त्यांनी त्यांच्यातर्फे खऱ्याखोट्याचा  तपास सुरू केला. 

इकडे संस्थानातील नागरिकांचा राजाला पाठिंबा वाढतच होता. अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी तसेच मजूर व कष्टकरी वर्गाने संन्याशाला जाहीररीत्या आपला राजा घोषित करून त्याच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. कोर्टात बाजू मांडण्याची जबाबदारी काही वकीलांनी स्वतःहून आपल्या शिरावर घेतली. इतकंच नव्हे तर त्या काळी राजाला उत्पन्नाचा तिसरा हिस्सा देण्याची पद्धत होती म्हणून नागरिक स्वतःच आपला तिसरा हिस्सा संन्याशाला अर्पण करू लागले. समर्थक आणि विरोधक आपापली बाजू हिरीरीने मांडू लागले. पत्रके वाटू लागले. एकंदरीत संस्थानात दोन गट पडून प्रत्येकजण आपलीच बाजू बरोबर आहे असे वेगवेगळे दाखले देऊन सिद्ध करू लागला. शेवटी एकदाची ही केस कोर्टात दाखल झाली.

ही भवाल संन्यासी केस (विभावरी देवी Vs रामेन्द्र नारायण रॉय आणि इतर) आजही प्रसिद्ध आहे. आजही कोर्टात या केसचा संदर्भ दिला जातो.

(रामेंद्र नारायण यांचा बालपणातला फोटो)

हे सगळं प्रकरण दहा वर्षे असंच चाललं आणि दिनांक २४ एप्रिल १९३० रोजी रामेन्द्र, त्याची बहीण आणि इतरांनी विभावरी देवी विरोधात ढाका कोर्टात गेले आणि या सगळ्यांनी संपत्ती व अधिकारावर हक्क सांगितला. यात रामेन्द्रने आपली बाजू मांडली की, हा माझ्या पत्नीने आणि मेव्हण्याने माझ्या विरोधात कट रचला असून त्यात फॅमिली डॉक्टर आशुतोष दासगुप्ता हे सुद्धा सामील होते. माझी संपत्ती हडप करण्यासाठी हे कारस्थान रचले गेले, मला सिफिलीसच्या उपचारासाठी  दार्जिलिंगला नेले आणि माझ्या हत्येचा प्रयत्न केला गेला. 

बचाव पक्षाच्या म्हणण्यानुसार रामेन्द्रला चांगली बंगाली बोलता येत होती, पण या तोतयाला येत नाही. हा माणूस मातृभाषा बंगालीपेक्षा उर्दू अधिक चांगली बोलायचा. यावर रामेन्द्रने सांगितले की तब्बल दहा वर्षे मी नागा साधूंबरोबर भारत खंडात भ्रमण करत असल्याने बंगाली थोडी कमजोर झाली आहे.  दोन्ही पक्षांचे आरोप प्रत्यारोप बराच काळ चालले. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी शेकडो साक्षीदार कोर्टात हजर केले.  ही केस अनेक महिने चालली. यात हा भवाल संन्यासी तोतया आहे हे निष्पन्न झाले असते तर सारी इस्टेट ब्रिटिश सरकारच्या घशात गेली असती. त्यामुळे त्यांना या केसमध्ये भलताच इंटरेस्ट होता. 

(राज्याभिषेक वेळचा फोटो)

या दरम्यान संस्थानाच्या कास्तकारांनी त्याच्याकडे कर जमा करायला सुरुवात केली. ब्रिटीश सरकार विरुध्द कोर्टात लढायचे आहे या विचाराने अनेक देशभक्त वकील रामेंद्रला मदत करण्यासाठी उभे राहीले. त्याची उठबस कलकत्त्यातल्या उच्चभ्रू वर्तूळात व्हायला लागली. आधी जिल्हा न्यायालयात , नंतर कलकत्याच्या हायकोर्टात आणि सतरेतेशेवटी प्रिव्ही काउन्सीलमध्ये म्हणजे थेट लंडनपर्यंत ही केस गेली.

न्यायाधीशांनी या केसचा निकाल देण्यासाठी शारीरिक खुणांचा आधार पुरावा म्हणून घेतला आणि निकाल रामेंद्र नारायण रॉय उर्फ ‘भवाल संन्यासी’ च्या बाजूने दिला. यासाठी पुढील गोष्टी मुख्य पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आल्या - 

१. डोळ्यांचा रंग ++
२. केसांची ठेवण. ++
३ त्वचेचा रंग ++
४ सिफीलीसच्या खुणा ++
५. शरीराच्या अवयवांची ठेवण ++
६. पापण्यांच्या बाजूची एक खूण ++
७. वाघाची शिकार करताना हाताच्या पंज्यावर झालेली जखम ++
८. गुप्तांगावर असलेला तीळ.++

या प्रकरणात सगळ्यात महत्वाचा पुरावा एका इन्शुरन्स कंपनीने दिला. रामेंद्र रॉयच्या वडलांनी तो लहान असताना काही विम्याच्या पॉलीसी ब्रिटीश कंपनीकडून घेतल्या होत्या. त्यावेळी केलेल्या मेडीकल रिपोर्टमध्ये जे "आयडेंटीफीकेशन मार्क '" नोंद करण्यात आले होते ते तंतोतंत जुळले. कायद्याच्या भाषेत या खूणा डॉक्युमेंटेड होत्या आणि त्या ब्रिटीश डॉक्टरने नोंदवल्या होत्या या मुद्द्यावर कोर्ट राजी झाले आणि  अंगावरच्या खुणांच्या आधारे रामेंद्र रॉय केस जिंकला! 

 पण.. ही चित्तरकथा इथे संपली नाही , अजून क्लायमॅक्स बा़की आहे .

ज्या दिवशी भवाल संन्यासी हाच रामेंद्र रॉय असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला त्याच दिवशी संध्याकाळी त्याला पक्षाघाताताचा झटका आला आणि दोन दिवसांनी त्याचा मृत्यु झाला. 

 

तर मंडळी, कशी वाटली ही आगळी वेगळी केस? आपल्या शरीरावरच्या खुणांना किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. तेव्हा आपल्या शरीरावर असलेल्या खुणा लक्षात ठेवा आणि त्याची नोंद करत चला. 

इतिहासात अशा अनेक कथा आहेत, त्यापैकी भाऊसाहेब पेशव्याच्या तोतयाची कथा पण  अशीच मनोरंजक आहे . ती येत्या आठवड्यात आपण वाचू या..  तूर्तास लेख आवडला असेल तर जरूर शेअर करायला विसरू नका

 

लेखक : अनुप कुलकर्णी

सबस्क्राईब करा

* indicates required