computer

फोटो स्टोरी : कलकत्यातल्या धनिकाने चक्क झेब्रा टांग्याला जुंपला त्याचा किस्सा!!

देशपरदेशातल्या फोटोंबद्दल लिहिल्यानंतर आज आम्ही आपल्या भारतातील फोटोवर फोटोस्टोरी आणली आहे. ही गोष्ट त्याकाळातली आहे जेव्हा रस्त्यावर फक्त झेब्रा क्रॉसिंग नव्हतं तर, स्वतः झेब्रासुद्धा धावायचे. फोटोत दिसणाऱ्या गाडीला झेब्रा गाडी, झेब्रा टांगा किंवा आणखी काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा. आम्ही या लेखापुरतं झेब्रा गाडी म्हणणार आहोत.

तर, आता काही लोकांना वाटेल की हा फोटोशॉप आहे किंवा फोटो खरा असला तरी १९०० च्या काळात कॅमेरा होता का ? हा फोटो आम्ही तपासून पाहिला आहे आणि तो पूर्णपणे खरा आहे. फोटोची सत्यासत्यता तपासताना जी माहिती मिळाली ती आम्ही बोभाटाच्या वाचकांपुढे ठेवत आहोत.

(मन्मथनाथ मुळीक)

या झेब्रा गाडीचे मालक कलकत्याचे धनिक ‘मन्मथनाथ मुळीक’ होते आणि घोड्याच्या जागी झेब्रा बांधण्याची आयडियाही त्यांचीच होती. त्यांच्याबद्दल वाचण्यापूर्वी त्यांच्या घराण्याबद्दल थोडी माहिती घेऊया.

घोड्याच्या जागी झेब्रा बांधणारं कुटुंब श्रीमंत असणार हे काही वेगळं सांगायला नको. मुळीक कुटुंब हे बंगालच्या उच्चभ्रूंच्या म्हणजे त्याकाळातील ‘पॉश’ समजल्या जाणाऱ्या उत्तरेकडील पथूरीयाघाट भागात राहायचे. पैसा भरपूर असल्याकारणाने मुळीक घराण्यातल्या काही पिढ्या उधळपट्टी करणाऱ्या निघाल्या. उदाहरणार्थ, राजेंद्र मुळीक यांनाच बघा.

या भाऊंनी १६ व्या वर्षीच स्वतःसाठी संगमरवरी महाल बनवायला घेतला होता. त्यांच्याकडे प्राणी आणि पक्षांचा खाजगी संग्रह देखील होता. या संग्रहात अनेक प्राणी होते. इतके प्राणी होते की १८७६ साली जेव्हा बंगालमध्ये प्राणीसंग्रहालयाची स्थापना झाली तेव्हा त्यांनी आपल्या खाजगी संग्रहातले प्राणी-पक्षी दान म्हणून दिले होते.

तर अशा या राजेंद्र मुळीक यांच्या वंशातला एक नग म्हणजे ‘मन्मथनाथ मुळीक’. या मन्मथनाथ मुळीक यांना एक वेगळीच आवड होती. ते घोड्यांचे शौकीन होते. त्यांच्याकडे घोड्यांची मोठी पाग होती. ते स्वतः घोड्यांना प्रशिक्षण द्यायचे. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे ९ टांगे होत्या. पुढे जाऊन त्यात झेब्रा गाडीची भर पडली.

(जुनं कलकत्ता)

असं म्हणतात की त्यांनी एकदा जंगली झेब्रा काबूत आणून आपल्या गाडीला जुंपण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. मग काय त्यांनी अलीपूर प्राणीसंग्रहालयातून ६००० रुपयांना २ झेब्रे विकत घेतले. स्वतःहून त्यांना प्रशिक्षणही दिलं. ते वर्ष होतं १९३०. १९३६ साली The Statesmen या वृत्तपत्रात त्यांच्यावर बातमी छापून आली आणि तुम्ही जो फोटो पाहत आहात तो त्याच बातमी सोबत छापण्यात आला होता. गाडीत जे दाढीवाले गृहस्थ दिसत आहेत ते खुद्द मन्मथनाथ मुळीक आहेत. हा फोटो इडन गार्डन येथे घेण्यात आला होता.

(The Statesmen वृत्तपत्रात छापून आलेली झेब्रा गाडीची बातमी)

या झेब्रा गाडीचं पुढे काय झालं याबद्दल मात्र फारशी माहिती मिळू शकलेली नाही. झेब्राला टांग्याला जुंपण्याची कल्पना तशी जगभर प्रचलित होती. इंग्लंड पासून ते केनियापर्यंत अशा गाड्या अस्तित्वात होत्या. त्यातले काही नमुने पाहा.

आजची फोटो स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि शेअर करायला विसरू नका.

सबस्क्राईब करा

* indicates required