computer

थेट पुतीनला दहशत देणारा विरोधक अलेक्सी नवेलनी आणि त्याला मारण्यासाठी वापरलेल्या नोव्हीचोक विषाची गोष्ट!!

जगात राजेशाही, हुकुमशाही, लष्करशाही यांना स्थान नाही. लोकशाहीला मान्यता आहे, पण काही देश आहेत जिथे लुटुपुटूची लोकशाही नांदत आहे.  अशा खोट्यानाट्या लोकशाहीसाठी तशाच खोटेपणाचा बुरखा पांघरलेले नेतृत्व हवे असते. म्हणजे बघा निवडणुका घ्यायच्या, पण आपल्या विरोधात कोण असेल हे आपण स्वतःच ठरवायचं, कोणी जर आडवा आला तर त्याला देवाघरी पोचवायचं, निवडणुकीत घोळ घालायचा, विरोधक टिपून खलास करायचे, जनतेने उठाव केला तर जनतेवर रणगाडे चालवायचे, हेही नाही झालं तर सरळ घटनेत बदल करायचे, किंवा घटनाच बदलायची, स्वतःची राजवट लोकशाही पद्धतीने चालली आहे असं भासवत हुकूमशाही निर्माण करायची.

या सगळ्या गोष्टी रशियाला पूर्णपणे लागू पडतात. १९९९ साली पुतीन पंतप्रधान बनले आणि तेव्हापासून आजतागयात रशियावर त्यांची एकहाती सत्ता आहे. जरी तिथे निवडणुका होत असल्या, निवडणुकीतून सरकार बनत असलं तरी पुतीन हे रशियाचे एकमेव बाहुबली आहेत. आधी पंतप्रधान मग राष्ट्रपती आणि पुढे कधी पुन्हा पंतप्रधान तर कधी राष्ट्रपतीपदी कायम राहत पुतीन यांनी सत्ता आपल्या हातातच राहिल याची तजवीज केली.

याचं एक उदाहरण सांगतो. २००८ साली पुतीन यांच्या राष्ट्रपतीपदाचा कालावधी पूर्ण झाल्यावर ते पदावरून खाली उतरले, पण पंतप्रधानपद स्वतःकडे ठेवून घेतलं. राष्ट्रपतीच्या रिकाम्या खुर्चीवर स्वतःच्याच गोटातल्या एकाला बसवून राज्यकारभार सुरु ठेवला. गम्मत इथे नाही पुढे आहे. या नव्या कठपुतली राष्ट्रपतीने घटनेतच बदल केले आणि राष्ट्रपतीपदाचा कालावधी ४ वर्षांतून ६ वर्षं केला. यामागचा मेंदू कोणाचा होता हे वेगळं सांगायला नको. पुढच्या निवडणुकीत पुतीन राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून पुन्हा राष्ट्रपती झाले. यावेळी ६ वर्षांसाठी.

पुतीन यांच्या हाती एकहाती सत्ता असली म्हणून त्यांना विरोधकच नाहीत असं मात्र नाही. त्यांना विरोधक आहेत. जास्तीतजास्त विरोधक देवाघरी गेलेत, पण जिवंत असणारे विरोधक पण काही कमी नाहीत. सध्या गाजत असलेल्या एका विरोधकामुळे आम्ही रशिया आणि पुतीन यांच्याबद्दल तुम्हाला सांगत आहोत. हा विरोधक कोण आहे आणि चक्क पुतीनलाही त्याची दहशत का वाटते आणि पुतीन यांचं विरोधकांना मारण्याचं खास अस्त्र काय आहे या सगळ्या गोष्टींचा उलगडा या लेखातून करणार आहोत. चला तर सरुवात करूया.

अलेक्सी नवेलनी हे त्या विरोधकाचं नाव. पुतीन यांच्या विरोधकांमध्ये आजच्या काळात त्याचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. २०१७ साली पुतीन समर्थकांनी त्याच्यावर झेल्योन्का नावाचं रसायन भिरकावलं होतं. या हल्ल्यात त्याची दृष्टी जाता जाता राहिली. गेल्यावर्षी त्याला तुरुंगात डांबलं होतं तेव्हा त्याच्यावर विषप्रयोग झाला होता. नुकतंच २० ऑगस्ट रोजी तो विमानात असताना त्याने तब्येत बिघडल्याची तक्रार केली. त्याच्या चहात कोणीतरी विष मिसळलं होतं. तो कोमात गेला. त्याच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय घेण्यात आला, पण रशियन डॉक्टरांनी विषबाधा झालीच नव्हती असा निर्वाळा दिला. अनेक प्रयत्नानंतर अलेक्सी नवेलनीला जर्मनीला नेण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि तपासणीत एका खतरनाक विषाचा पत्ता लागला. हे विष होतं नोव्हीचोक. 

