अटलजी : एका पत्रकाराच्या नजरेतून
अटलबिहारी वाजपेयी यांच्या अनेक मनोज्ञ आठवणी आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरला असल्यानं अटलजी अनेकदा नागपूरला येत; शिवाय नागपूरशी त्यांचं एक भावनिक नातं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी सुमतीताई सुकळीकर यांच्यासह त्यांच्या काही जुन्या नागपूरकर सहकाऱ्यांना पंतप्रधान कार्यालयाकडून आग्रहाचं निमंत्रण मिळालेलं होतं.
नागपुरात प्रदीर्घ काळ पत्रकारिता केल्यानं अटलजींना खूप वेळा बघता आलं , ऐकता आलं , एक पत्रकार म्हणून त्यांच्या असंख्य पत्रकार परिषदाचं वृत्तसंकलन करता आलं, त्यांना अनेकदा भेटताही आलं. नागपूरच्या अनेक पत्रकारांना ते नावानिशी ओळखत; आवर्जून ओळखीचं लाघवी स्मित देत आणि नावानं संबोधत. आपण कुणी प्रख्यात आहोत असा भाव त्यांच्यात नसे; अगदी पोरसवदा पत्रकाराचाही प्रश्न ते शांतपणे, नीट लक्ष देऊन पूर्ण ऐकून घेत.
पत्रकार परिषद जर भोजनोत्तर किंवा भोजनपूर्व असेल तर, सर्व पत्रकारांनी जेवणाची प्लेट घेतल्याची खात्री करूनच अटलजी त्यांची प्लेट घेत. पत्रकार परिषद सुरु होण्याआधी अनेकांना ते ‘कैसे हों’ अशी पृच्छा करत आणि मग सस्मित प्रतिपादनास सुरुवात करत ; पत्रकार परिषद असो की जाहीर सभा, कोणताही मुद्दा सांगताना त्यांनी कधी हातात कागदाचा चतकोर तुकडा घेतलाय असा अनुभव कधीच आला नाही .
पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतांना संसदेत सदस्य करत असलेल्या गोंधळाचं प्रमाण खूप म्हणजे खूपच वाढलेलं होतं आणि सांसदीय लोकशाहीची चाड असणाऱ्या कुणालाही त्याबद्दल चिंता वाटत होती. नागपूरला एका पत्रकार परिषदेत माझ्याच एका प्रश्नावर बोलतांना त्याबद्दल तेव्हा लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेल्या अटलजी यांनी खूपच चिंता व्यक्त करतांना ‘संसद अब मछली बाजार बन गई हैं’ अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली.
बातमीचं शीर्षक मी ‘संसदेचा मासळीबाजार झालाय’ असं केलं आणि बातमी मुंबईला पाठवली तर ‘वाजपेयी नक्की बोलले ना’ अशी पृच्छा ( वृत्त संपादक तेव्हा बहुदा अचूकतेसाठी आग्रही असणारे रमेश झंवर होते.) झाली कारण वृत्तसंस्थांच्या बातमीत हे विधान नव्हतं. पाला पडणार होता तो संसदेशी; खरी असली तरी ही टीका फारच परखड, खरं तर जहाल होती. अटलजींनी जर ‘मी असं बोललो नाही’ म्हटलं तर आमच्यावर हक्कभंगाचा बडगा उभारला जाण्याची भीती होती आणि माझ्या मनात चलबिचल झाली .
‘पुन्हा एकदा कन्फर्म करतो आणि सांगतो’, असं म्हणून मी फोन बंद केला. अटलजी तेव्हा रामदास पेठेत श्रीमती रजनी रॉय यांच्याकडे उतरलेले आहेत, हे ठाऊक होतं. रजनी रॉय यांच्याशी परिचय होताच ; त्यांना फोन करुन अटलजी यांच्याशी बोलता येईल का अशी विचारणा केली.
अर्ध्या-पाऊण मिनिटात अटलजी फोनवर आले आणि म्हणाले, ‘कहीये प्रवीणजी’. मी त्यांना काय घडलं ते आणि आपण जे म्हणालात ते कन्फर्म करण्यासाठी फोन केल्याचं सांगितलं.
‘हमने फिश मार्केट कहां हैं नं ?’ अटलजींनी विचारलं.
‘यस सर , यु सेड ईट’, मी ठामपणे सागितलं.
तिकडून अटलजी म्हणाले , ‘हमने कहां हैं, आपने सुना हैं, तो फिर समाचार छपवाने में दिक्कत क्या है ?’
