शिवरायांवर आधारित ५ पुस्तके जी प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत !!
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
- श्री समर्थ रामदास
श्री समर्थ रामदासांनी संभाजी महाराजांना पाठवलेल्या एका पत्रात शिवरायांच्या आठवणी दाखल वरील ओळी लिहिल्या होत्या. शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांचा प्रताप, त्यांचा न्याय, त्याचं बोलणं कसं असेल हे फक्त आपण विचारच करू शकतो. चारी बाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या बलाढ्य शक्तींशी लढून त्यांनी सह्याद्रीच्या कुशीत हिंदवी स्वराज्य उभं केलं. या सर्व मातब्बर शत्रूंशी त्यांनी कशी लढत दिली असेल, आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर चारी शाह्यांवर कशी मत केली असेल आणि आपल्या अवघ्या ५०-५२ वयात त्यांनी स्वराज्य कसं उभं केलं असेल ? याचा नीट विचार करताना अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
शिवाजी महाराजांचं महान कार्य आपल्या लेखणीतून मराठी साहित्यात आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण हा राजा लेखणीत मावणारा नाही हे त्रिवार सत्य आहे. तरीही अनेकांनी हे शिवधनुष्य पेलण्याचं साहस केलं आणि एक अद्भुत कलाकृती तयार केली. शिवाजी महाराज सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य काही पुस्तकाच्या आधारे यशस्वी झालेलं आहे.
आज १९ फेब्रुवारी, शिवजयंतीच्या निमित्ताने बघुयात महाराजांच्या आयुष्यावर आधारित ५ पुस्तके जी प्रत्येक मराठी माणसाने वाचलीच पाहिजेत.