अलेक्सी नवेलनी आणि नोव्हीचोकबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. सुरुवात करूया अलेक्सी नवेलनीपासून. 

अलेक्सी नवेलनीचा जन्म ४ जून १९७४ साली मॉस्को येथे झाला. १९९८ साली रशियाच्या पीपल्स फ्रेंडशिप युनिव्हर्सिटीतून त्याने कायद्याची पदवी मिळवली. रशियाच्या फायनान्स युनिव्हर्सिटीतून त्याने securities and exchanges चा अभ्यास केला. पुढे राजकारणात आल्यानंतर त्याचं नेतृत्व आणि लोकप्रियता पाहून अमेरिकेच्या एल युनिव्हर्सिटीने त्याला ‘एल वर्ल्ड फेलोज’ शिष्यवृत्ती देऊ केली. ही शिष्यवृत्ती जगातल्या नव्या दमाच्या नेतृत्वाला दिली जाते.

रशियात सध्या युनायटेड रशिया या पक्षाच्या हाती सत्ता आहे आणि या सत्तेचे सत्ताधीश पुतीन आहेत. अलेक्सी हा सुरुवातीपासून पुतीन आणि त्यांच्या पक्षाचा कडवा विरोधक होता. त्याच्याच शब्दात सांगायचं तर हा पक्ष म्हणजे ‘चोर आणि बदमाशांचा पक्ष’ आहे. भ्रष्ट सरकार आणि सरकारी यंत्रणेबद्दलचा राग सहज असला तरी त्यामागे एक  मोठी पार्श्वभूमी आहे. थोडं इतिहासात मागे जाऊया.

चर्नोबिल येथे काय घडलेलं हे एव्हाना आपल्या सगळ्यांना माहित झालेलं आहे. माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. सोव्हिएत रशियाच्या काळात युक्रेन रशियाचाच एक भाग होता. याच युक्रेनमध्ये चर्नोबिल नावाच्या ठिकाणी एक अणुशक्ती केंद्र होतं. या अणुशक्ती केंद्रात १९८६ साली अणुस्फोट झाला होता. त्यावेळी अलेक्सीच कुटुंब चर्नोबिल भागात राहत होतं. अणुस्फोटानंतर ती संपूर्ण जागा कायमची बंद करण्यात आली तेव्हा तिथल्या नागरिकांना दुसऱ्या जागी हलवताना सरकार बेजबाबदारीने वागलं. नागरिकांना त्यांच्या कपड्यांशिवाय दुसरं काहीही सोबत नेण्याची परवानगी नव्हती, पण नागरिकांच्या मागे त्यांच्या वस्तू सर्रास विकण्यात आल्या. पुढे बऱ्याच वर्षांनी जेव्हा अलेक्सीने आपलं जुनं घर पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की घरातील लाद्याही उखडून विकण्यात आल्या आहेत. अलेक्सीच्या मनातल्या सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराबद्दलचा राग चर्नोबिलच्या या घटनेत जन्माला आला.

अलेक्सीच्या राजकारणातल्या वाटचालीची सुरुवात भ्रष्टाचार विरोधी कारवायांपासून झाली. त्याने २००८ साली रशियातील ५ बड्या तेल कंपन्यांमध्ये ३,००,००० रुबल्स (रशियन चलन) गुंतवले. या गुंतवणुकीतून तो त्या कंपनीचा शेअरहोल्डर झाला आणि इथून त्याने एकेक पाऊल उचलायला सुरुवात केली. शेअरहोल्डर असल्याने त्याने कंपनीतील पैशांचा व्यवहार पारदर्शी असावा असा आग्रह धरला. त्यासाठी आंदोलन केलं. कंपनींच्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले. त्याच दरम्यान पुतीन विरोधक असलेल्या सर्गेई मॅग्निट्स्की याला अटक झाली होती. अलेक्सीने त्याविरुद्ध आवाज उठवला. २००९ साली सर्गेई मॅग्निट्स्कीचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्युचं कारण आजही जगाला समजलेलं नाही. कधी समजण्याची शक्यताही नाही.

