लग्न समारंभामुळे पंतप्रधानांवर आली ‘कोणी रूम देता का रूम ?’ म्हणण्याची वेळ !!

पंतप्रधानांना देशात कुठेही राहण्यासाठी अडचण येऊ शकते का ? देशाच्या एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीसाठी तर नाहीच नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाबतीत नुकतंच असं घडलं आहे. कर्नाटक निवडणुकांच्या निमित्ताने आपले पंतप्रधान म्हैसूर दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांना हॉटेलमध्ये राहण्यासाठी जागाच मिळाली नाही, मग त्यांच्यावर पण ‘कोणी रूम देता का रूम’ म्हणण्याची वेळ आली राव.

स्रोत

झालं असं की, रविवारी नरेंद्र मोदी मैसूरला एकदिवशीय दौऱ्यावर होते. मैसूरच्या ‘हॉटेल ललिता महल पॅलेस’ या आलिशान हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात येणार होती. पण हॉटेलच्या रूम्स बुक करण्यास उशीर झाल्याने या हॉटेलमध्ये पंतप्रधानांसाठी रूम मिळाली नाही. खरं तर सगळ्या खोल्या एका लग्नाच्या वऱ्हाडासाठी आधीच बुक करण्यात आल्या होत्या. शिल्लक होत्या फक्त ३ रूम्स. पण पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि त्यांच्याबरोबर असलेला लवाजमा बघता या ३ खोल्या पुरेश्या नसल्याने या हॉटेलचा विचार सोडून देण्यात आला.

हॉटेल ललिता महल पॅलेस (स्रोत)

यानंतर दुसरा पर्याय म्हणून ‘रेडिसन ब्लू हॉटेल’ ची निवड करण्यात आली, पण आश्चर्य म्हणजे या हॉटेलमध्ये सुद्धा लग्न होतं. या लग्नाची संध्याकाळची वेळ आणि पंतप्रधानांच्या हॉटेल प्रवेशाची वेळ एकच असल्याने शेवटी हे लग्न दुपारी १२.३० वाजता उरकण्यात आलं. अश्या प्रकारे शेवटी पंतप्रधानांना रूम मिळाली.

सरकारी अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या रूम्स बुक करताना थोडी चपळाई दाखवली असती तर ऐनवेळी ‘कोणी रूम देता का रूम’ म्हणण्याची वेळ आली नसती राव...

सबस्क्राईब करा

* indicates required