काय आहे हा ब्लू व्हेल गेम? आणि मुलं हा गेम खेळून आत्महत्या का करत आहेत?

मित्रांनो, आजकाल मोबाईलवर गेम खेळण्याची  सगळ्यांनाच सवय लागली आहे. कँडी क्रश, लुडो असे गेम तर आपण खेळतच आहोत,  पण एखाद्या गेमच्या शेवटच्या टप्प्यात जर तुम्हाला तुमचा जीव द्यावा लागला तर? इंटरनेटवर असाही एक गेम आहे त्याचं नाव आहे ब्लू व्हेल!!

तुम्हाला हा खेळ प्ले स्टोअरवर सापडणार नाही आणि शोधायला पण जाऊ नका, उगाचच जीवावर बेतेल. तर हा खेळ म्हणे सगळ्यात आधी रशियात सुरू झाला. नेटवर  बरेचसे फोरम्स असतात. तिथं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालतात. म्हणजेच आत्महत्या या विषयाचे फोरम्सपण आहेच. तर अशा फोरमवर या गेमचे अडमीन तुम्हाला संपर्क साधतात आणि या खेळात तुम्हाला सामील करून घेण्यासाठी तुमच्यासमोर पर्याय ठेवतात.  या खेळात तुम्हाला पन्नास वेगवेगळे टास्क दिले जातात. रात्री 4 वाजता उठणे, एकट्याने हॉरर सिनेमा पाहणे अशा लहानसहान कामगिऱ्या पार पाडण्यापासून या गेमची सुरवात होते.  पुढे जाऊन हातावर सुईने नाव किंवा व्हेलचे चित्र कोरणे अशी त्याची हिंसकता वाढत जाते. शेवटचे टास्क अर्थातच स्वतःचा जीव घेण्याचे असते. तुम्हाला या सगळ्या टास्कचे फोटो  आणि व्हिडीओ पुरावा म्हणून् अडमीनला पाठवायचे असतात. आणि जर असं केलं नाही तर? तर त्या लोकांकडे आपली सगळी माहिती असते आणि जर तुम्ही आत्महत्या केली नाही, तर या गेमचे ॲडमीन तुमची हत्या करतील अशा धमक्या दिल्या जातात. आजकाल आपण सोशल मिडियावर सहजपणे आपली इतकी माहिती शेअर करतो, की आपण कोण, कुठले, आपले मित्र आणि कुटुंबीय कोण, घरचे कार्यक्रम.. इतकंच काय, काय आणि कुठं खाल्लं हे ही लोकांना माहित असतं. 

आता या खेळाची सुरवात रशियात झाली असली तरी जगातल्या अनेक देशात याचं लोण पसरलं आहे. इंगलंड आणि दुबईमधल्या शाळांनी काही दिवसांपूर्वी पालकांना या खेळापासून आपल्या पाल्यांना वाचविण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता हा असा धोकादायक प्रकार आपल्या अगदी दारातच येऊन उभा आहे का हा प्रश्न  अंधेरीमधल्या मुलाच्या आत्महत्येनंतर उभा राहिला आहे.

खरंतर कुठल्याही खेळातच काय किंवा कोणत्याही मनस्थितीमध्ये आत्महत्येचा विचार करणे चुकीचेच आहे. या खेळाकडे सहसा 14-15 वर्ष वयोगटातली मुलं जास्त आकर्षित होताना दिसतात. या वयोगटातल्या पालकांनी आपल्या मुलांशी वेळोवेळी संवाद ठेवणे आणि इंटरनेटसारख्या माध्यमातून ब्लु व्हेलसारख्या खेळापासून दूर कसे राहावे याचे मार्गदर्शन करणेच योग्य. 

सबस्क्राईब करा

* indicates required