computer

सियाचिनमधले भारतीय सैनिक रोज सामना करत आहेत या १४ भयानक गोष्टींचा...

काय मंडळी, थंडी खूप आहे ना ? सकाळी तर उठवत नाही इतकी थंडी पडलेली असते. थंडीने आजारी पण पडत असाल. सर्दी पडसं तर थंडीत राहायलाच येतात. आपण मुंबईचा विचार केला तर थंडीत १७ ते १८ डिग्री पर्यंत तापमान खाली पडतं. तापमान यापेक्षा खाली आलं तर लगेच वृत्तपत्र आणि बातम्यांमध्ये ‘थंडीची लाट आली’ अशा प्रकरच्या बातम्या येवू लागतात. प्रचंड गवगवा होतो.

आता फक्त विचार करा की तुमच्यावर -६० डिग्री कमी तापमानाच्या जागेत राहण्याची वेळ आली आहे. या तापमानात स्टीलला त्वचेचा नुसता स्पर्श जरी झाला तरी त्वचा चिकटते. हे तर काहीच नाही श्वास घेण्यासाठी पण कष्ट पडतात.

अशा तापमानात राहायचा आपण विचारही करू शकत नाही, पण सियाचीन मधलं आपलं भारतीय सैन्य रोज याच तापमानात भारतासाठी खडा पहारा देत आहे. त्यांच्या या अखंड पहाऱ्यानेच आपण वर्षाचे ३६५ दिवस सुखाची झोप घेऊ शकतो.

आज आपण सियाचीन आणि तिथल्या भारतीय सैन्याबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया सियाचीनला समजून घेण्यापासून.

सियाचीन आहे तरी कुठे ?

सियाचीन या शब्दाचा अर्थ होतो ‘’जंगली फुलांचा प्रदेश’. हे ठिकाण एक ग्लेशियर (हिमनदी) असून पूर्व हिमालयाच्या काराकोरम पर्वत रांगेत आहे. तब्बल ७६ किलोमीटरचा ग्लेशियरचा भाग आणि समुद्रसपाटीपासून ५४००० मीटर्स एवढ्या उंचीमुळे सियाचीनची जगातील सर्वात मोठ्या ग्लेशियर मध्ये गणना होते. भारताच्या सरहद्दीवरील हे सर्वात उत्तरेचे टोक आहे.

भारत आणि पाकिस्तान मध्ये या प्रदेशावरून अनेक वर्षापासून वाद सुरु आहे. या संपूर्ण भागावर पाकिस्तानने आपला हक्क सांगितल्यामुळे भारताला हद्दीवर कायमस्वरूपी चौकी-पहारे बसवावे लागले आहेत. या भागात नेहमी चकमकी घडत असतात. यामुळेच सियाचीनला जगातील सर्वात उंचीवरची युद्धभूमी म्हटलं जातं.

आता वळूया आपल्या विषयाकडे. आज आम्ही तुम्हाला सियाचीन मधल्या भारतीय जवानांबद्दल काही माहित नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत. ही माहिती वाचल्यानंतर भारतीय जवानांबद्दलचा तुमचा आदर अनेक पटीने वाढेल यात शंका नाही.

१. -६० डिग्री कमी तापमानात भारतीय सैन्याला केवळ १०% ऑक्सिजन पुरवठ्यावर राहावं लागतं.

२. -५० ते -६० डिग्री कमी तापमानात स्टील सारख्या धातूला स्पर्श केल्यास त्वचा धातूला चिकटून जाते. अशावेळी त्वचेला गंभीर इजा होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेतलं तरी सैन्याला धातूचा स्पर्श न होणे शक्यच नाही. त्यांच्या हातात असलेल्या बंदुकीची नळी हीच मुळात स्टीलने बनलेली असते. अशा या बिकट परिस्थतीत जवान किती सतर्क राहत असतील याचा फक्त आपण विचारच करू शकतो.

३. वजन कमी होणे, स्मृतिभ्रंश, निद्रानाश सारखे निद्रेचे विकार तर सियाचीन भागातील भारतीय जवानांमध्ये अगदी सामान्य मानले जातात. ज्या उंचीवर सियाचीन आहे त्या भागात या प्रकारच्या आजारांना सामोरं जाऊन जवान सीमेचं रक्षण करत असतात.  

