computer

संकटात धावून‌ येणारं NDRF : या दलाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच हव्यात...

महापूर, चक्रीवादळ, त्सुनामी, भूकंप... देशावर आलेलं कोणतंही संकट असो, मग ते नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित असो, नागरिकांच्या रक्षणासाठी धावून येतं ते आपल्या देशाचं 'राष्ट्रीय आपत्ती निवारण दल' म्हणजेच NDRF. आज देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर घोंगावणाऱ्या 'निसर्ग' चक्रीवादळासाठीही किनारपट्टीवरील राज्यात आता NDRF तैनात करण्यात आलंय.

नेपाळमध्ये झालेला भूकंप, चेन्नई, आसाम, मेघालय, जम्मू-काश्मिरमध्ये आलेला महापूर, अनेक रेल्वे दुर्घटना... प्रत्येकवेळी या साहसी दलानं देश आणि परदेशातही बचावकार्याची जबरदस्त कामगिरी पार पाडत आतापर्यंत ४,७०,००० पेक्षा अधिक लोकांचे प्राण वाचवले आहेत. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स किंवा राष्ट्रीय आपत्ती निवारण दल हे देशात उद्भवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटाच्यावेळी किंवा त्यानंतरही त्यात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी बनवलेलं एक विशेष प्रशिक्षित दल आहे. २००५ मध्ये मंजूर झालेल्या झालेल्या 'आपत्ती निवारण कायदा', सेक्शन ४४-४५ मधल्या तरतुदीनुसार हे दल बनवलं गेलंय.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन ही राज्य सरकारची जबाबदारी असते. आपत्तीच्या वेळेस गृह मंत्रालय हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये समन्वय साधण्याचं काम करतं. संबंधित राज्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचं, तसंच सशस्त्र दल, NDRF, पॅरामिलीटरी दल, आणि अन्य आवश्यक सामुग्री पुरवण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची असते. आपत्ती व्यवस्थापनासाठी तज्ञ व्यक्तींचं 'राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण' (NDMA) बनवलं जातं. देशाचे पंतप्रधान या समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष असतात.

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल हे‌ NDMA कडून नियंत्रित होतं. NDRF च्या प्रमुखांना डायरेक्टर जनरल म्हटलं जातं. हे डायरेक्टर जनरल पोलिस दलातून निवडलेले IPS दर्जाचे अधिकारी असतात. या डायरेक्टर जनरलची वेशभूषा भारतीय सेनेतल्या ३ स्टार असणाऱ्या जनरलप्रमाणे असते. त्याचबरोबर NDRF मध्ये अनेक इन्स्पेक्टर जनरल आणि डेप्युटी इन्स्पेक्टर जनरलही कार्यरत असतात. त्यांचे गणवेश आणि हुद्दा हे सैन्यातील अधिकाऱ्यांप्रमाणेच असते.

(एनडीआरएफचे डायरेक्टर जनरल एस एन प्रधान)

NDRF च्या वेगवेगळ्या १२ बटालियन आहेत. या बटालियन देशातल्या विविध भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत. जिथं आपत्ती येण्याची जास्त शक्यता आहे अशा ठिकाणांच्या जवळपास हे दल ठेवलं जातं. जेणेकरून आपत्तीवेळी सूचना मिळताच शक्य तितक्या लवकर संकटाच्या ठिकाणी हे पथक पोहोचू शकेल. NDRFच्या एका बटालियनमध्ये एकूण ११४९ जवान असतात. मग या जवानांमध्ये वेगवेगळे अभियंते, तंत्रज्ञ, वैद्यकीय तज्ञ आणि श्वान पथकांचा समावेश असतो.

फक्त नैसर्गिक आपत्तीच नव्हे, तर NDRF हे आण्विक, रासायनिक, जैविक आणि किरणोत्सारी आपत्तीत काम करण्यासाठीही सक्षम आहे.

आज आपण आपल्या घरी निश्चिंत राहू शकतो ते फक्त आपल्यासाठी संकटे झेलणाऱ्या या जवांनामुळेच. त्यांच्या या कार्याला बोभाटाचा‌ सलाम!

सबस्क्राईब करा

* indicates required