computer

सोमालियाच्या झोपडीत राहणारी, १३व्या वर्षी घरातून पळून गेलेली लहानगी अमेरिकेत नामवंत मॉडेल कशी बनली?

पूर्वेस सोमाली समुद्र, नैऋत्येस केनिया, तर पश्चिमेस इथिओपिया या सीमांनी वेढलेला आफ्रिका खंडातील देश म्हणजे सोमालिया. एका बाजूला काटेरी झुडूपांची सवानाची रम्य भूमी, तर दुसर्‍या बाजूला निमवाळवंटी प्रदेशाचे लेणे लाभलेला हा देश. उंच पर्वतरांगा, विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि खोल दर्‍या असे सगळे पॅकेज असलेल्या या देशाचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे. हा इतिहास आपल्याला थेट अश्मयुगापर्यंत घेऊन जातो. १९६० मध्ये नैऋत्य सोमालियात उत्खननादरम्यान मिळालेल्या काही कुर्‍हाडी सुमारे ३० लाख वर्षांपूर्वी बनवल्या गेल्याचा अंदाज आहे.

या सोमालियात राहणारी बहुसंख्य जनता ही मुस्लिम धर्मिय आहे. इथले लोक भटके जीवन जगतात. इथल्या अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. अशाच एका भटक्या जमातीतल्या ११ मुलांच्या कुटुंबात १९६५ मध्ये वारीस डायरीचा जन्म झाला. अगदी लहान असल्यापासूनच तिचा नशिबाशी झगडा सुरू झाला. अवघी १३ वर्षांची असताना ६० वर्षांच्या माणसाशी विवाह करावा लागू नये म्हणून ती घरातून पळून गेली. तशी पळून जायला तिला तिच्या आईनेच मदत केली म्हणा. पण यानंतर तिच्या संकटात आणखीनच भर पडली.

सोमालियातलं हवामान कोरडं. त्यामुळे रात्रीच्या वेळी अंगाला बोचणार्‍या कडाक्याच्या थंडीचा सामना करत ती पुढे आसर्‍यासाठी हिंडत राहिली. पुढे तिला तिची मावशी, त्या मावशीच्या मुली भेटल्या. त्या वारीसला त्यांच्याबरोबर घेऊन गेल्या. योगायोगाची गोष्ट म्हणजे तिचे काका इंग्लंडच्या एम्बसीत राजदूत म्हणून कार्यरत होते. त्यांना घरकामासाठी एका व्यक्तीची गरज होतीच. त्यांनी तिचा ‘गुलाम’ म्हणून व्हिसा मिळवला. मावशीची फॅमिली तिला स्वतःबरोबर घेऊन गेली. सुरुवातीला "तुला शिक्षण देऊ, शाळेत तुझे नाव घालू" अशी बतावणी करून तिला नेण्यात आले. वारीसलाही शिक्षणाची आवड असल्याने आपले शिकण्याचे स्वप्न पूर्ण होणार हे ऐकून ती ताबडतोब जायला कबूल झाली. पण नातेवाईक म्हणून नाही, तर घरकाम करणारी कामवाली म्हणून आपल्याला इथे रहावे लागणार आहे हे समजताच तिचा भ्रमनिरास झाला. तिच्या बहिणींना शाळेत पोहोचवण्याचे व शाळेतून घरी आणण्याचे काम तिच्यावर सोपवण्यात आलं.

आयुष्याला मिळालेले हे वळण म्हणजे खरे तर तिच्या परवडीची फक्त सुरुवात होती. यापुढचा प्रवास आणखीनच खडतर होणार होता याची तिला कल्पना नव्हती. पण हार मानणे वारीसच्या स्वभावातच नव्हते. याचवेळी तिच्या काकांची बदली होत असल्याचे तिला समजले आणि तिला हवी असलेली संधी मिळाली. वारीसने तिचा पासपोर्टच लपवून ठेवला. परिणामी तिचा ‘गुलाम’ म्हणून आपल्याच नातेवाईकांकडे राबण्याचा परतीचा मार्ग बंद झाला. पुढे काय करायचे ह्याबद्दल मात्र सगळीच अनभिज्ञता होती.

