बोट्स्वानामध्ये सापडलाय जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा...या हिऱ्याला नाव काय द्याल?
आफ्रिकेच्या जमिनीच्या पोटात अनेक मौल्यवान गोष्टी लपलेल्या आहेत. सोन्यापासून ते युरेनियम पर्यंत अनेक मौल्यवान गोष्टी आफ्रिकेत आढळतात. आता असाच एक नवा खजिना आफ्रिकन देश बोट्स्वाना येथे आढळला आहे. बोट्स्वाना येथे जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडला आहे.
हा हिरा शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने सांगितले की, हा अप्रतिम हिरा १०९८ कॅरेटचा आहे. नुकताच हा हिरा बोट्स्वानाचे राष्ट्रपती मोकगवत्सी यांना दाखवण्यात आला. या हिऱ्याची माहिती जगासमोर आल्यानंतर सगळीकडे त्याची चर्चा रंगत आहे. जगात तिसऱ्या क्रमांकाचा मौल्यवान आणि मोठा हिरा असल्याने या हिऱ्याला वेगळं महत्त्व आहे. त्याचा एक परिणाम असा की हिरा उद्योगाला यामुळे मोठा फायदा होऊ शकतो. या हिऱ्याचे तूर्तास तरी नामकरण झालेले नाही.
डी बियर्स ही जगातली मोठ्या हिरा संशोधक कंपन्यांपैकी एक आहे. डी बियर्स आणि बोट्स्वाना सरकार यांनी मिळून हिरा उद्योगासाठी देबस्वाना कंपनी तयार केली आहे. याआधी जो सर्वात मोठा हिरा सापडला होता, त्याला तब्बल सव्वाशे वर्षे उलटून गेली आहेत. १९०५ साली ३१०६ कॅरेटचा हिरा सापडला होता. या हिऱ्याला कल्लीन नाव देण्यात आले होते. हा हिरा जगातला सर्वात मोठा हिरा ठरला होता, तर २०१५ साली टेनिस बॉलच्या आकाराचा दुसऱ्या क्रमांकाचा हिरा बोट्स्वाना येथेच सापडला होता. हा हिरा ११०९ कॅरेटचा होता. त्याला 'लेसेडी ला रोना' हे नाव देण्यात आले होते.
तर, बोट्स्वाना हा आफ्रिकेतील आघाडीचा हिरा उत्पादक देश आहे. हा हिरा अगदी मोक्याच्या क्षणी सापडला आहे. कोरोना संकटाच्या काळात अर्थव्यवस्थेची बिघडलेली घडी बसवण्यासाठी या हिऱ्याची मोठी मदत देशाला होऊ शकते.