computer

पार्वतीबाईंच्या या प्रश्नाने तोतया भाऊसाहेब पेशव्याचा खोटेपणा झाला सिद्ध !!

मराठीच्या विस्मरणात गेलेले काही शब्द ऐकले की भारी गंमत वाटते. त्यातलाच एक शब्द आहे 'तोतया'. हल्लीच्या पिढीला तोतया हा शब्दच माहीत नसावा. आणि तो जुन्या पिढीच्या इतिहासातल्या पुस्तकात हरवून गेला असावा, पण तोतयांचे किस्से मात्र आजही आपली उत्सुकता वाढवल्याशिवाय राहात नाहीत.

तर मंडळी कोण असतो तोतया..? तर तोतया म्हणजे 'मॅन/ वूमन इन डिसगाईज'. नाही हो हॉलिवूड चित्रपटाचे नाव नाही. तोतया म्हणजे अगदी आपल्यासारखाच दिसणारा दुसरा माणूस. किंबहुना आपली कॉपी. आपल्यासारखे दिसणारे किमान ७ जण ह्या पृथ्वीतलावर असतात असं म्हणताना काही लोकांना तुम्ही ऐकलेच असेल. तर असाच आपल्या सारख्या दिसणारा माणूस म्हणजे तोतया माणूस.

भारतीय इतिहासात तोतयांना महत्व होतं. आता आपल्यासारखा दिसणारा, फसवा वाटणारा माणूस मग त्याला इतिहासात महत्व कसं...? ऐका...

कसं आहे ना, जो कोणी राजा संकटात असायचा त्याच्या बदल्यात तोतया कामी यायचा. म्हणजे राजाला भेटायला गनिमाने बोलावले असेल आणि काही दगाफटका करायचा गनिमाचा इरादा असेल तर राजाच्या ऐवजी तोतया पाठवला जायचा, जेणे करून राजाला हानी पोहोचणार नाही. किंवा राजाच्या मृत्यू नंतर पुढचा राजा तयार होई पर्यंत, राज्य वाचवायला, राजा जिवंत आहे असे भासवणे कधीही गरजेचे असायचे. अशा वेळी विश्वासातील तोतया उभा करून वेळ निभावली जायची.

इतिहासात अशा तोतयांचा सुळसुळाट आणि त्रास ही व्हायचा. कोणी तोतया स्वयंघोषित राजा ही बनू पहायचा. ज्याला ओळखणे आणि अडवणे कधी कधी खूपच अवघड होऊन बसायचे. आपल्या आजच्या लेखाकातील पात्र 'तोतया सदाशिवराव पेशवे' हा असाच एक उपद्रवी तोतया होऊन गेला. सदाशिवभाऊ पेशवे म्हणजेच बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा ह्यांचे चिरंजीव..!!

(सदाशिवराव भाऊ)

आता सदाशिवराव भाऊ पानिपतात धारातीर्थी पडले हे आपण जाणतोच. पण पूर्वी बातम्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचेपर्यंत बराच कालावधी जायचा आणि त्याचा फायदा मिळायचा तोतयांना. असे म्हणतात इतिहासात जनकोजी शिंदे, यशोदाबाई पेशवे, छत्रपति रामराजे ह्यांचेही तोतये निघाले होते. इतकेच काय तर इतर सैन्यातील मंडळी, सेनापती, सैनिक ह्यांचेही तोतया निघत असत.

असो तर, आपल्या विषयाकडे वळूया. जेव्हा सदाशिवराव पेशवे पानिपतात गेले तेव्हा काहींना असे वाटायचे की ते खरोखरच गेले नाहीत तर वाचले आणि कुठे तरी काही महिने लपून राहिले. अगदी गुप्तपणे..!! त्यांच्या पत्नी पार्वतीबाई पेशवे स्वतःदेखील ह्याच गोष्टीला खरे मानून सौभाग्य लक्षणे लेवून त्यांची आस लावून बसल्या होत्या. आता पेशवे पत्नीला झालेल्या भ्रमाचा फायदा कोणी उचलला नाही तरच नवल..!

दौलतीत, सत्तेत वाटे मिळवावे किंवा राजगादीच आपल्या नावे व्हावी म्हणून अनेक लफंगे टपून असायचेच. त्यामुळे पानिपतानंतर काही महिन्यातच सदाशिवराव पेशवे जिवंत असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या. पण ही अफवा फोल ठरली. पुन्हा एकदा अशीच टूम निघाली ज्यावर पुन्हा जाणकार सल्लामसलतीस बसले आणि तीही फोल निघाली. १७६३ साली तर कोणीतरी माणूस माळवा मध्ये स्वतःची फौज उभारत आहे हे ऐकल्यावर ते सदाशिवराव भाऊच असतील असे सगळ्यांना वाटले. आणि त्याचा फायदा घेऊन ह्या तोतयांने चांगलाच उच्छाद मांडला. पण मल्हारराव होळकरांनी त्याला वेळीच जेरबंद करून बंदिवासात टाकले.

