आमची टोमॅटो पार्टी !!!
काल मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवसाला केक तर नेहेमीच आणतो. या वेळी थोडे जास्त पैसे खर्च असं ठरवलं आणि केकऐवजी एक टोमॅटो आणण्याचा निश्चय केला. बायको थोड़ी कुरकुरली , "महागाई कित्ती झाल्येय ! हे नस्ते चोचले हवेत कशाला" ? वगैरे वगैरे! आपल्या एकुलता एक मुलग्याचा वाढदिवस आहे तर थोडी मौज करूया असं म्हटलं तर राजी झाली.
आजकाल टोमॅटो नगावर मिळतात. येत्या महिन्यात टोमॅटो लक्झुरी आयटममध्ये जाऊन त्यावर 29 टक्के GST लागणार आहे. म्हणून फार विचार न करता घेऊ या एक टोमॅटो असा विचार केला आणि खरेदीला बाहेर पडलो.
कालच कोणीतरी चायनाच्या प्लास्टीक टोमॅटोबद्दल लेख लिहीला होता. तो आठवून महागडा टोमॅटो घ्यायचा या विचाराने पाय थरथरत होते.
आमचे जुन्नरवाले अशोक हांडे बुवा कुठे दिसेनात. थोड़ी चौकशी केली तर कळलं की त्यांची "ब्लड रेड टोमॅटो" ची शोरुम आता पाचव्या मजल्यावर आहे. शो रूमच्या दारात पेठे सोनाराच्या दुकानात असते तशी एक मुलगी स्वागताला उभी होती. पाच मिनिटं बसल्यावर मला आत प्रवेश मिळाला !
हांड्यांनी मला ओळखलं. "या! या!! मुलाची एडमिशन झाली का शेठ ?? हे बघा वाटण्याचे टोमॅटो ख़ास पुण्याचे आहेत."
एका बॉक्स मधून त्यांनी बोराच्या आकाराचे टोमॅटो काढून दाखवले.मी नकारार्थी मान डोलावली तर त्यांनी एक मोठ्ठा जुळा टोमेटो काढून दाखवला. "बघा खास ऍनीव्हर्सरी पेश्शल टोमॅटो बघा". मी म्हटलं, "नाय हो! मुलाच्या वाढदिवसाठी हवा आहे!" हांडे बुवा खूष झाले आणि त्यांनी एका मुलीला सांगीतलं, "ए पोरी जा , आतून आंबेगाव स्पेशल आण." आतून पोरगी चार टोमॅटो घेऊन आली."घ्या , खास तुमच्यासाठी फक्त बाराशे रुपये नगाला." मी म्हटलं एक द्या, जरा गिफ्ट पॅकींग करून. एका सुंदर बॉक्समध्ये बुवांनी टोमॅटो पॅक करून दिला. मी पेटीएमने पैसे भरले आणि घरी आलो.
बायको म्हणाली, "काय करू हो? मस्तपैकी टोमॅटोचं सार बनवू की कोशिंबीरीत घालू?". मी म्हटलं, "अगं मुलगा आता मोठा झालाय, त्याला कळू देत अस्सल नैसर्गिक टोमॅटो कसा दिसतो ते!".
मग, आम्ही ठरवलं की टोमॅटो केक सारखाच कापू या !!
मग मुलगा म्हणाला, "माझा वाढदिवस आहे. मीच खाणार एकटा हा टोमॅटो". मग त्याच्या आईनेच समजूत घातली की केकसारखे तुकडे करू या. मग तो राजी झाला. जेवणापूर्वी त्यानी टोमॅटोचा एक सुंदर फोटो काढून इंस्टाग्रामवर टाकला " सेलेब्रीटींग बर्थडे ऍट होम". पंधरा मिनीटात सत्तर लाईक आल्या तेव्हा आम्ही धन्य होऊन बसलो जेवायला! आमचा कुत्रा टूकत बसला होता. तो म्हणाला," मी पण फॅमीलीत आहे ना? द्या मलाही एक पीस!" आता कुत्र्याला टोमॅटो खायला घालण्याची आमची ऐपत नाही, पण भूतदयेपोटी त्याला पण एक तुकडा दिला !
आमच्या बायकोनी लगेच फोटो काढून फेसबुक स्टेटस अपडेट केलं. नंतर इतक्या लाइक्स आणि कमेंट आल्या की ती त्यांना उत्तरं देत बसली आणि मी भांडी वगैरे आवरून सिंक मध्ये टाकली.
पण एक मोठ्ठं आत्मिक का काय म्हणतात, ते समाधान एका टोमॅटोने दिलं.
रात्री झोपण्यापूर्वी बायको मला विचारती झाली, " अहो, टोमॅटो स्वस्त कधी होतील हो?"
मी म्हटलं,"अगं सरकारनी सगळं काही स्वस्त केलं आहे. उदाहरणार्थ इंटरनेट-फोन बॅकींग- आधार कार्ड वगैरे वगैरे. तू मात्र उगाचच भाज्या कधी स्वस्त होतील असे अगदीच सरकार विरोधी विधान करते आहेस." असं म्हटल्यावर ती बिथरलीच!! म्हणाली सगळॅ पुरुष खोटारडेच!! लग्न झालं तर बरे दिवस येतील म्हणून मी लग्नासाठी तयार झाले.
कळतच नाही कधी येणार अच्छे दिन...... वगैरे वगैरे.
मला मात्र एकच कळलं आता अच्छे दिन सोडा, अच्छी रात्र पण आता नशिबात नाही.