अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी आहे तरी कोण? त्याची आफ्रिकेत झालेली अटक इतकी महत्त्वाची का आहे?
नुकतंच आफ्रिकेच्या सेनेगल देशातून रवी पुजारी या डॉनला भारतात आणण्यात आलं आहे. रवी पुजारी हे नाव तसं फारसं प्रसिद्ध नाही, तो डॉन आहे हेही फारसं कोणाला माहित नसेल, पण भारताच्या दृष्टीने त्याचं हाती लागणं फार महात्त्वाचं आहे. आजच्या लेखातून आपण रवी पुजारी कोण आहे आणि त्याला कसं पकडण्यात आलं याबद्दल सविस्तर वाचणार आहोत.
?
कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारी हा कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील मालपे येथे जन्मला. त्याचं बालपण मुंबईत गेलं. त्याने शाळा सोडून अंधेरी भागात चहाची टपरी टाकली होती. पुढे त्याच्या आयुष्याने गुन्हेगारी विश्वाची वाट धरली. रवी पुजारीने बाला झालटे नावाच्या माणसाचा खून केल्यानंतर तो छोटा राजनच्या नजरेत आला. अशाप्रकारे तो अंडरवर्ल्डच्या मुख्य वर्तुळात दाखल झाला. आपणही छोटा राजन सारखंच डॉन बनायचं हे रवी पुजारीचं स्वप्न होतं.
यावेळपर्यंतचा अंडरवर्ल्डचा इतिहास वेगळा होता. छोटा राजन आणि दाऊद एकत्र काम करत होते. १९९३ च्या बॉम्बस्फोटांनंतर धार्मिक कारणांवरून दाऊदच्या गँगमध्ये फुट पडली. यावेळी रवी पुजारीने छोटा राजनला साथ दिली. २००० सालापर्यंत छोटा राजनची गँग टिकून होती. २००० साली बँकॉक येथे असताना छोटा राजनवर दाऊदच्या गँगने हल्ला केला आणि छोटा राजनच्या गँगमध्ये फूट पडली. यावेळी रवी पुजारीने छोटा राजनच्या गँगला रामराम ठोकला आणि स्वतःची गँग तयार केली.
रवी पुजारी सेनेगल मध्ये लपून कसा राहिला?
रवी पुजारीचं सेनेगलमधलं रूप अगदी वेगळं आहे. तो तिथे अँथनी फर्नांडीस नावाने ओळखला जातो. त्याने आफ्रिकेत ‘नमस्ते इंडिया’ नावाची हॉटेल्सची चेन सुरु केली आहे. पश्चिम आफ्रिकेत या हॉटेल्सच्या ९ शाखा आहेत. हा अँथनी फर्नांडीस तिथला समाजसेवकपण आहे. गावागावांमध्ये पाणीपुरवठा करणे, नवरात्रीच्यावेळी गरिबांना कपडे वाटणे, अशी कामे त्याने केली आहेत. त्याच्या समाजसेवेसाठी स्थानिक वृत्तपत्रात त्याची बातमीही झळकली होती.
रवी पुजारी कसा पकडला गेला?
आफ्रिकेच्या बुर्कीना फॅसो देशात रवी पुजारी सर्वात आधी दिसला होता. त्यानंतर तो सेनेगल येथे आला. जानेवारी २०१९ मध्ये सेनेगलची राजधानी डकारमधल्या एका सलूनमध्ये असताना त्याला स्थानिक पोलिसांनी ओळखलं आणि ताब्यात घेतलं. २१ जानेवारी २०१९ रोजी रवी पुजारीची माहिती भारताला देण्यात आली.
खरंतर रवी पुजारीला १९९४ साली मुंबईतल्या एका हत्येच्या गुन्ह्याखाली अटक झाली होती. त्यावेळी पोलिसांनी त्याचे फोटो आणि हातांचे, बोटांचे ठसे घेतले होते. याच माहितीच्या आधारे त्याची सेनेगलमध्ये ओळख पटली. तो जेलमधून लवकरच बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याने आपलं खुनाचं सत्र पूर्वीपेक्षा जास्त गतीने सुरु केलं. पोलिसांचा पाठलाग सुरु झाल्यानंतर तो नेपाळला पळाला. नेपाळवरून बँगकॉक आणि तिथून तो युगांडा देशात आला. युगांडा येथून तो बुर्कीना फॅसो देशात आला. तिथे १२ वर्ष राहिल्यानंतर त्याने सेनेगल गाठलं.
असं म्हणतात की भारताबाहेर असूनही त्याचे हात भारतातच गुंतलेले होते. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गुजरात आणि भारतातील इतर राज्यांमधल्या गुन्हेगारी विश्वात तो सक्रिय होता. २०१७ आणि २०१८ सालांमध्ये भारतातल्या काही प्रमुख राजकारणी आणि व्यावसायिकांना रवी पुजारीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याखेरीज त्याच्यावर खंडणीचे अनेक गुन्हे आहेत. एकट्या कर्नाटकात त्याच्यावर ९७ गुन्हे दाखल आहेत. मंगलोर भागातल्या खटल्यांमध्ये तर त्याला आतापर्यंत जन्मठेप आणि ७ वर्षांची शिक्षा झाली आहे. काही वर्षांपासून त्याच्या टार्गेटवर बॉलीवूडचे कलाकार होते. यात सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांची नावे सुद्धा आहेत.
तर, आता या पुढे तुम्हाला रवी पुजारी कोण हे नक्कीच लक्षात येईल.