४. इथला एकटेपणा हा आणखी एक शत्रू आहे. सियाचीन शारीरिक तकदी सोबत मानसिक ताकदीची परीक्षा घेत असतं. जवानांना वेड लागण्याची वेळ येते. हे होऊ नये म्हणून जवान स्वतःला वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवतात.   

५. ताजं अन्न हे सियाचीन मध्ये दुर्मिळ आहे. उपलब्ध अन्न सावधपणे खावं लागतं. एखादा पदार्थ चुकून उघड्यावर राहिला तर काही मिनिटातच तो गोठून दगडा सारखं टणक होतो.

६. टूथपेस्ट गोठून जात असल्याने सैनिकांना नीट बोलताही येत नाही. पण टूथपेस्ट शिवाय पर्यायही नसतो.

७. सियाचीन भागात १६० किलोमीटर प्रती तासाच्या गतीने वारा वाहत असतो. याचा परिणाम म्हणजे हिमवादळ तब्बल ३ आठवडे थैमान घालू शकतं. २०१६ साली आलेल्या अशाच एका हिमवादळात तब्बल १० सैनिक गाडले गेले होते.

८. रोजच्या गरजेच्या वस्तू पोहोचवण्यासाठी एक चॉपर फेऱ्या घालत असतं. या चॉपरला काही मिनिटांच्या वेळेतच आपलं काम उरकावं लागतं. कारण या भागात अवघ्या १०० मीटर्सवर पाकिस्तानी सैन्याची ठाणी आहेत. चॉपरने जर निघायला उशीर केला तर पाकिस्तानी सैन्याकडून हल्ला होऊ शकतो. याखेरीज हवामान सतत बदलत असतं. अशावेळी विमानाला उड्डाण घेता येत नाही. विमानाची पुढची फेरी कधी होईल याचा काहीच अंदाज नसतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन सैन्य काम करत असतं.

९. खराब हवामानात समोरचं शून्य दिसत असतं. हा जवळजवळ पांढरा अंधार असतो. आपल्या अगदी जवळ असलेली व्यक्तीही दिसत नाही. या परिस्थितीत सैनिक एकमेकांना दोरीने घट्ट बांधून घेतात जेणेकरून सगळे एकत्र राहावेत.

१०. झोपण्यासाठी बेड सारखी गोष्ट नसतेच. आलेल्या सामानाचा साठाच जवानांसाठी बेडचं काम करतो.

११. सियाचीन भागात शौचालय ही एक मोठी गंभीर समस्या आहे. सध्य परिस्थितीत चौक्यांवर बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत, पण काही चौकांमध्ये आजही जवानांना उघड्यावर शौच करावी लागते. गेलेला सैनिक परत येईल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही. बर्फात असलेल्या भेगेमुळे सैनिक बर्फात जिवंत गाडला जाऊ शकतो.

१२. सियाचिनमध्ये तब्बल ८०% वेळ हा सैनिकांच्या तैनातीत जातो.

१३. सियाचीनच्या गोठवणाऱ्या वातावरणात रोज अंघोळ करणं शक्यच नाही. जवान महिन्यातून फक्त एकदा अंघोळ करू शकतात. यासाठी “संरक्षण संशोधन आणि विकास संस्था” “डीआरडीओ”ने तयार केलेले खास कमोड वापरले जातात.

१४. सियाचीन भागात सीमेपलीकडे जेवढा मोठा शत्रू आहे तेवढाच मोठा शत्रू तिथला निसर्ग आहे. हाडं गोठवणाऱ्या थंडीमुळे गेल्या ३० वर्षात तब्बल ८४६ जवानांचा मृत्यू झाला आहे. जीव गमावणाऱ्या प्रत्येक सैनिकाला सैन्यातर्फे शहीदाचा मान दिला जातो.

 

मंडळी, हे वाचून आपण भारतीय जवानांना फक्त सलामच करू शकतो. कमेंट बॉक्स मध्ये तुमचे विचार नक्की सांगा !!!

सबस्क्राईब करा

* indicates required