काय म्हणता, आशियातील सर्वात मोठी लायब्ररी भारतात आहे? हा घ्या पत्ता !!
(प्रातिनिधिक फोटो)
राजस्थान तसं बऱ्याच बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. राजस्थानचा इतिहास, तिथले मोठमोठाले महाल, राजे-रजवाडे आणि त्यांच्या कहाण्या, राजस्थानी संस्कृती हे सगळ्या देशभरात प्रसिद्ध आहे, पण तुम्हाला आज आम्ही राजस्थानबद्दल एक वेगळीच माहिती सांगणार आहोत जी तुम्ही कधी ऐकली नसेल. राजस्थानमध्ये चक्क थारच्या वाळवंटात एक भूमिगत लायब्ररी आहे आणि तिथे थोडीथोडकी नाही, तर ९ लाख पुस्तकं आहेत. आपल्या भूगोलाच्या पुस्तकात थरचं वाळवंट म्हटलं असलं तरी राजस्थानात त्याला 'थार'चं वाळवंटच म्हटलं जातं. असो, आपण लायब्ररीकडे वळूयात.
तर, राजस्थानच्या जैसलमेर जिल्हातल्या भदारिया या गावात ही लायब्ररी आहे. जिथे आपली अणूचाचणी झाली त्या पोखरणजवळच ही लायब्ररी आहे. एका अर्थाने म्हटले तर ही रेतीची भूमी ज्ञानभूमी देखील आहे. पाकिस्तानच्या सीमेजवळच असलेली ही लायब्ररी पूर्णपणे वाळवंटात समाविष्ट आहे. जैसलमेरची इतर गोष्टींसाठी मोठी ओळख आहे, पण या लायब्ररीच्या निमित्ताने अजून एक मानाचा तुरा जैसलमेरच्या डोक्यावर रोवला गेला आहे. या लायब्ररीत एकाच वेळी तब्बल ४,००० लोक बसू शकतील इतकी ती मोठी आहे. या लायब्ररीचं वैशिष्ट्य असं की ही जमिनीच्या १६ फूट खाली बनविण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थानातल्या अतिकडक उन्हाळ्याचा तिथे जराही त्रास होत नाही.
ही लायब्ररी जगदंबा सेवा समितीच्या माध्यमातून संत हरबंश सिंग निर्मल यांनी बांधली आहे. त्यांना भदारिया महाराज असेही म्हणतात. संत उपाधी लावणारा माणूस खरंच एक अवलिया आहे असं म्हणायला हरकत नाही. गावकऱ्यांकडून त्यांनी वाळवंटात झाडं लावून या संत हरबंशसिंगांनी तिथं हिरवाई आणलीय. लोकांनी सोडून दिलेल्या गाईंसाठी त्यांचा आश्रम हा मोठा आसरा आहे. पंजाबात जन्मलेले हरबंश हिमालयात वगैरे भटकले आणि शेवटी राजस्थानात स्थिरावले. तिथं भद्रियाजींचं मंदिर मोडकळीस आलं होतं. त्यांनी ते स्वत:च्या देखरेखीखाली दुरुस्त करुन घेतलं. काही तरुणांच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्यांनी अफू आणि इतर मादक द्रव्यांच्या सेवनाच्या व्यसनातून मुक्तही केलं आहे. त्यांच्याच प्रयत्नातून ही भलीमोठी लायब्ररी इथं जन्माला आली आहे.
भदारिया महाराज हे स्वतः प्रचंड पुस्तके वाचत असत. जेव्हा भद्रियाजी मंदिर बांधलं तेव्हा सोबतच एक भव्य धर्मशाळा आणि ही लायब्ररी बांधण्यात आली. या लायब्ररीत जगभरातील विविध भागातील पुस्तकांचा समावेश आहे. भदारिया महाराजांना वेगवेगळ्या प्रसंगी लोकांनी दिलेली हजारो पुस्तके त्यांनी या लायब्ररीला दिलेली आहेत. १९९८ साली त्यांनी पुस्तके जमा करायला सुरुवात केली आणि हळूहळू या लायब्ररीत भरच पडत गेली.
तिथले स्थानिक लोक सांगतात की महाराज सुरुवातीचे काही वर्षे लायब्ररीतच राहत होते आणि त्यांनी तिथली जवळपास सगळी पुस्तके वाचली आहेत. असं म्हणतात की जगभरातल्या सगळ्या विषयांवरची पुस्तके या लायब्ररीत उपलब्ध आहेत. या लायब्ररीत जवळपास ५५० संदर्भग्रंथांची कपाटे आहेत. जगभरातील सगळे धर्मग्रंथ, देशातील जवळपास सगळ्या न्यायालयांनी दिलेले निकाल, जगभरातील छोट्यामोठया लेखकांची पुस्तके, महापुरुषांची चरित्रे, तसेच कित्येक दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह या लायब्ररीत पाहायला मिळतो. शिक्षण क्षेत्रात या लायब्ररीचे मोठे योगदान आहे. संशोधकांना इतरत्र भटकण्याची गरज निर्माण होऊ नये म्हणून सगळ्या विषयांतील मूलभूत पुस्तके इथे उपलब्ध आहेत. अत्यंत व्यवस्थितपणे विषयवार पुस्तकांची रचना येथे केलेली पाहायला मिळते.
ही लायब्ररी तशी खूप जुनी आहे असं नाही. साधारण १९९८ साली ही लायब्ररी बांधली गेलीय. त्यामुळे या लायब्ररीची रचना बऱ्यापैकी आधुनिक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही लायब्ररी बांधताना करण्यात आला आहे. या लायब्ररीत सेन्सर ॲक्टिव्हेटेड लाईट्स बसवले गेले आहेत. त्यामुळे वाचकाने प्रवेश केल्यावर आपोआप लाईटस् चालू होतात. पुस्तकं छान लाकडी फ्रेम्समध्ये रचून ठेवली आहेत. लायब्ररीच्या भिंतींवर रंगीत खडूने काढलेल्या पेंटिंग्ज बघून वातावरणातील शांतता अजूनच जास्त भावते.
ही लायब्ररी इथल्या भव्यतेमुळे आणि पुस्तकांच्या विविधतेमुळे आशियातील सर्वात मोठ्या लायब्ररींपैकी एक आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजस्थानात गेलात तर महाल वगैरे सगळीकडेच दिसतील. पण ही अशी हटके लायब्ररी भारतात एकाच ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे पुढच्या वेळेस राजस्थानात जाल तेव्हा या लायब्ररीला अवश्य भेट द्या, फोटो काढा आणि आमच्यासोबतही शेअर करा.