computer

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास पुराव्यानिशी शाबीत करणारे इतिहासकार वा. सी. बेंद्रे!!

छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा अभिमानाचा आणि अस्मितेचा  विषय. संभाजीराजेही मराठी लोकांच्या गळ्यातले ताईत. या दोघांचा इतिहास अभ्यासण्यात आणि तो जगापुढे आणण्यात ज्यांचे अर्ध्याहून अधिक आयुष्य व्यतित झाले झाले त्या वा. सी. बेंद्रेंची आज पुण्यतिथी. महाराष्ट्राला लाभलेले एक थोर इतिहासकार म्हणून त्यांचे वर्णन करता येऊ शकते. 

रायगड जिल्ह्यातील पेण येथे त्यांचा १३ फेब्रुवारी १८९४ रोजी जन्म झाला. त्यांचे वडील बेंद्रेच्या लहानपणीच वारले. त्यानंतर त्यांचे संपूर्ण संगोपन आईनेच केले.  १३ फेब्रुवारी १८९४ ते १६ जुलै १९८४ दरम्यानच्या आपल्या ९० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी ७०हून अधिक पुस्तके लिहिली. प्रचंड व्यासंग, सखोल संशोधन यामुळे त्यांची पुस्तके ही इतिहासावरील उत्तम दस्तावेज मानला जातो. त्यांचे लेखन विश्वसनीय आहे याचा पुरावा म्हणजे त्यांची पुस्तके आजही अमेरिकेतील व्हाइट हाऊसच्या वाचनालयात तसेच जगभरातील उत्तम वाचनालयांमध्ये पाहायला मिळतात.

अर्थातच, त्यांचं कार्य एका लेखात बसण्याइतकं नाही पण बेंद्रेंची नेहमी नजरेस पडणारी, पण ही त्यांचीच आहेत असं माहित नसलेल्या काही संशोधनपर कामांची आपण यादी पाहू. 

१. शिवरायांची जन्मतारीख हा एक मोठा मुद्दा आहे. त्यांची सध्या आपण साजरी करतो ती १९ फेब्रुवारी ही जन्मतारीख हे वा. सी. बेंद्रेंचेच एक संशोधन आहे. 

२. दुसरा मुद्दा याहून महत्त्वाचा आहे. या संशोधनापूर्वी कुणा भलत्याच कुणा माणसाचे चित्र शिवरायांचे चित्र सगळीकडे वापरले जात असे. मात्र आज आपण पाहातो ते छत्रपती शिवरायांचे चित्र वा. सी. बेंद्रेंनी एका परदेश दौऱ्यात शोधून काढले होते. महाराजांची खरी प्रतिमा आपल्याला मिळणे ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी उपलब्धी आपण मानायला हवी. 

३. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक गैरसमज नाटक-पुस्तके-सिनेमांद्वारे पसरले होते. पण साक्षात छत्रपतींच्या पोटी जन्माला आलेले आणि जिजाऊंच्या संस्कारात वाढलेले संभाजी महाराज निश्चितच तेजस्वी असले पाहिजेत हे त्यांनी अचूक हेरले आणि साधनांची जमवाजमव करायला सुरुवात केली. देशात तसेच परदेशातून बेंद्रेंनी हजारो पुरावे गोळा केले आणि संभाजी महाराजांवरील चरित्र १९५८ साली लिहून पूर्ण केले. तसेच १९६० साली संभाजी महाराजांचे हे तेजस्वी चरित्र ग्रंथरुपात प्रसिद्ध करण्यात आले. 

४. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्यांनी महाराजांचे आजोबा मालोजी राजे, शहाजीराजे, महाराजांचे जेष्ठ बंधू संभाजी राजे, राजाराम महाराज यांच्या आयुष्यावरसुद्धा त्यांनी खूप मोठे संशोधन केले आहे. 

५. १९४८ साली पेशवे दप्तरात बेंद्रेंची संशोधन अधिकारी म्हणून निवड झाली. त्या कामांतर्गत त्यांनी जवळपास ४ कोटी कागदपत्रांची विषयवार विभागणी केली. यामुळे पुढील काळात संशोधकांना कागदपत्रे शोधणे खूप सोपे झाले. या सर्वांचा विचार करता त्यांचा व्यासंग किती गाढ असेल याची कल्पना येते. 

हे सर्व पाहाता बेंद्रेंच्या कामाचा व्याप आणि झपाटा दोन्ही लक्षात येतात.  १९१८साली वयाच्या २४व्या वर्षीच वा.सी. बेंद्रेंनी भारत इतिहास संशोधक मंडळात ते कामाला सुरुवात केली होती आणि त्यानंतर पुढचे संपूर्ण आयुष्य हे त्यांनी इतिहासाला वाहून दिले होते. पुढे साधन चिकित्सा नावाचा त्यांचा पहिला ग्रंथ १९२८ साली प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ संशोधकांसाठी मार्गदर्शक ठरला होता. पुढे १९३८साली श्री. खेर यांनी त्यांना शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला पाठवले. इथून पुढे त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने बहरले असे म्हटले जाते.

इतिहासकाराने इतिहास लिहिताना कुठल्याही कपोलकल्पित गोष्टीवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीने संशोधन करून जे सत्य असेल तेच जगासमोर मांडावे असा एक प्राथमिक समज असतो. या कसोटीवर वा सी बेंद्रे 100 टक्के खरे उतरताना दिसतात. त्यांच्या पुस्तकांवर आधारित अनेक नाटके निघाली आहेत. तसेच अनेक Ph.D. संशोधकांसाठी आजही त्यांची पुस्तके मार्गदर्शक आहेत. संतसाहित्याबद्दलचा सुद्धा त्यांचा गाढा अभ्यास होता. संतसाहित्यावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. असा हा गुणवंत लाभणं हा महाराष्ट्राचा गौरव म्हणायला हवा. 

आता वा.सी. बेंद्रे आपल्यात नाहीत. पण त्यांच्या गौरवार्थ आणि स्मरणार्थ त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. पुण्यात ते जिथे रहायचे त्या घराला शासनाने ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित करण्यात आले आहे, ती तुम्ही पाहू शकता.  

सबस्क्राईब करा

* indicates required