लहान मुलांच्या स्टिकर्स मधून विकली जात आहेत ड्रग्ज.....ठाणे मुंबईतील पालकांनी हे वाचायलाच हवं !!
स्टिकर कुणाला आवडत नाही? छान छान रंगीत स्टिकर्स ही तर लहान मुलांच्या अगदी जिव्हाळ्याची गोष्ट आहे. हातावर, वह्या-पुस्तकांवर किंवा कुठेही चटकन दिसतील अशा ठिकाणी लावलेली स्टिकर्स मन मोहून घेतात… खरंय ना मंडळी? आम्हालाही आतापर्यंत असेच वाटत होते पण… आज नाही!
आता जर तुमच्या घरातील लहान मुलांच्या दप्तरात स्टिकर्स सापडली तर सावधान! पुढे धोका असू शकतो!!
मंडळी, नुकताच मुंबई आणि ठाणे परिसरात स्टिकर्सचा साठा जप्त झाला आहे. आता तुम्ही म्हणाल की स्टिकर्स का जप्त केले? तर ते साधे सुधे स्टिकर नव्हते… ते होते ‘एल एस डी’ स्टिकर! म्हणजेच धोकादायक अंमली पदार्थ युक्त स्टिकर. मुंबईतल्या म्याँव म्याँवच्या साथीनंतर त्याहूनही घातक एल एस डी या अंमली पदार्थाचा वापर आता मुंबईत वाढला आहे. एल एस डी वर NDPS Act 1985 प्रमाणे बंदी असल्याने त्यांना स्टिकरच्या माध्यमातून बाजारात आणायची शक्कल लढवली गेली आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
काय आहे एल एस डी?
लायसर्जीक एसिड डायइथिलअमाईड या अंमली पदार्थाचे संक्षिप्त रूप म्हणजे एल एस डी. हे रंगहीन, गंधहीन आणि चवहीन असते. म्हणजेच तुम्हाला कुणी हा पदार्थ इतर खाद्यपदार्थात मिसळून दिला तर तुमच्या ते लक्षातही येणार नाही. या एल एस डी ची नशा येण्यासाठी वापर केला जातो. तुम्हाला माहीतच आहे की अंमली पदार्थाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होते. आणि आता हा धोका अगदी आपल्या दारात स्टिकरच्या माध्यमातून येऊन पोचलाय. आहे ना काळजीची बाब ?
1 cm × 1 cm आकाराच्या कागदाला एल एस डी मध्ये बुडवून नंतर वाळवले जाते. त्यावर सुगंधी चवीचे द्रव्य फवारले जाते आणि नंतर त्यावर चित्रे छापून स्टिकरच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध केले जात आहे. हे चौकोनी स्टिकर ‘एक युनिट’ म्हणून ओळखले जाते. या वर लहान मुलांना आकर्षून घेणारी चित्रे, उदाहरणार्थ: सुपर हिरोज, कार्टून्स, पशु-पक्षी इत्यादी छापली गेल्याने यावर चटकन कुणी संशय घेत नाही. मग लहान मुलांना या स्टिकरची चटक लावली जाते. हे स्टिकर जिभेखाली ठेवल्यास यातील रसायने लाळेमध्ये स्त्रवतात आणि रक्तात मिसळतात व नशा आणण्यास कारणीभूत ठरतात.
आता पाहूया हे एल एस डी शरीरात गेले तर नक्की काय होते…
नशेचे जे वेगवेगळे प्रकार असतात त्यामध्ये एल एस डी ची नशा ‘हॅल्युसिनेशन’ निर्माण करणारी असते. हॅल्युसिनेशन म्हणजे समोर समोर नसलेले दिसणे किंवा ऐकू येणे, डोळ्यांसमोर रंगांचे ढग उभे राहणे, आपण वेगळ्याच जगात वावरत आहोत असे भास होणे. एक चौरस सेंटीमीटर म्हणजेच एक युनिट असणाऱ्या एल एस डी मुळे व्यक्ती 8 ते 12 तास हॅल्युसिनेशन मध्ये जाऊ शकते. त्याला ‘ट्रिप वर जाणे’ असा कोडवर्ड आहे. एकदा व्यक्ती ट्रिपवर गेली की मग तिला वेगवेगळे भास होऊ लागतात. हे भास कधी चांगले असतात तर कधी वाईट. म्हणजे समजा दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी एकाचवेळी एकाच ठिकाणी एल एस डी घेतले तर एकाला वाटेल की तो हवेत उडतोय किंवा पाण्यावर चालतोय. तर त्याच वेळी दुसऱ्याला वाटेल की त्याला भुतांनी पकडलं आहे किंवा तो एखाद्या भीतीदायक ठिकाणी आहे. थोडक्यात गांजा किंवा भांग यांच्या नशेच्या अनेकपट एल एस डी ची नशा असते.
हॅल्युसिनेशन मध्ये गेलेल्या व्यक्तीचे मेंदूवर नियंत्रण नसल्याने ती आत्महत्या करण्यास किंवा एखाद्याचा खून करण्यासही मागे पुढे पाहणार नाही. आणि त्या टोकाला गेली नाही तरी एल एस डी मुळे कायमचे मानसिक संतुलन बिघडू शकते.
इतर नशेच्या व्यसनांचा प्रचार ज्यापद्धतीने केला जातो तीच पद्धत इथे वापरली जाते. आधी काही दिवस मोफत सँपल दिले जाते. त्यानंतर फ्री सँपल बंद करून खरेदी करण्यास भाग पाडले जाते. नशेची सवय अनावर झाली की अचानक भाववाढ करून कोंडमारा केला जातो. आता नशा करणाऱ्याला एकच उपाय शिल्लक असतो तो म्हणजे स्वतःच नशेची पुडी विकायला सुरु करणे. दिवसेंदिवस हे जाळे वाढतच जाते. आता तर स्टिकर्सच्या माध्यमातून ही विक्री होत असल्याने संशयाला देखील जागा नसते.
मंडळी, ही सर्व माहिती तुम्हाला काळजीत टाकण्यासाठी आम्ही सांगत नाही तर हा धोका आपल्यापर्यंत येऊन पोचल्याने त्यापासून स्वतःला आणि लहान मुलांना जपता यावे म्हणून सांगत आहोत. जर मुलांमध्ये पुढील लक्षणे आढळली तर ती एल एस डी ची असू शकतात…
१. अंग थरथर कापणे
२. डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणे
३. मळमळ वाटणे
४. सतत बदलणारी मनःस्थिती (मूड स्विंग)
५. सतत उगाच चिंताग्रस्त वाटणे.
६. सतत विनाकारण भीती वाटणे. (पॅरानॉइड)
तर मंडळी, आता यापुढे मुलांच्या वागण्याकडे लक्षपूर्वक पहा. त्यांच्या पॉकेट-मनीचे ऑडीट करा. त्यांच्या पैशांच्या मागणीची वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) अचानक वाढते आहे काय याकडे लक्ष द्या. त्यांच्या झोपेचे पॅटर्न बदलले आहेत का हे तपासा. एखादा साधा प्रश्न विचारल्यावरही मूल घाबरत आहे का हे पण बघा. काही शंका आल्यास योग्य वेळीच मुलांना विश्वासात घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. गरज पडल्यास व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या. सोबत जवळच्या आणि शाळा / कॉलेजजवळच्या पोलीस चौकीत माहिती द्या.
...आणि हा लेख जमेल तितका शेअर करा.
लेखक : अनुप कुलकर्णी