२०१० साली अलेक्सीने रशियाच्या ट्रान्सनेफ्ट या तेल वाहून नेणाऱ्या पाईपलाईन कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांचा जवळजवळ ४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला. त्याच वर्षी अलेक्सीने सरकारच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी RosPil योजना आणली. या योजनेतून सरकारी व्यवहारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सरकारी टेंडर आणि त्यासाठी लागणाऱ्या बोली ऑनलाईन खुल्या असाव्यात अशी मागणी करण्यात आली. 

२०११ साली अँटी करप्शन फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. अलेक्सीने पुतीन आणि त्यांच्या पक्षातील भ्रष्टाचारालाच हात घातला होता. याचे परिणामही त्याला भोगावे लागले. 

२०११ सालच्या निवडणुकीत मतांची फेरफार झाल्याचा आरोप त्याने केला. निवडणुकांच्या नंतर लगेचच मॉस्कोच्या रस्त्यांवर अलेक्सीसहित ६००० लोक आंदोलनासाठी उतरले होते. यातील ३०० लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं. यात अलेक्सीही होता. सरकारी अधिकाऱ्याची अवहेलना केल्याप्रकरणी त्याला १५ दिवसांचा तुरुंगवास झाला. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तो शांत बसला नाही. पुन्हा एकदा त्याने निदर्शनं काढली. यावेळी तब्बल १,२०,००० लोकांचा जमाव तिथे हजर होता. २०१२ साली फेरनिवडणूका झाल्या आणि यावेळीही पुतीन जिंकून आले.

अलेक्सीवर कधी रासायनिक हल्ला, तर कधी तुरुंगात डांबण्याचं सत्र अनेक वर्षापासून सुरु आहे. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्याच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकण्यात आली. २०१८ साली त्याने राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर केल्यावर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. बंदीसाठी त्याच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप पुढे करण्यात आले. याखेरीज पुतीन समर्थक त्याला सोशल मिडीयावर ट्रोल करण्याचं काम नेटाने करत असतात.

अलेक्सीच्या लोकप्रियतेची चुणूक २०१३ च्या निवडणुकीत दिसून येते. २०१३ ची मॉस्कोच्या मेयर पदासाठी  निवडणूक होती. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी त्याला अटक झाली होती. त्याला ५ वर्षांची शिक्षा  ठोठावण्यात आली. आश्चर्य म्हणजे त्याला तुरुंगातून प्रचारासाठी काही काळापुरतं सोडण्यात आलं. या निवडणुकीत त्याने पुतीन यांनी उभ्या केलेल्या उमेदवारावर मात केली. त्याला प्रचारासाठी वेळ मिळाला नव्हता, एवढंच काय इतरांची टीव्हीवर जाहिरात होते तशी त्याची जाहिरातही झाली नव्हती. लोकांमधली प्रसिद्धी आणि त्याचा ब्लॉग वाचून लोकांनी त्याला मत दिलं होतं. यानंतर तो राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवार असल्याचं बोललं जाऊ लागलं. त्याच्या मागे जनता तर उभी होतीच. रशियातल्या विरोधीपक्षाचा चेहरा म्हणून अलेक्सी पुढे येऊ लागला होता.

कदाचित यामुळेच पुतीन यांना अलेक्सीची भीती वाटत असावी. पण तरी अलेक्सीला कोणी अज्ञाताने येउन गोळ्या का नाही घातल्या, किंवा तो जेलमध्ये सडत नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. अलेक्सीच्या अमेरिका कनेक्शनबद्दलही बोललं जातं. अमेरिकेच्या एल युनिव्हर्सिटीने दिलेल्या शिष्यवृत्तीनंतर हा संशय घेण्यात येऊ लागला. काहीही असो, पण या खेळत पुतीन अव्वल आहेत आणि अलेक्सी पार तळात.

आता जाणून घेऊया त्या खास नोव्हीचोकबद्दल. 

नोव्हीचोक हे नर्व्ह एजंट प्रकारातील विष आहे. आधी “नर्व्ह एजंट” काय असतं हे समजून घेऊ या. नर्व्हचा अर्थ होतो मज्जातंतू. नर्व्ह एजंट प्रकारातील रसायनं शरीरातील मज्जातंतूंचं कार्य उध्वस्त करण्याचं काम करतात. शरीरातील विविध अवयवांना मेंदूद्वारे दिला जाणारा संदेश वाहून नेण्याचं काम मज्जातंतू करतात. नर्व्ह एजंट नेमकं हे काम ठप्प पाडतो. त्यामुळे शुद्ध हरपणं, रक्तदाब वाढणं, हृदयाची गती वाढणं, घाम येणं, उलट्या, चक्कर अशी लक्षणं दिसून येतात. रुग्ण कोमामध्ये जाण्याची शक्यताही असते. एकूण शरीराचं कार्यच बंद पडतं.

