आज विकास आमटेंचा वाढदिवस. खरंतर त्यांच्या कामाचा आवाका अफाट आहे. विकास आमटेंसारख्या जेष्ठ समाजसेवक, विचारवंत, लेखकाचा चेहरा मनामनात पोहचायला हवा. म्हणून हा त्यांचे समाजिक क्षेत्रातील शिष्य किशोर मानव यांनी लिहिलेला छोटासा लेख आम्ही सादर करत आहोत. किशोर म्हणतात,"मी फक्त थोडक्यात त्यांना शब्दांत कैद करण्याचा प्रयत्न केला आहे."
२७ ऑक्टोबर १९४७ रोजी आदरणीय बाबा आमटे आणि माऊली साधना आमटे यांना पुत्रप्राप्ती झाली. एक अवलिया जन्माला आला. जहागीरदार आमटेंच्या नातवाचा जन्म वरोरामधे झाला. तेव्हा बाबा आणि साधनाताई खूपच हालाखीच्या परिस्थितीत होते. बाबांनी वकिली सोडली होती आणि वडिलांच्या संपत्तीवर पाणी सोडले होते. तेव्हा काम करत असलेल्या कोरगावकर यांच्या ट्रस्टकडून मिळनारे मानधन हेच त्यांचे कमाईचे साधन होते. अशा परिस्थितीत विकासकाकांना कधी साधं बिस्कीट मिळालं नाही, की थंडीमध्ये स्वेटर पाहायला मिळालं नाही. थंडीत आईचं ब्लाऊज घालून ते झोपायचे. रोज जेवणात फक्त मुगाचे वरण त्यांना खावे लागत असे. बाबा आमटेंच्या पहिल्या कुष्ठरोग्याच्या पत्नीने तुरीच्या डाळीचा एक पदार्थ केला होता. तो विकास आणि प्रकाश यांनी चोरून खाल्ला होता हे पाह्यलं तर त्याकाळी विकासकाकांनी कशा परिस्थितीत दिवस काढले हे समजू शकते. दीड वर्षांच्या विकासला गोपाळ भटनागर नावाचे गृहस्थ स्मशानभूमीत घेऊन जात आणि ते लहान विकाससाठी कबरीवर बसून मस्त मस्त गाणी गात असत असं साधनाताई 'समिधा'मधे लिहतात. ही स्मशानभूमी त्यांच्या घरापासून इतकी जवळ होती की बरेचदा त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरातून मृतदेह पुरला जाताना दिसत असे. तेव्हातर विंचूही आजूबाजूस सतत वावरत. विकासकाका अडीच वर्षांचे होते तेव्हा त्यांना विंचवाने दंश केला. त्यामुळे शरीर पूर्ण सुजले होते. त्यांनाच काय, बाबांना-ताईंना सर्वांनाच ते दिवस तसे काढावे लागले.