(मल्हारराव होळकर)

अशात सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण कानोल ह्या गावी आपल्या आई वडिलांबरोबर राहायचा. त्याचं नाव सुखलाल होतं की सुखनिधान होतं यात मतमतांतरे आहेत. या लेखासाठी आपण त्याला सुखलाल म्हणूया.

तर, घरातल्या भाऊबंदकीच्या भांडणाला कंटाळून तो नरवर इथे उदरनिर्वाहाला येऊन राहिला.  एका वाण्याच्या दुकानाजवळ बसला असताना दक्षिणी माणसांनी त्याला पाहून तुम्ही सदाशिवराव भाऊंसारखेच दिसता असे म्हटले. त्यांनी सुखलालला पेशवाईचं आमिष दाखवलं. तसा सुखलाल काही साधा भोळा नव्हता. तोही मुळातला धूर्तच. त्याने स्वतःला सदाशिव भाऊ म्हणून घोषित केलं. त्याने स्वतःचं रूप बदललं. त्याचं बोलणं, चालणं, वागणं, त्याचा वेश हे सदाशिवभाऊ यांच्या सारखंच होतं. म्हणून तर जाणती मंडळी पण त्याला खरोखरच सदाशिवरावभाऊ समजून बसली.

त्याच्या मदतीला नरवर येथील शंभूपंथी गोसावी होते. त्याने काही फौज पण जमवली. बरीच मोठी मंडळी ह्या कटात सामील झाली. अर्थात हे लोक भोळसटपणामुळे सामील झाले की स्वतःच्या फायद्यासाठी हे सांगणे कठीणच आहे. आता राहता राहिली बाब ती सौभाग्यलेणे न उतरवता पतीची आस लावून, वाट पाहत असलेल्या पार्वतीबाईंची..!! आपला पती कोण हे एक पत्नी निश्चितच ओळखू शकते. सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडेच लागले होते. त्यांनाही काही काळासाठी भ्रम झालाच होता, पण शेवटी त्यांनीच तोतयाचं पितळ उघड पाडलं. त्याबद्दल आपण पुढे वाचणारच आहोत.

सुखलाल सदाशिवराव म्हणून वावरू लागला त्यानंतर अल्पावधीत स्वराज्यातले अनेक फितूर ज्यांना स्वराज्याशी काहीही घेणे नव्हते, ते त्याला सामील झाले. त्याच्या जीवाला स्वराज्याच्या गनिमाकडून धोका नको म्हणून त्याला ठिकठिकाणी फिरवत राहिले. आता हा फसवा पेशवा एकेक गड किल्ले, आरमार काबीज करत होता, वसुली गोळा करत होता आणि कित्येक लोक अजाणतेपणी त्याला सामीलही होत होते. सुरुवातीच्याच काळात करेरा येथील किल्ला आपल्याला द्यावा म्हणून त्याने झांशीच्या सुभेदाराला कळवले. झांशीच्या सुभेदाराने २ वेळा तो सदाशिवराव आहे की नाही याची खात्री करून, खात्री पटल्यावर किल्ला देऊन टाकला.

त्याच्या धुर्तपणाचे काही नमुने म्हणाल तर-

सुखलालने शिंद्यांच्या चिटणिसाकडून पैसा वसूल केला आणि फौज चाकरीस ठेवून घेतली. फौज, तोफा, गारदी, डेरे-राहुट्या, हत्ती, पालख्या वगैरे सारा सरंजाम घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. वाटेत खर्चासाठी त्यानें वाटेतील मराठ्यांचीच गावं लुटली. लवकरच तोतया खरा आहे याबद्दल पार्वतीबाईंपर्यंत खात्रीशीर माहिती येऊ लागली. दोन भिक्षुकांनीं पार्वतीबाईंना पत्रं लिहून तोतया हा खरोखर सदाशिवरावभाऊ आहे हे सांगितलं. याखेरीज उत्तरेकडून दक्षिणेतील सरदारांकडे भाऊ खरे असल्याबद्दल पत्रं आलीं. तोवर पुण्यातली मंडळी गप्पं बसून नव्हती. तोतयाने नर्मदा व तापी उतरुन खानदेशांत गोंधळ घातला तेव्हा माधवरावांनी त्याला जेरबंद केले. त्याला धनगड येथे कैदेत ठेवले.

