गेली ८ वर्षे धगधगणाऱ्या सीरियाच्या युद्धभूमीतल्या 'सिक्रेट लायब्ररी'ची गोष्ट!!
![](https://www.bobhata.com/sites/default/files/styles/cover_image/public/cover%20%2813%29.jpg?itok=VBWHYbra)
ज्या ठिकाणी सतत युद्ध सुरु आहे, माणसं मरतायत, अनेक वर्षांपासून अस्थिरता आहे अशा ठिकाणी पुस्तकं टिकतील का ? आम्ही सिरीयाबद्दल बोलतोय. सिरीयामध्ये माणसं टिकलेली नाहीत, मग पुस्तकांचं काय विचारताय असं तुम्ही म्हणाल. आम्हाला पण असंच वाटलं होतं, पण काही मोजकी माणसं आहेत जी या परिस्थितीतही पुस्तकांना माणसांइतकंच जपतायत.
२०१३ साली सिरियाची राजधानी दमास्कसच्या दक्षिणेला असलेल्या दराया येथील काही मुठभर वाचकांनी हजारो पुस्तकांना नष्ट होण्यापासून वाचवलं. पडक्या, मोडलेल्या घराच्या ढिगाऱ्यातून त्यांनी मिळतील तितकी पुस्तकं शोधून काढली. ती त्यांनी चादरीत लपवून सुरक्षित स्थळी नेली. युद्धभूमीवर जखमींना ज्या प्रकारे मदत केली जाते तशी मदत या पुस्तकांना या वाचकांनी दिली आहे.
पुस्तकं वाचवण्याच्या मोहिमेतूनच सीरियाच्या सिक्रेट लायब्ररीचा जन्म झाला. सिरीया सारख्या देशात वाचक असतील का असा प्रश्न आपल्याला पडेल, पण खरी गोष्ट तर अशी आहे, की तिथे वाचक पण आहेत आणि त्यांच्यासाठी लायब्ररी पण आहे.
ही सिक्रेट लायब्ररी बॉम्बस्फोटाने उध्वस्त केलेल्या इमारतीच्या तळघरात आहे. या लायब्ररीला मुख्य ग्रंथपाल देखील आहे. हा कोणी म्हातारा माणूस नसून अवघ्या १४ वर्षांचा मुलगा आहे. त्याचं नाव अमजद. लायब्ररीतून जाणाऱ्या पुस्तकांची तो अचूक नोंद करून ठेवतो. तो स्वतःही पट्टीचा वाचक आहे.
मंडळी, अमजद आपल्या मित्रांना नेहमी म्हणत असतो की “तुमच्याकडे टीव्ही नाही, मग तुम्ही पुस्तकं वाचून ज्ञान का मिळवत नाही?”
(अमजद)
या लायब्ररीत दर आठवड्याला बुक क्लब भरतो, तसेच इंग्रजी, गणित, जागतिक इतिहास यांच्यावर क्लासेस चालतात. एवढंच नाही तर साहित्य आणि धर्मावर वादविवादही होतात.
हे काम हिमतीचं असलं तरी तितकंच जीवावर बेतणारं आहे. सिरीयामध्ये चाललेल्या यादवी युद्धामुळे लायब्ररीबद्दल कोणाला सांगता येत नाही, पण वाचक वाढवण्याचं कामही करायचं असतं. अशा परिस्थितीत आणखी एक संकट ओढवलं होतं.
दराया येथे सरकार विरोधी कारवाया होतायत असा संशय आल्याने या भागाला सरकारच्या सैन्याने वेढा घातला होता. लोकांच्या विरोधाने आणि ४७ स्त्रियांनी सह्या केलेल्या पत्राने हा वेढा उठला. सरकार आणि सरकार विरोधी दोन्ही बाजूने हा भाग भरडला जातोय. युद्धापूर्वी या भागात ८०,००० नागरिक होते, ते आता केवळ ८००० उरलेत. सतत होणारा बॉम्बवर्षाव, पाणी, अन्नाची कमतरता, वीज नसणे अशा मुलभूत गरजा सुद्धा नागरिकांना मिळत नाहीत.
मंडळी, सिरीया आणि तिथली सिक्रेट लायब्ररीची ही गोष्ट “Syria’s Secret Library” नावाच्या पुस्तकात नोंदवण्यात आली आहे. या पुस्तकाचा लेखक माईक थॉमसन रेडिओ आणि टेलिव्हिजन रिपोर्टर आहे. त्याने ‘बीबीसी’साठी सिरीयाच्या युद्धावर काम केलं होतं. या दरम्यान त्याने स्काईप आणि सोशल मिडियाद्वारे लायब्ररीच्या सदस्यांशी आणि लायब्ररीयन अमजदशी संपर्क केला होता. यातून जी माहिती मिळाली ती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.
प्रत्येक वाईट परिस्थितीत कोणीतरी आशेचा किरण घेऊन येतं त्या प्रमाणे अमजद आणि त्याचे साथीदार सिरीयाच्या युद्धभूमीवर काम करत आहेत. माईक थॉमसनला एक सदस्य म्हणाला की पुस्तकं म्हणजे “आमच्या आत्म्याच इंधन” आहेत...या वाक्यातून आपल्याला अंदाज येईल की त्यांची ज्ञानाची भूक किती आहे.
सिक्रेट लायब्ररीप्रमाणे दरायाचा सिक्रेट कलाकार पण आहे. या कलाकाराने तिथल्या एका पडक्या भिंतीवर काढलेली ही ग्राफिटी पाहा. तो तिथला बँकसी म्हणून ओळखला जातो.