मावशीच्या घरातून बाहेर पडल्यावर पुढे काही दिवस वारीसने रस्त्यावर काढले. तिच्याकडे वर्क परमिट नसल्याने तिला लपून काम करावे लागे. नंतर वाय.एम. सी. ए. (Young Men's Christian Association) या जागतिक स्तरावरच्या तरूण संघटनेच्या लंडनमधल्या एका ठिकाणी तिला एक खोली मिळाली. याचवेळी तिची गाठ तिच्याच देशाची नागरिक हालवूशी पडली. या हालवूच्या मदतीने वारीसला मॅक्डोनाल्डमध्ये नोकरी मिळाली व जवळच राहण्यासाठी एक जागाही मिळाली. इथे तिला अ‍ॅना ही मैत्रीण मिळाली. वारीसचा मेहनती स्वभाव, प्रामाणिकपणा ह्या गुणांच्या बळावर तिने दुकानाच्या मालकिणीला आपलेसे केले. दिवस जात होते. पण नशीब अजून उजळणार होते. या दरम्यान वारीस माईक गॉस ह्या ब्रिटीश फोटोग्राफरच्या दृष्टीला पडली आणि ह्या जोहर्‍याने बरोबर तिच्यातल्या हिर्‍याला पारखले.

माईकने काढलेले तिचे फोटो जगातील नामवंत पिरेल्ली ह्या कॅलेंडरवर छापून आले आणि सोमालियाच्या एका छोट्याशा झोपडीत राहणारी वारीस रातोरात स्टार झाली. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या पठ्ठीला ह्याची कल्पनाही नव्हती. सकाळी उठून बाहेर आली तर तिच्या घराबाहेर हीऽऽ एवढी गर्दी जमा झाली होती. हे फोटो म्हणजे जणूकाही तिच्या सुखी आयुष्याची नांदीच होती. पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर झळकल्यावर मॉडेलिंगचे नवे क्षेत्र तिच्यासाठी खुले झाले. मॉडेलिंगच्या अनेक ऑफर्स येऊ लागल्या. ह्यानंतर तिने काही चित्रपटांमधून छोट्या भूमिकाही केल्या. पुढे बी.बी.सी. ने तिच्यावर शॉर्टफिल्म करायची ठरवली, त्यावेळी अनेक वर्षांनी आई व भावंडं यांना भेटण्याचा योग आला. त्यावेळी लहान मुलींसाठी दवाखाने सुरू करण्याची तिची इच्छा तिने जाहीर केली.

बर्‍याच काळानंतर लॉरा झिव्ह हिने वारीसच्या घेतलेल्या मुलाखतीतून सोमालियातील महिला व मुलींची विदारक स्थिती जगासमोर आली. युनोनेही ह्याची गंभीर दखल घेतली. महिलांच्या आरोग्याची दखल घेत वारीसने आपल्या संपत्तीमधला ८०% भाग खर्च करून डेझर्ट फ्लॉवर फाउंडेशन ट्रस्टची स्थापना केली, जे आज ‘फीमेल जेनिटल म्युटिलेशन’ म्हणजेच स्त्रियांच्या खत्ना या क्रूर प्रथेविरुद्ध काम करत आहे.

आज वारीस हे नाव अशा अत्याचारांना बळी पडलेल्या असंख्य स्त्रियांसाठी आशेचा किरण ठरले आहे. 'वारीस'चा अर्थ वाळवंटातलं फूल असा होतो. या नावाने "डेझर्ट फ्लॉवर फाऊंडेशन' या नावाने वारीस सध्या तिची संस्था चालवते. डेझर्ट फ्लॉवर आणि डेझर्ट डॉन (Desert Dawn) या नावाची तिनं आत्मचरित्रपर पुस्तकंही लिहिली आहेत.

आज वारीस हे नाव अशा अत्याचारांना बळी पडलेल्या असंख्य स्त्रियांसाठी आशेचा किरण ठरले आहे. 'वारीस'चा अर्थ वाळवंटातलं फूल असा होतो. या नावाने "डेझर्ट फ्लॉवर फाऊंडेशन' या नावाने वारीस सध्या तिची संस्था चालवते. डेझर्ट फ्लॉवर आणि डेझर्ट डॉन (Desert Dawn) या नावाची तिनं आत्मचरित्रपर पुस्तकंही लिहिली आहेत.

काही चांगलं करण्यासाठी परिस्थिती नेहमीच अनुकूल असते असं नाही. प्रतिकूल परिस्थितीतून कित्येकजण आपलं आणि इतरांचंही आयुष्य सुंदर, सुखावह आणि सुसह्य बनवतात. वारीस डायरी ही अशा लोकांचं उत्तम उदाहरण आहे!!

 

लेखिका: स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required