मंडळी, पुढे त्याची पुण्यात जाहीर चौकशी करण्यात आली आणि तो खोटा आहे हे सिद्ध झालं. त्यानंतर त्याची रवानगी नगरच्या किल्यांत झाली. त्याला एकेजागी ठेवल्यास तो निसटेल या कारणाने त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले. दौलताबाद, मिरज, रत्‍नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याला ठेवण्यात आलं होतं.

(माधवराव पेशवे)

हा तोतया तयार झाला होता फितुरांमुळे आणि तो निसटला पण फितुरांमुळेच. रत्‍नागिरीचा सुभेदार रामचंद्र नाईक परांजपे याने त्याला सोडून दिलं. इलाज कमी पडला तर रोग जसा फोफावतो तसा या तोतयाने परत एकदा हातपाय पसरले. त्याने फौज जमवून कोंकणांत धुमाकूळ घातला. सर्व आरमारही त्याच्या ताब्यात आले.

तोतयाचा बंदोबस्त करण्यासाठी नाना फडणविसांनी शिंदे, होळकर व पानशे यांनां पाठवलं. महादजींनी लवकरच तोतयाने काबीज केलेला सिंहगड परत मिळवला. तिथून तोतयाने पळ काढून राजमाची आणि मग कोकण गाठला. त्याची योजना मुंबईच्या इंग्रजांना जाऊन मिळण्याची होती. पण तो गलबतातून पळून जात असताना त्याला राघोजी आंग्रे यांनी त्याच्या सर्व लोकांनिशीं पकडलं. त्याची रवानगी पुन्हा पुण्याला करण्यात आली.

(महादजी शिंदे)

मंडळी, दुसऱ्यांदा जेव्हा त्याला पुण्यात आणलं तेव्हा त्याचा खेळ संपण्याच्या मार्गावर होता. त्याची दुसऱ्यांदा चौकशी झाली. नानांनी त्याला अनेक प्रश्न विचारले आणि सगळ्या प्रश्नांची त्याने अचूक उत्तरं दिली. तो तोतया आहे हे सिद्ध होणे कठीण दिसत होते. यावेळी नानांनी एक वेगळी चाल खेळली

सुखलाल म्हणजे तोतायाची चौकशी चालली असताना पार्वतीबाई चिकाच्या पडद्याआडून सगळं ऐकत होत्या. तोतया खोटा आहे हे सिद्ध होत नाही हे बघून नानासाहेब पार्वतीबाईंकडे आले आणि त्यांनी पार्वतीबाईंना तोतयाला त्यांच्या खाजगीतला प्रश्न विचारण्याची विनंती केली. इथे तोतयाची खरी परीक्षा होती.

(नाना फडणवीस)

पार्वतीबाईनी प्रश्न विचारला की “तुम्हाला पानिपतावर जाणारपूर्वीची रात्र आठवते का”

ह्या प्रश्नावर तोतयाने म्हटले, “हो आठवते ना !”

पार्वतीबाईनी पुढे विचारलं, “ त्या रात्री आपण मध्यरात्रीपर्यंत बोलत बसलो होतो. अंत:पुरात अत्तराचे दिवे जळत होते, पण अत्तराचं तेल संपलं आणि काळोख झाला. त्यानंतर तुम्ही काय केलं ? सांगा.”

या प्रश्नावर सुखलाल म्हणाला “हा काय प्रश्न आहे. त्यांनतर आपण झोपी गेलो.”

हे उत्तर ऐकून पार्वतीबाई ओरडून म्हणाल्या, “हा तोतया आहे”. नाना फडणविसांनी खात्री करण्यासाठी पार्वतीबाईंना त्यावेळी काय घडलं होतं हे विचारलं. पार्वतीबाई म्हणाल्या की “त्यानंतर मी कपाटातल्या अत्तराच्या कुप्या काढल्या आणि दिवे पुन्हा प्रज्वलित केले आणि पहाटेपर्यंत बोलत बसलो.”

मंडळी, सुखलालचं पितळ उघड पडल्यावर त्याची पुण्यात धिंड काढण्यात आली. नंतर मेखसूनें त्याचं डोकं फोडून त्याला देहांतशासन देण्यात आलं. त्याला सामील होऊन स्वराज्याशी फितुरी केलेल्या सर्वांनाच दंड आणि कैद अशा शिक्षा झाल्या. या तोतया सोबत सदाशिवराव भाऊ यांच्या तोतायांची कहाणी पण संपली.

 

आणखी वाचा :

भवाल संन्यासी - DNA टेस्ट अस्तित्वात नसलेल्या काळात २६ वर्षे चाललेली तोतया की खरा राजा याच्या ओळखीची जगप्रसिद्ध केस!!

सबस्क्राईब करा

* indicates required