त्यावर मी ‘थँक्स सर, व्हेरी काइंड ऑफ यू’, असं म्हणालो.
त्यांनी विचारलं, ‘और कुछ पुछ्ना है ?’
मी ‘नो , सर ‘, म्हटलं आणि त्यांनी फोन डिसकनेक्ट केला.
‘संसदेचा मासळीबाजार’ अशी हेडलाईन दुसऱ्या दिवशी ‘लोकसत्ता’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ला आली पण, बहुदा अटलजी यांची प्रतिमा आणि सांसदीय कारकीर्द लक्षात घेऊन कोणा संसद सदस्यांनं त्यावर आक्षेप घेण्याचं धाडस दाखवलं नसावं.
लोकसभा निवडणुकीत भाजपचं पानिपत झालं ; केवळ दोनच सदस्य विजयी झाले. अटलबिहारी वाजपेयी यांचाही माधवराव शिंदे यांच्याकडून पराभव झाला. पराभवानंतर काही दिवसांनी ते प्रथमच नागपूरला आले. साप्ताहिक सुटी असूनही पराभूत अटलजी कसे दिसतात , वागतात हे बघण्यासाठी मुद्दाम गेलो. पत्रकारांना परिचित लोभस स्मित देत त्यांनी पराभवचं विश्लेषण केलं आणि अजूनही पक्कं आठवतं मला , अटलजी ठाम विश्वासानं गरजले , ‘चुनाव हार गये हैं हम एक , जंग नही हार गये . हमारी जंग अभी जारी हैं !’ मग पत्रकारांच्या आग्रहाखातर त्यांनी ‘गीत नया गाता हूं...’ही कविता ऐकवली होती .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसरातला त्यांचा वावर अत्यंत नम्रतेचा असे. माझं एक निरीक्षण असं आहे की, संघाचे तत्कालिन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याशी त्यांचं नातं खास होतं; ते आदर आणि ममत्वाचंही होतं ; नंतरच्या सरसंघचालकांना अटलजी यांच्या लोकप्रियतेची असूया वाटत असे. सुदर्शन सरसंघचालक असतांना त्यांच्या वक्तव्यातून तर ती व्यक्तही होत असे ; सुदर्शन यांनी संघ कार्यालयात काही संपादकांशी केलेल्या एका अनौपचारिक वार्तालापाच्या निमित्तानं आलेल्या एका अनुभवानंतर त्याबद्दल ( चिडून ) मी ‘सुदर्शन यांची मळमळ’ असा अग्रलेखही लिहिला आणि संघवाल्यांचा कडवा रोष ओढावून घेतला होता.
अटलजी यांच्या अनेक सभांचं वृत्तसंकलन करायला मिळालं. ते सभेसाठी श्रोत्यांची उत्सुकता ताणणारा उशीर फारच क्वचित करत. गर्दीचा अंदाज घेऊन मग त्यांचं भाषण सुरु होत असे. शब्दांचा प्रपातच तो; कधी तीव्र कधी मध्यम , कधी वीज तळपावी तर कधी ऋजुता आणि पारिजातकाचा दरवळ त्यांच्या भाषणात असे. त्यांची भाषणातली तन्मय मुद्रा लोभस असायची .
मराठी पत्रकारितेत असूनही, दिल्ली-मुंबईत प्रदीर्घ काळ न राहूनही अटलबिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव हे दोन पंतप्रधान आपल्याला नावानं ओळखतात या जाणीवेनं मला नेहेमीच गौरव झाल्यासारखं , सुखावल्यासारखं वाटत आलेलं आहे ; का वाटू नये ? हे दोन्ही नेते फारच मोठे आणि माणुसकीचा दरवळ होते. पंतप्रधान आणि राजकीय नेते म्हणून हे दोघेही मला जाम आवडत. अफाट विद्वत्ता , देवळाच्या गाभाऱ्यात पसरलेल्या सोज्वळ प्रकाशासारखा सुसंस्कृतपणा आणि अजातशत्रुत्व ही त्या दोघांची कवचकुंडलं होती.
अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंहराव (स्रोत)
रावसाहेब आधी गेले, आता अटलजीही मृत्यू नावाच्या अज्ञात प्रदेशात निघून गेलेले आहेत. असे राजकीय नेते फारच दुर्मिळ असतात.
लेखक : प्रवीण बर्दापूरकर