चोरांची तेजस भरारी...प्रवाश्यांनी डझनभर हेडफोन्स वर मारला डल्ला !!!
‘जमिनीवरील विमान’ म्हणून ऐटीत मिरवणाऱ्या तेजस एक्सप्रेसवर प्रवाशांनीच डल्ला मारलाय राव. काही लोकांनी प्रवासादरम्यान दिले जाणारे हेडफोन्स थेट उचलून नेलेत त्याचबरोबर दोन एलईडी स्क्रीन्सचं नुकसान केलं ते वेगळंच.
एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितल्या प्रमाणे रेल्वे प्रशासनाला असं वाटलं की रेल्वे मधल्या उशा, चादरी कोणी घरी नेत नाही तसेच हेडफोन देखील माणसं प्रवासानंतर इथेच सोडून जातील पण मंडळी झालं उलट. डझनभर हेडफोन लंपास करण्यात आले आहेत. मी तर म्हणतो आम्हा भारतीयांवर एवढा विश्वास कसा ठेवला आपल्या रेल्वे प्रशासनानं हेच मुळी समजत नाय.
२२ मे रोजी पहिल्या फेरीत प्रवाशांनी केलेल्या करामती समोर आल्या नंतर रेल्वे प्रशासन अक्षरशः चक्रावून गेलंय. मुंबई ते गोवा ५५२ किलोमीटरचं अंतर अवघ्या ८ ते ९ तासात पार करणारी तेजस एक्प्रेस खरं तर रुळावर आल्या पासून तिच्यावर हल्ले होत आहेत. सर्वात आधी तर अज्ञातांनी तिच्या काचा फोडल्या आणि आता तर तिच्या प्रवाश्यांनीच तिच्यावर हात साफ केलाय. चौर्यकर्म तर सोडा राव, थाटात प्रवासाला निघालेली तेजस एक्प्रेस येताना कचऱ्याचा डब्बा बनून आलीये. आता बोला !!!
एवढं सगळं होऊन आता रेल्वे प्रशासन तेजस एक्सप्रेसची कशी काळजी घेणार ते बघावं लागेल नाही तर लोक अख्खी बोगी सुद्धा साफ करतील.
आता एक महत्वाचा प्रश्न :
काय आपण तेजस एक्सप्रेस सारख्या बड्या गड्याने प्रवास करण्याच्या मानसिकतेचे आहोत का ? नवीन लक्झरी एक्सप्रेसच्या काचा तोडणे, हेडफोन्सची चोरी, कचरा पसरवणे यावरून आपली मानसिकता अजूनही मालगाडीचीच आहे असं नाही का वाटत ?