computer

आजच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोन मांडणारं त्रैमासिक - प्रलेख...पहिला अंक मोफत वाचा !!

संपूर्ण पारंपरिक होणं झेपणार नाही आणि संपूर्ण आधुनिक होणं परवडणार नाही, अशा वैचारिक डोंबाऱ्याच्या तारेवर आज आपण उभे आहोत. मग तारेवर तोल सांभाळण्यासाठीची काठी म्हणून जिचा आपल्याला आतोनात उपयोग होऊ शकतो अशी 'कला', तिचं आजच नेमकं स्थान कुठे आहे, तिचं प्रयोजन आपल्यालेखी काय उरलं आहे हे सारं समजून घेण्याच्या उर्मीतून आणि जाणिवेतून 'ब्रिज ऑफ टेल्स' घेऊन येत आहे एक नव्याकोऱ्या धाटणीचं त्रैमासिक - प्रलेख. 

प्रस्तुत अंक 'आजच्या काळातील कलाविषयक दृष्टिकोन' या विषयावर विषयावर असून उपरोक्त विषयांवर चर्चा घडवून आण्याच्या प्रयत्नांतून साकार होत आहे. ह्या अंकाचे वैशिष्ट्य असे की यातील लेख हे कुणा एका वयोगटातील अथवा कुणा एका विचारप्रणालीने प्रभावित झालेले नाहीत. विविध प्रकारे कलेशी संबंधित असणाऱ्यांनी वरील विषयावर लेखन केलेले आहे. काहींनी प्रश्न विचारले आहेत तर काहींनी पडलेल्या प्रश्नांना उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला असल्यामुळे एक समतोलपणा साधला गेलेला आहे.

सन्माननीय कथ्थकगुरु नृत्यांगना रुपाली देसाई आणि कलाशिक्षक श्री. नितीन गुरव यांनी वरील विषयावर विचारमंथन करीत तरुण पिढीला सकारात्मक आणि रचनात्मकरीतीने मार्गदर्शनपर लिहिले आहे. तर श्री. संदीप दहीसरकर यांनी आपल्या लेखातून चित्रकार श्रीपाद शामराव जयकरांच्या 'त्रिमूर्ती' या चित्राचे कलात्मक विश्लेषण करीत पार्ल्याच्या पहिल्या गणेशोत्सावाची ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी उलघडून सांगितलेली आहे. तसेच श्री. संदीप कदम ह्यांनी 'उषःकाल होता होता..." या कवी सुरेश भट यांच्या कवितेच्या पार्श्वभूमीवर "साहित्यनिर्मिती ही समाज परिवर्तनाची एक प्रक्रिया असते" असे म्हणत काल आणि आजचा लेखाजोखा मांडला आहे. हे दोन्ही लेख अभ्यासकांच्या चष्म्यातून निर्माण झाले असून आजच्या काळातील कालविषयक दृष्टिकोनावर परिणाम करणाऱ्या विविध मुद्यांवर प्रकाश टाकणारे आहेत.

वेळातवेळ काढून जाणते लेखक आणि अभिनेते श्री. अभिराम भडकमकर व वैज्ञनिक म्हणून काम करत असताना कलेच्या नव्या वाटेवर प्रवास सुरु केलेल्या श्री. सुखांत सरण ह्यांनी प्रस्तुत विषयावर आपले मत मांडत 'प्रलेख'साठी मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या मुलाखतींमुळे मासिकाला निश्चितच एक वेगळी पोत प्राप्त झालेली आहे.

साहित्य आणि कला या विषयांवर वेळोवेळी कान पिळणारा मित्र निरंजन याचा 'प्रलेख'च्या वैचारिक जडणघडणीत मोठी मदत झाली. सोबतच 'ब्रिज ऑफ टेल्स'चे संस्थापक मित्र अभिषेक मराठे आणि जय व्यास यांनी प्रलेखसाठी 'वेब मॅगझीन'चे स्वरूप सुचवून मराठी मासिकांना नवा चेहरा देता येण्याचा आशावाद दाखवत कामकाजात मोलाचा वाटा उचलला, यांचे विशेष आभार.

अखेर ज्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे म्हणजे जे प्रलेखसाठी लिहिते झाले अशा आमच्या लेखकांचे, सहकाऱ्यांचे देखील मनापासून आभार.

 

हा अंक खालील लिंकवर मोफत वाचा :
https://bridgeoftales.com/pralekh/

सबस्क्राईब करा

* indicates required