फोटो स्टोरी : अणूस्फोटाच्या आधीचा फोटो अमेरिकेला का हवा होता? तंत्र उपलब्ध नसताना तो कसा आणि कुणी काढला??
या फोटोबद्दल जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर फोटोत दिसणारी गोष्ट एखाद्या बुडबुड्यासारखी वाटू शकते. याच प्रकारचा दुसरा फोटो तर चक्क भल्यामोठ्या तबकडी सारखा दिसत आहे. बऱ्याच लोकांना या फोटोंचा काहीच अर्थ लावता येत नाही. खरंतर हा फोटो एका आण्विक स्फोटाचा फोटो आहे. हा आण्विक स्फोट झाल्यानंतर एका सेकंदाच्या १ कोटीव्या भागात हा फोटो घेण्यात आला होता. स्फोटात दिसणारा १०० फुटी गोळा हा स्फोटाची सुरुवातीची अवस्था दाखवतो. आणखी एक गोष्ट सांगितली तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, हा फोटो कालपरवाचा नसून १९५२ सालचा आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचाराल की एवढ्या बारकाईने फोटो टिपणारा कॅमेरा त्यावेळी अस्तित्वात होता का? तर त्यासाठीच हा लेखप्रपंच आहे.
फोटोमागचा इतिहास
हा फोटो हॅरोल्ड एडगर्टन यांच्या रॅपॅट्रॉनिक कॅमेऱ्याने घेण्यात आला होता. रॅपॅट्रॉनिक म्हणजे rapid action electronic चं संक्षिप्त रूप आहे. या प्रकारचा कॅमेरा हा हाय स्पीड कॅमेरा असतो. जलद गतीच्या हालचाली पण तो सूक्ष्म पद्धतीने कैद करू शकतो. म्हणून तर एका सेकंदाच्या १ कोटी इतक्या सूक्ष्म भागात जे घडलं ते यशस्वीपणे कॅमेऱ्यात कैद करता आलं.
हॅरोल्ड एडगर्टन हे अशा स्टॉप-मोशन फोटोग्राफीसाठी ओळखले जायचे. त्यांनी त्याकाळी सफरचंदाला छेदणाऱ्या बंदुकीच्या गोळीचा फोटो घेतला होता आणि मुकुटाचा आकार तयार करणाऱ्या दुधाच्या थेंबाचा फोटो घेतला होता. अशी अनेक आश्चर्यजनक फोटोग्राफीची उदाहरणे त्यांच्या नावावर होती. डोळ्यांना जे दिसत नाही ते त्यांनी कॅमेऱ्यात कैद केलं होतं.
म्हणूनच अमेरिकन सरकारसाठी हॅरोल्ड एडगर्टन म्हणजे कामाचा माणूस होता. पुढे वाचण्यापूर्वी आपण थोडं अमेरिकन सरकारकडे पाहू. तो काळ दुसऱ्या महायुद्धानंतरचा होता. म्हणजे १९५० च्या सुरुवातीचा. अमेरिका आणि रशियाचं शीतयुद्ध सुरु झालं होतं आणि अमेरिकन सरकार आण्विक शास्त्रांची चाचणी करत होतं. यात पहिली अडचण अशी होती की स्फोटाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या सुरुवातीची अवस्था पाहणे महत्त्वाचे होते. हे पाहण्यासाठी त्याप्रकारचे कॅमेरे त्याकाळी उपलब्ध नव्हते. यावेळी हॅरोल्ड एडगर्टन पुन्हा एकदा अमेरिकन सरकारच्या कामी आले.
पुन्हा एकदा यासाठी की हॅरोल्ड एडगर्टन आणि त्यांच्या कंपनीला हाताशी घेऊन अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात शत्रू सैन्यावर रात्रीच्यावेळी पाळत ठेवण्यासाठी नाईटटाईम फोटोग्राफी विकसित केली होती.
फोटो घेताना आलेल्या अडचणी
अमेरिकन सरकारने पुन्हा एकदा पाचारण केल्यानंतर हॅरोल्ड एडगर्टन आणि त्यांच्या कंपनीने खास अमेरिकेच्या अटॉमिक एनर्जी कमिशनसाठी एकाच टेकमध्ये फोटो घेता येईल अशा रॅपॅट्रॉनिक कॅमेऱ्याची निर्मिती केली. अटॉमिक एनर्जी कमिशनला अणूस्फोटाची सुरुवात पहायची होती. यात अनेक आव्हानं होती. पहिलं आव्हान होतं अणुस्फोटातून निघणारा प्रचंड प्रकाश. हा प्रकाश सूर्याच्या प्रखरतेपेक्षा १०० पटीने जास्त असणार होता. या प्रखरतेत फोटो काढायचा कसा? शिवाय हे सगळं घडणार होतं एका सेकंदाच्या आत!!
रेडीएशन म्हणजेच किरणोत्सर्जन आणि स्फोटामुळे निर्माण होणाऱ्या हवेच्या प्रचंड दाबामुळे (shockwaves) कॅमेरा ११ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या ७५ फुटी मनोऱ्यावर बसवण्यात आला होता. स्फोटाचा कालावधी सेकंदापुरता असल्यामुळे कॅमेऱ्याच्या लेन्सची उघडझाप करणारं यांत्रिक शटर उपयोगाचं नव्हतं. त्याला पर्याय म्हणून एक सेकंदाच्या १ कोटीव्या भागात कॅमेऱ्याचं शटर बंद करणारं तंत्र विकसित करण्यात आलं. हे तंत्र आणि पोलराइज्ड लेन्सेस एकत्र जोडण्यात आले. पोलराइज लेन्सेसमुळे समोरचा प्रचंड प्रकाश संतुलित होणार होता. आजही या प्रकारच्या लेन्सेसचा वापर होतो. एवढी तयारी होऊनही शेवटी एकदा वेळ चुकली तर दुसरा फोटो घेता येणार नाही म्हणून तिथे १० कॅमेरे बसवण्यात आले होते.
हॅरोल्ड एडगर्टन आणि त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या कॅमेऱ्याने यशस्वीपणे तो क्षण टिपला. या फोटोत अणुस्फोटामुळे हादरे बसणारी जमीन दिसते आणि १०० फुटी गोळ्यापुढे अगदी लहान वाटणारी झाडं दिसतात. हा गोळा सेकंदाच्या आतच दुप्पट तिप्पट मोठा झाला आणि तिथे असलेली झाडेच नाहीत तर स्टीलचे खांब सुद्धा विरघळले.
तर, जो बुडबुडा तुम्ही पाहिला त्यामागे एवढी मोठी गोष्ट होती!!
आणखी वाचा :
फोटो स्टोरी : इजिप्शियन राजाच्या थडग्यावरच्या ३०००वर्षं जुन्या दोरखंडामागे आहे एवढा मोठा इतिहास!!
फोटो स्टोरी : अमेरिकन दारुबंदी आणि गाईच्या खुरांच्या बुटांची आयडिया. सरकार नक्की कसं मामा बनलं?