ब्ल्यू व्हेल नंतर आलाय जीवघेणा 'मोमो गेम'....जाणून घ्या काय आहे हा गेम ??

ब्ल्यू व्हेलपेक्षाही खतरनाक गेम आलाय भाऊ. त्याचं नाव आहे मोमो गेम. ब्ल्यू व्हेलप्रमाणे मोमो गेमसुद्धा तरुणांना आणि लहान मुलांना टार्गेट करत आहे. ब्ल्यू व्हेलसारखाच या गेमचा शेवटही आत्महत्येत होतोय म्हणे. सोशल मिडीयावर आणि इतरत्र या गेमचं जाळं पसरत आहे. तो तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये पण येऊ शकतो. म्हणूनच आज जाणून घेऊया हा गेम आहे तरी काय आणि त्याच्यापासून दूर कसं राहायचं ते.

काय आहे गेम ?

स्रोत

राव, गंमत म्हणजे मोमो गेमला आपण गेम म्हणत असलो तरी ते काही गेमिंग अॅप नव्हे. तर हा गेम एक कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा नंबर सोशल मिडीयावर व्हायरल झालेला आहे. सुरुवातीला एका विचित्र मुलीचा फोटो आपल्याला पाठवला जातो. यानंतर अशाच प्रकारचे किळसवाणी आणि हिंसक फोटो पाठवले जातात. 

या अज्ञात कॉन्टॅक्ट नंबरवरून आपल्याला वेगवेगळे टास्क दिले जातात. उदा. एखाद्या अज्ञात नंबरवर मेसेज करा असं म्हटलं जाऊ शकतं. पण हे तसं निरुपद्रवी टास्क आहे, पुढचे टास्क आणखी हिंसक होत जातात.  टास्क पूर्ण केले नाहीत तर जीव घेण्याची धमकी दिली जाते. खेळणाऱ्याला मानसिक दृष्ट्या इतकं कमकुवत केलं जातं, की तो शेवटी आत्महत्या करतो.

जगाच्या कोणत्या कोपऱ्यातून आलाय हा नंबर ??

स्रोत

या गेमबद्दल काही गूढ गोष्टी माहित समोर आली आहे. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे हा अज्ञात नंबर जपानचा आहे आणि तो ट्रॅक करता येत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गेममध्ये दिसणारा चेहरा जपानच्याच ‘मिदोरी हायाशी’ या चित्रकाराने काढला आहे. पण त्याचा आणि या गेमचा काहीही संबंध नाही. 

मोमो गेमचा पत्ता कसा लागला ?

आर्जेन्टिना मधल्या अवघ्या १२ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली होती. पोलिसांनी तपास घेतल्यावर तिच्या मोबाईल मध्ये आत्महत्या करण्यापूर्वीचा एक व्हिडीओ सापडला. पोलिसांना संशय आहे की तिला आत्महत्या करण्यासाठी आणि तत्पूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी कोणीतरी तिच्यावर दबाव टाकला होता.

सध्या मोमो गेम दक्षिण अमेरिकेतील लोकांची झोप उडवतोय. पण इंटरनेटच्या जाळ्यामुळे हा गेम जगभर पसरायला वेळ लागणार नाही.

काय काळजी घ्यावी ?

स्रोत

जर तुम्हाला अज्ञात नंबरवरून मेसेज आला किंवा असा नंबर फॉरवर्ड होऊन आला तर लगेच तो डिलीट करा. जर चुकून कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह झाला व तुम्हाला गेम खेळण्यास उकसवण्यात आलं तर त्याची तक्रार करा. तुमची मुलं जर मोबाईलच्या आहारी गेलेली असली तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला विसरू नका. लहान मुलांच्या मनावर या गेमचा लवकर परिणाम होतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यात बदल दिसला तर त्यांच्याशी संवाद साधा. 

कमकुवत मनाच्या व्यक्तींना जगायचा अधिकार नाही या विचारातून ब्ल्यू व्हेलची निर्मिती झाली आणि त्याचंच नवीन व्हर्जन म्हणजे मोमो गेम. पण अद्याप या गेमची निर्मिती कोणी केली आणि त्या मागचा नेमका हेतू काय आहे याचा शोध लागलेला नाही. पण आपली आणि आपल्या मुलांची काळजी घेणं एवढं नक्कीच सध्या आपल्या हातात आहे.

 

आणखी वाचा :

काय आहे हा ब्लू व्हेल गेम ? आणि मुलं हा गेम खेळून आत्महत्या का करत आहेत ?

गेम्सच्या व्यसनात बुडालेल्या लोकांनी काय काय केलंय ? वाचून वेड लागेल...

सबस्क्राईब करा

* indicates required