चित्त्यापेक्षा जास्त वेगवान आहे ही मुंगी....वाचा 'ड्रॅकुला' मुंगीबद्दल !!
चित्ता आणि बहिरी ससाणा हे दोन प्राणी (तिसरा आपला धोनी) अत्यंत वेगवान हालचालींसाठी प्रसिद्ध आहेत. चित्त्याच्या करामती तर तुम्ही डिस्कव्हरीवर पाहिल्याच असतीलच. बहिरी ससाणा तर अत्यंत जलद हालचालींनी उडणाऱ्या पक्षांची शिकार करतो.
मंडळी, हे दोन्ही प्राणी जरी वेगवान असले, तरी दोघांमधला एकही पहिल्या क्रमांकावर नाही. या पूर्वी बहिरी ससाणा होता, पण त्याचं हे पद आता चक्क एका मुंगीने हिरावून घेतलं आहे. विश्वास बसत नाही ना ? चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
ऑस्ट्रेलियात आढळणारी ड्रॅकुला नावाची मुंगी ही प्राण्यात सर्वात वेगवान आहे हे आता सिद्ध झालं आहे. ही मुंगी आपल्या जबड्याच्या भागाची हालचाल ९० मीटर प्रती सेकंद या गतीने करू शकते. म्हणजे एका तासात तब्बल ३५० किलोमीटर भाऊ !!
ड्रॅकुला मुंगीचा जबडा (नांगी) इतर मुंग्यांपेक्षा वेगळा आहे. आपण बोटांनी चुटकी वाजवतो तसा त्यांचा वापर करता येतो. जबड्यांना नैसर्गिकरीत्या मिळालेल्या वेगवान हालचालीने त्या शत्रूला जबड्यानेच जोरदार तडाखा देऊन मारू शकतात. त्यांची ही हालचाल टिपण्यासाठी स्लो मोशन कॅमेऱ्यांची सुद्धा दमछाक उडाली आहे.
ड्रॅकुला मुंगीला तिचं ‘ड्रॅकुला’ हे नाव का पडलं असा प्रश्न पडला असेल ना ? ड्रॅकुला हे नाव तिच्यासाठी अगदी समर्पक आहे. प्रौढ ड्रॅकुला मुंगीला अन्न चावून खाता येत नाही. मग ती काय करते, शिकार करून आणलेलं अन्न मुंग्यांच्या किडीला (लार्वा) खायला घालते. एकदा का किडीने अन्न खाल्लं की ही मुंगी किडीच्या शरीराला भोक पडून त्यातून रक्त पिते. हे ‘ड्रॅकुला’लाच जमू शकतं !!
तर मंडळी, अशा प्रकारे एका लहानश्या मुंगीने मोठमोठ्या प्राण्यांना टफ दिली आहे.