टोळधाडीच्या भयंकर संकटात सापडलाय भारत! वाचा या टोळधाडीबद्दल संपूर्ण माहिती सविस्तर...
साऱ्या जगासोबत देशातही कोरोना महामारीनं थैमान घातलेलं असतानाच आता देशातल्या जवळपास ५ राज्यांना विळखा घातलाय तो टोळधाडीच्या अस्मानी संकटानं! एप्रिलच्या ११ला या थव्यानं राजस्थानात प्रवेश केला आणि आतापर्यंत राजस्थान आणि महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश अशा ५ राज्यात तो पोहचलाय. पूर्व महाराष्ट्रातल्या काही गावांना या टोळधाडीचा फटका बसला आहे. अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात टोळांचा उपद्रव दिसून येतोय.
टोळ आणि टोळधाड म्हणजे काय?
'टोळ' हा एक नाकतोडा प्रजातीचा उपद्रवी किटक आहे. तो हिरवी पाने खातो. याचं तोंड घोड्यासारखं असल्यानं त्याला विदर्भात 'घोड्या' असंही म्हटलं जातं. सगळ्याच प्रकारच्या वनस्पतींना धोकादायक ठरणारे हे टोळ किटक करोडोंच्या संख्येने एखाद्या प्रदेशावर हल्ला करून बघता बघता शेतातली उभी पिकं खाऊन टाकतात. आणि या यामुळं शेतीचं होणारं नुकसानाचं प्रमाण हे अतिशय मोठं असतं.
इंग्रजीत या किटकाला Locust म्हटलं जातं. या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे 'जळालेली जमिन'. म्हणजेच जिथं ही टोळधाड पडते, त्या भूप्रदेशातली पिकं पूर्णपणे उध्वस्त होतात. विशेष म्हणजे जगातला कुठलाच देश या टोळधाडीपासून सुरक्षित नाही. अगदी प्राचिन साहित्य आणि बायबलमध्येही या टोळधाडीच्या उपद्रवाचा उल्लेख आहे. या टोळाच्या अनेक प्रजाती आहेत. यापैकी वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ, मुंबई टोळ या जाती; विशेषतः यातली वाळवंटी टोळ भारतात सर्वाधिक नुकसान घडवते. यांचं आयुष्य फक्त ९० दिवसांचं असतं.
कशी असते ही टोळधाड?
एक टोळ किटक एका दिवसात स्वतःच्या वजनाएवढं अन्न फस्त करतो आणि सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यन्त तो सतत खात राहतो. एक टोळधाड एका दिवसात २५०० लोकांचं अन्न संपवून टाकू शकते. त्यांची प्रजोत्पदन क्षमताही तितकीच मोठी असते. एका वर्षात टोळांच्या २ ते ४ पिढ्या तयार होतात. वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची आणि मोठं स्थलांतर करण्याची क्षमता यांच्यात असते. वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेने हा थवा प्रवास करतो.
टोळ्यांच्या एक थव्यात जवळपास ८० लाखांहून जास्त किटक असतात आणि हा थवा ८०० चौ.कि.मी पर्यंतचा विस्तिर्ण भूप्रदेश व्यापू शकतो! इ.स १८८९ मधली एक टोळधाड तर सुमारे ५००० चौ.कि.मी विस्तारलेली होती असा उल्लेख आहे!
एका चौ.कि.मी मध्ये पसरलेल्या टोळांचे वजनच तब्बल ११६ टन असते! यावरून एका लहान टोळधाडीतही कीती मोठं नुकसान होतं यांचा अंदाज लावा!
Global Swarming आणि भारतावरचं भयानक संकट
यापूर्वी भारतात अनेकवेळा लहान मोठ्या टोळधाडी होऊन गेल्या आहेत. वाळवंटी टोळांचं मूळ स्थान हे सौदी अरेबिया किंवा अरेबियन द्विपकल्प आहे. मान्सुनच्या वाऱ्यांमागोमाग ते पाकिस्तानमार्गे राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रवेश करतात. पण वातावरणातील बदलामुळे जिथे पाच वर्षातून एकदा चक्रीवादळ यायचं, त्या अरबी समुद्रात मागच्या दोन वर्षापासून एकाच वर्षात २ ते ३ चक्रीवादळं निर्माण होताहेत.
चक्रीवादळामुळं सौदी अरेबियात विलक्षण पाऊस पडलाय, त्यामुळे त्याच प्रदेशात टोळांना खाद्य आणि प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण मिळालं. त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. त्याचबरोबर चक्रीवादळांमुळं वाऱ्यांच्या दिशाही बदलल्यामुळं वाळवंटात राहू न शकणारे हे टोळांचे थवे दक्षिणेकडे येमेनमार्गे संपूर्ण आफ्रिकेत आणि उत्तरेकडे इराण आणि पाकिस्तानात पोहोचले, लाल समुद्राकाठांवर होणार्या मुसळधार पावसामुळे त्यांना हवी असणारी हिरवाई आणि ओलावा मिळून त्यांची संख्या बेसुमार वाढली. शास्त्रज्ञांनी याला Global Swarming म्हटलं आहे.
(सौदी अरेबिया)
एप्रिल २०१९ पर्यंत या टोळधाडीनं पाकिस्तानातील ४०% पिकं संपवत भीषण धोका निर्माण केला होता. गेल्यावर्षी राजस्थानमध्ये वेळेआधीच दाखल झालेला मान्सून आणि त्यानंतर नोव्हेंबरपर्यंत पडणारा पाऊस, यामुळं दिर्घकाळ भारतात खाद्य आणि ओलावा मिळाल्याने टोळांची या काळात इथेही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. हे टोळ हिवाळ्यात इराणी प्रदेशात विश्रांती घेऊन दुसरा प्रदेश शोधतात.
यावर्षीही इराण आणि पाकिस्तानच्या मध्य भागात जानेवारीमध्ये मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे परत एकदा वाळवंटी टोळ या प्रदेशात पोहचले. त्यानंतर भारतातही यावर्षी मार्च १ ते मे ११ दरम्यान नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडलाय. त्यामुळे परत एकदा टोळांचा थवा भारतात पावसाळ्याआधीच दाखल झाला.
टोळधाडीचं नियंत्रण
टोळधाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना संकटाची पूर्वकल्पना देऊन उपाययोजना राबवण्यासाठी सरकारनं टोळसूचक केंद्रे निर्माण केली आहेत. हि समस्या समूळ नष्ट करणं शक्य नसलं तरी विविध किटकनाशकांच्या मदतीनं नुकसान कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाते. शेतकरी टोळांपासून पिकांचं रक्षण करण्यासाठी भांडी वाजवून मोठे आवाज करणे, धूर करणे, हवेत कापड हलवणे अशा उपायही करतात पण त्याचा म्हणावा तसा परिणाम दिसत नाही. मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी करून अंडी नष्ट करणे आणि त्यांची संख्या कमी करणे इथं फायदेशीर ठरते.
हे काही असलं तरी गेल्या काही दिवसांपासून या टोळांनी शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहेत हे मात्र नक्की!!