computer

अवघ्या ५ व्या वर्षी ती आई झाली? वाचा जगातल्या सर्वात लहान वयाच्या आईबद्दल!!

भारतीय पब्लिकला बालविवाह ही संकल्पना काही नवी नाही. आजही कुठल्यातरी खेड्यापाड्यांत अशा घटनांच्या बातम्या कधीकधी वर्तमानपत्रात वाचायला मिळतात. बालविवाहामुळे कमी वयात माता होण्याचा प्रसंग बालिकांवर ओढवत असे. पण कितीही म्हटले तरी एका विशिष्ट वयाआधी कोणत्याही मुलीला आई होणे शक्य नसते. पण जगाच्या इतिहासात एक अतर्क्य आणि अविश्वसनीय वाटावी अशी एक घटना घडली होती.

ही घटना घडली होती पेरू देशात. अगदी सुरस, चमत्कारिक आणि तितकीच खोटी वाटावी अशी ती घटना. अवघे ५ वर्षे ७ महिने वय असलेली लीना मेदिना नावाची मुलगी आई झाली होती. लिनाचा जन्म १९३३ सालचा. लहान मूल म्हटले म्हणजे खेळण्या बागडण्याचे वय. पण अचानक लिनाचे पोट आपोआप वाढायला लागले आणि तिच्या घरचे काळजीत पडले. पण खरे संकट तेव्हा ओढवले जेव्हा डॉक्टरांनी ती गरोदर असल्याचे सांगितले.

आजपासून 90 वर्षांपूर्वी जशी असावी तशीच परिस्थिती आणि सुविधा त्याकाळी पेरूत होत्या. आजच्या घडीला या देशाची आर्थिक घडी आणि सुविधा अतिशय चांगल्या आहेत. असं म्हणतात की आधी लीनाच्या परिवाराने सुरुवातीला तिला घरगुती वैद्याला दाखवले. त्याचा उपचार सुरू झाला आणि इकडे लिनाचे बाळ देखील पोटात वाढायला लागले. तिच्या पोटाच्या आकारात काहीच फरक पडेना तेव्हा ईलाजाने तिला मोठ्या शहरातल्या दवाखान्यात हलवावे लागले.

हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना आधी तर तिच्या पोटात एखादा ट्यूमर असावा असे वाटले. पण प्रत्यक्षात ती सात महिन्यांची गरोदर होती. म्हणजेच ती पाच वर्षांहून कमी वयाची असताना ही गर्भधारणा झाली होती. डॉक्टरांना सुद्धा काय करावे सुचत नव्हते. कारण बाळ किंवा आई दोघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू होण्याचा धोका होता. शेवटी होईल तेवढी खबरदारी घेऊन उपचार घेतले गेले आणि दोघांचा जीव वाचविण्यात डॉक्टर यशस्वी ठरले. १४ मे १९३९. हा तो दिवस ज्या दिवशी लीना जगातली सर्वात लहान आई ठरली. ही गोष्ट जगभरात लोकांना कोड्यात टाकणारी होती. जगभरातल्या वर्तमानपत्रांत ही बातमी आली होती, त्यावर बऱ्याच चर्चाही झडल्या. या गोष्टीवर लोक आज विश्वास ठेवायला तयार होत नाहीत आणि ९० वर्षांपूर्वीची परिस्थितीही काही वेगळी नव्हती.

जन्माला आलेले बाळ सुस्थितीत होते. त्याचे नाव काय ठेवावे हा पेच लगेच सोडवून ज्या डॉक्टरांनी उपचार केले त्यांच्या नावावरून मुलाचे नाव 'जोरार्दो' ठेवण्यात आले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल लीना आई कोणामुळे झाली? तर यावर आजही ठाम उत्तर नाही. ती कधीच या प्रश्नाचे नीट उत्तर देऊ शकली नाही. बलात्काराच्या आरोपात खुद्द तिच्या वडिलांनाच अटक करण्यात आले होते. पण त्यांची निर्दोष मुक्तता झाली. पुढे तिच्या मतिमंद भावाला देखील अटक झाली होती. पण त्यातूनही काही ठोस पुरावे काही मिळाले नाहीत.

लीनाच्या बाळाला मोठा होईपर्यंत लीना त्याची बहीण आहे असे सांगण्यात आले होते. पुढे त्याला सत्य समजले तेव्हा त्याला हादराच बसला होता. कालांतराने लीनाने लग्न केले आणि लग्नानंतर तिला अजून एक बाळ झाले होते. पाचव्या वर्षी झालेले तिचे बाळ ४० वर्षं जगले आणि हाडांच्या विकारामुळे १९७९ साली त्याचा मृत्यू झाला होता.

(डाव्या बाजूला जोरार्दो आणि लीना)

लीना आजही जिवंत आहे आणि पेरूत तिच्या कुटुंबासोबत सुखी आयुष्य जगत आहे. तिच्या मुलाखती घ्यायचे खूप प्रयत्न झाले. पण तिने आजवर एकही मुलाखत दिली नाही. हॉलीवूड आणि इतर ठिकाणांहूनही या घटनेवर सिनेमा बनवण्याच्या ऑफर्स आणि त्या मोबदल्यात तिला पैसे ऑफर करण्यात आले होते. हे सारे प्रस्ताव तिने आणि तिच्या कुटुंबाने, दोघांनीही नाकारले होते.

काही असो, या घटनेने पूर्ण जगाला आणि वैद्यकीय विश्वाला जाम कोड्यात टाकले होते. पाच वर्षांची मुलगी गरोदर कशी होऊ शकते याचं उत्तर अद्याप कुणाला सापडलं नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required