आता येऊया नोव्हीचोककडे. नोव्हीचोकचा अर्थ होतो "new comer”. मराठीत “नवीन  माणूस”. नोव्हीचोक इतर नर्व एजंटच्या तुलनेने जास्त खतरनाक समजलं जातं. नोव्हीचोकचा परिणाम व्हायला ३० सेकंद ते २ मिनिट पुरेसे असतात. नोव्हीचोक द्रव आणि पावडर स्वरुपात बाळगता येतं. याचा अर्थ नोव्होचोक देण्याचे मार्गही वाढतात. हवेत शिडकावा केल्यास श्वासावाटे आणि अन्न किंवा पाण्यात मिसळल्यास तोंडावाटे नोव्हीचोक देता येतं. त्वचेवर शिडकावा केल्यास त्वचेतूनही नोव्हीचोक शरीरात प्रवेश करू शकतं.  

नोव्हीचोक कोणी तयार केलं?

रशियाचं म्हणणं आहे की या नावाचं विष अस्तित्वातच नाही. खरं तर हे विष रशियाच्याच रासायनिक संशोधनातून शोधण्यात आलं होतं. १९७३ ते १९९३ या काळात नोविचोकची निर्मिती एक रासायनिक हत्यार म्हणून करण्यात आली. ९० च्या दशकात रशियाच्या डॉक्टर मिर्झायानोवने नोव्हीचोकच्या अस्तित्वाची कबुली दिली होती. तो पुढे अमेरिकेत पळून गेला आणि तिथे त्याने एक पुस्तक लिहिलं. या पुस्तकात नोव्हीचोकचा संपूर्ण फॉर्म्युलाच त्याने मांडला होता.

नोव्हीचोकचा पहिला प्रयोग दोन १९९५ साली एका बँकरवर केल्याचा दिसून येतो. हा बँकर रशियाच्या तत्कालीन पंतप्रधानांच्या जवळचा माणूस होता. नोविचोकच्या राजकीय हत्याकांडाचं हे पहिलं उदाहरण. त्यानंतर नोव्हीचोकची चर्चा २०१८ साली झाली. सर्गेई आणि युलिया स्क्रिपल या दोघांना मारण्यासाठी नोव्हीचोकचा वापर करण्यात आला. हे दोघेही ब्रिटनमध्ये होते. तिथे रशियाच्या गुप्तहेर खात्यातील दोघांनी मिळून त्यांच्यावर विषप्रयोग केला. सर्गेई हा एकेकाळचा रशियन गुप्तहेर, तर युलिया ही त्याची मुलगी.

२०१८ सालीच आणखी दोघाजणांना नोव्हीचोकने मारण्यात आलं. यावर्षी अलेक्सीवरही हेच विष वापरण्यात आलं आहे. सुदैवाने अलेक्सीने विष पचवलं आणि तो आता बरा होतोय.

रशियन इतिहास बघितला तर रशियन जनतेने नेहमीच एखाद्या नेतृत्वासाठी आपलं भविष्य पणाला लावलेलं दिसून येतं.  झार राजवटीत जपानसारख्या लहानग्या देशाकडून पराभव झाल्यानंतरही जनता झारच्या मागे उभी होती. पुढे कम्युनिस्ट क्रांतीनंतर लेलीन आणि स्टालिनच्या मागे जनता गेली. सध्या रशिया पुतीन यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. 

 

दडपशाही फारकाळ टिकत नाही आणि जनतेपुढे कोणतंही सरकार मोठं होऊ शकत नाही, हा इतिहास आहे. रशियात विरोधी आवाज नेहमीच दाबण्यात आलाय, पण विरोधी आवाज नष्ट मात्र झालेला नाही. हे विशेष. अलेक्सीवर भविष्यातही हल्ले होत राहणार आहेत, पण पुतीन यांच्या विरोधकांचं आजवर जे झालं तेच त्याचं होईल का? रशियातील विरोधी आवाज पुन्हा दाबला जाईल का? आणि लोकशाहीच्या नावाखाली रशियात हुकुमशाहीच नांदेल का, हे आता भविष्यच सांगेल. सध्या अलेक्सीच्या बऱ्या होण्याने रशियातल्या विरोधी आवाजाला नवीन बळ मिळालंय यात शंका नाही.

 

आणखी वाचा :

ही आहे तब्बल २०,००० वर्षांसाठी बंद असलेली जागा....या जागी नेमकं काय घडलं होतं ?

सबस्क्राईब करा

* indicates required