'हा' भारतीय पदार्थ नसता तर पावच बनला नसता...पावाची ही जन्मकथा तुम्हांला नक्कीच माहित नसेल
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/field/image/Mumbai-Ladi-pav-Recipe.jpg?itok=0Mff86dk)
पावासोबत खाता येणारे पदार्थ सांगा, असं विचारलं तर प्रत्येकाला निदान ५ तरी नावं नक्कीच आठवतील. वडापाव, पावभाजी, मिसळ, भजी पाव, दाबेली याशिवाय रस्त्यावर मिळणारा अंडापाव, ऑमलेट पाव, भुर्जी पाव, सामोसा पाव, उसळ पाव, वगैरे अशी कित्तीतरी नावं सांगता येतील. पाव हा असा पदार्थ आहे जो आज मुंबई सहित भारतभर रस्त्यारस्त्यावर आढळतो. पण कधी विचार केला आहे का हा पदार्थ आला तरी कुठून ??
मंडळी, पावाबद्दल एक माहिती तर आपल्याला नक्कीच असते, ती म्हणजे पाव भारतीय नाही. पण खरी गोष्ट अशी आहे की पावाचं मूळ जरी बाहेरचं असलं तरी आजचा पाव जन्मला भारतातच. चला तर पावाच्या जन्माची गोष्ट वाचूया !!
१४९८ साली पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा भारतात आला. त्याने दाखवलेल्या मार्गावरून इतर पोर्तुगीज भारतात आले. गोव्यात पोर्तुगीजांनी वसाहत स्थापन केली. पोर्तुगीजांनी भारतात येताना बरेच नवीन अन्नपदार्थ सोबत आणले, जसे की टोमॅटो, बटाटे, काजू, पेरू आणि ब्रेड. पोर्तुगीजांनी आणलेल्या विशिष्ट खमीरयुक्त ब्रेडला पोर्तुगीज भाषेत pão म्हणतात. याच शब्दावरून आजचा पाव शब्द बनला आहे. पायाने पीठ मळतात म्हणून ‘पाव’ हे सगळं झूट आहे राव.
तर, गोव्यात आलेल्या पोर्तुगीजांनी स्थानिक गोवन शेफ मंडळींवर pão बनवण्याची जबरदस्ती केली. भारतात गहुच्या पिठाला कमी नव्हती, पण खमीरयुक्त ब्रेड बनवण्यासाठी भारतात खमीरच नव्हता. हा खमीर पोर्तुगाल वरून आणायचं म्हटलं तर दळणवळणाची समस्या होती. मग यावर भारतीय जुगाड शोधण्यात आला. हा जुगाड होता ताडीचा. पीठ आंबवण्यासाठी पिठात ताडी मिसळण्यात आली आणि अशा प्रकारे भारतीय “पाव” अस्तित्वात आला.
पोर्तुगीज सत्ता गोव्यात स्थिर झाल्यानंतर गोवन लोकांनी पावाला आपल्या रोजच्या जेवणात सामावून घेतलं. पारंपारिक पद्धतीच्या जेवणातही पावाचा समावेश होऊ लागला. सहज आणि सोप्पा पदार्थ असल्याने गोवन संस्कृतीत पाव मिसळून गेला.
विसाव्या शतकात भारतात आलेल्या इराण्यांनी आणि नंतर कामाच्या शोधात आलेल्या गोवेकारांनी मुंबईत पाव एकदम फेमस केला. आज पाव वेगेवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ला जातो. प्रत्येक पदार्थाचा आपला एक वेगळा इतिहास आहे.
तर मंडळी, कशी वाटली पावाची जन्मकथा ?? कमेंट आणि शेअर नक्की करा !!
आणखी वाचा :
या ११ ठिकाणी मिळतो मुंबईतील बेस्ट वडापाव !!
पुण्यात झणझणीत आणि चटकदार मिसळ मिळण्याची ही २० अफलातून ठिकाणं...बघताय काय, व्हा सामील !!