सणांसाठी प्रत्येकीकडे असायलाच हवेत हे मराठी दागिने..

'बाजीराव मस्तानी’ आणि ’जय मल्हार’ सारख्या सिनेमा-मालिकांनी मराठी दागिन्यांना पुन्हा एकदा वलय प्राप्त करून दिलंय. जुनं ते सोनं या न्यायाने आता पुन्हा बोरमाळ, साज, नथ या सगळ्या गोष्टींची क्रेझ वाढतेय. हौसेला मोल नसेल पण सोन्याला भलतंच मोल आहे, त्यामुळे इमिटेशन ज्वेलरीमधल्या बर्याच प्रकारांना स्त्रीवर्गाची पसंती आहे.
हे सगळं खरं, पण खरेदीला जायचंच तर तुम्हाला या दागिन्यांची कितपत माहिती आहे?
चिंचपेटी
चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते. क्वचित सोन्याच्या पातळ उभ्या पेट्या जोडलेल्या स्वरूपातही असू शकते. हा दागिना गळ्यासोबत उंच बसणारा असतो. मोत्यांच्या दोन-तीन माळांमध्ये गुंफलेल्या उभ्या पेट्या हे याचे वैशिष्ट्य. कधी त्या पेट्यांना सरळ फाटा देऊन मध्येच एखादं माणकाचं पदक बसवलं जातं. कधी पेटीला खाली एकच मोती तर कधी त्या पेट्यांना मध्यभागी जाता-जाता लांबी वाढवत गेलेल्या मोत्यांच्या लहान माळांच्या छोट्या तोरणाने गळा भरून जाईल असा दागिनाही मिळतो.
वज्रटीक
वज्रटीक हादेखील गळ्यासोबत बसणारा दागिना. फक्त हा उंच नाही तर गळ्याच्या मुळाशी येऊन विसावतो. अभिनेत्री मृणाल कुलकर्णींना जिजाऊंच्या वेशात पाहिलं असेल तर ही वज्रटीक लगेच ओळखू येईल.
बिल्वदल-बेलपान टीक
हा टीकेचा दुसरा प्रकार. प्रत्यक्ष जीवनातली टीका कितीही नापसंत असली तरी स्त्रीवर्गाला या टीका मात्र भलत्याच आवडतात. बेलपानाप्रमाणे हिच्या प्र्त्येक जडवलेल्या सोन्याच्या पेटीला तीन पानं असतात. त्यावरून कदाचित हिला बेलपान टीक म्हणतात.
वज्रटीक आणि बेल्वदल टीक या दोन्हींनाही खालून रेशमी धाग्यांची गादी केलेली असते की जेणॆकरून खाली गुंफलेल्या तारा गळ्यास टोचणार नाहीत.
ठुशी

छोट्या मण्यांचा गळ्याबरोबर असलेला हा दागिना म्हणजे ठुशी. मण्यांच्या आकारामुळे हा नाजूक तर दिसतोच, आणि समारंभात लहान मुलींनाही शोभून दिसतो. यात कधी मध्यभागी गडद गुलाबी माणिक तर कधी सोन्याचं पानही असतं.
सरी
'एकीने सरी घातली म्हणून दुसरीने लगेच दोरी लावून घेऊ नये' या म्हणीत असते तीच ही सरी. सर आणि सरी यात फरक आहे हं मात्र. आदिवासी दागिन्यांचा लुक असलेली ही सरी आजकाल मालिकांमुळे पुन्हा लोकप्रियता मिळवताना दिसतेय.
सर
सरी आली म्हणजे सर लागोपाठ यायला हवाच. 'एकसर' आणि 'एकावळी' म्हणजे एकच. पारंपारिक सर म्हणजे छोट्या मण्यांची लांब माळ.
बोरमाळ
लहान बोराच्या आकाराच्या मण्यांची माळ म्हणजे बोरमाळ. बोरमाळ बनवायला खूप जास्त सोनं लागत नाही. पातळ पत्र्याचे मणी बनवून आत लाख भरली जाते. त्यामुळे कमी सोन्यात मजबूत दागिना तयार होतो.
गोल मण्यांसोबतच लांबट चौकोनी मण्यांचीहि बोरमाळ बनवली जाते. पूर्वी आज्या-पणज्या एकसर घालायच्या. पण आता दोनपदरी आणि तीनपदरी बोरमाळांचीही खास चलती आहे.
तन्मणी
हा खास मोत्यांचा पेशवाई दागिना. मधे जे पदक असतं त्याला म्हणजे तन्मणीचं खोड म्हणतात. या खोडाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात.
नथ
जय मल्हार आणि बाजीराव मस्तानी मुळे नथ पुन्हा एकदा चर्चेत आहे. आताशा क्लिप असलेली नथही बाजारात मिळते त्यामुळे नाक टोचलेलं असलंच पाहिजे असं बंधन नाही. नव्या नथी आकाराने आणि वजनाने लहान असतात. एखादी जुनीपुराणी आजीची नथ घालायला गेलात तर मात्र नाक दुखून येईल.
बुगडी
बुगडी म्हणजे महाराष्ट्राची खासियत. कानाच्या पाळीच्या वरच्या भागाचं लेणं असलेली ही बुगडी अजूनही स्त्रीवर्गात खूपच प्रिय आहे. पण जरा जपूनच हं, या बुगड्यांना इथं तिथं सांडायची भलतीच खोड आहे.
साज
मराठी दागिन्यांची यादी ’साजाच्या डोरल्या’शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कोल्हापूरच्या सराफ्यात आजकाल चांदीवर सोन्याचं पॉलिश दिलेला साजही विकत मिळतो.
मग काय, हौस पुरवायची ना?