अय्या...चीनमध्ये लहान मुलं घालतात भोक असलेली चड्डी !!
देश कोणताही असो, तिथल्या मातीत पूर्वापार चालत आलेली परंपरा ही असतेच. मग तो देश कितीही प्रगत का असेना. आपल्याच देशाचं बघा ना. आपल्याकडे प्रथा-परंपरांचा नुसता भडीमार आहे. आता परंपरा प्रथा यांच्याबद्दल बोलतच आहोत, तर चला जाणून घेऊया चायनीज लोक आपल्या मुलांना छिद्र असलेेली चड्डी का घालतात ?
चायनामध्ये एक अजब परंपरा आहे. इथे लहान मुलांना ‘होल वाली चड्डी’ घातली जाते. म्हणजे मागून पूर्णपणे ओपन असलेली चड्डी!! या परंपरेला ‘कई डांग कू’ म्हटलं जातं. चायनीज लोक या परंपरेला आजही एवढे चिकटून आहेत की चीनमध्ये लहानमुलांसाठी होल नसलेली चड्डी मिळणं कठीण आहे. बाहेरून येणाऱ्यांना हा काय प्रकार आहे याचा सहसा पत्ता लागत नाही. आजच्या काळात याचं प्रमाण कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालेलं नाही.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की हे असं का? तर याचं असं आहे की, मुलांना सुसू आणि शी आली की ती लगेच करता यावी म्हणून अशा चड्डीचा वापर सुरु करण्यात आला. लहान मुलांना शी-शू आली की त्यांचे कपडे काढेपर्यंत त्यांचं काम चड्डीतच झालेलं असतं. (तोंड वाकडं करू नका, तुम्ही पण लहानपणी हेच केलं आहे राव.) त्यामुळे पालक मुलांना होलवाली चड्डी घालून निश्चिंत होतात. पण याचे तोटे देखील आहेत बरं का.
अशाचड्डीमुळे लहान मुलांना मदत होत असली तरी त्यांना कुठेही बसून आपली क्रिया पार पाडण्याची सवय लागते. म्हणजे घाण पसरण्यास एकप्रकारे मदतच होते. संपूर्ण जगात याच गोष्टीवरून चर्चा होत आहे. पण चायनीज लोक याला फारसा विरोध करत नाहीत.
परंपरेला चिकटून राहण्याचं हे आणखी एक उदाहरण.